तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांचा व्हॉट्सअ‍ॅपवर बहिष्कार

    दिनांक :12-Jan-2021
|
- देशी अ‍ॅपला दिली पसंती
 
अंकारा, 
सोशल मीडिया अ‍ॅप- व्हॉट्सअ‍ॅपवर तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी बहिष्कार घातला आहे. व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या गोपनीयता धोरणात (प्रायव्हसी पॉलिसी) बदल केले आहेत. या नव्या धोरणामुळे युजर्समध्ये नाराजीचे वातावरण असतानाच तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी बहिष्काराचा निर्णय जाहीर केला आहे. राष्ट्राध्यक्ष रेचप तैयप एर्दोगन यांच्या माध्यम कार्यालयाने व्हॉट्सअ‍ॅप सोडण्याचे जाहीर केले आहे. एवढेच नव्हे तर संरक्षण खात्यानेही व्हॉट्सअ‍ॅप न वापरण्याचा निर्णय घेतला आहे.
 

turki 2_1  H x  
 
ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी 11 जानेवारी रोजी आपले व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप एन्क्रिप्टेड मेसेजिंग अ‍ॅप बीआयपीवर बनवण्याचे निर्देश दिले आहेत. बीआयपी हा तुर्कीचा एक एन्क्रिप्टेड मेसेजिंग अ‍ॅप आहे. याची मालकी टर्कसेल इलेटिसिम हिजमेटलरी एएसकडे आहे. सर्वांनाच या मेसेजिंग अ‍ॅपवर खाते उघडण्याचे निर्देश राष्ट्राध्यक्ष कार्यालयाकडून मिळण्याची शक्यता आहे.
 
 
राष्ट्राध्यक्षांनी व्हॉट्सअ‍ॅप सोडण्याचे जाहीर केल्यानंतर तुर्कीत या अमेरिकन समाज माध्यमाविरोधात आवाज तीव्र झाला आहे. तुर्कीत व्हॉट्सअ‍ॅप सोडून बीआयपीवर नव्याने खाते सुरू करण्यात येत आहेत. रविवारी कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, 24 तासांत जवळपास 10 लाख जणांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले आहे. हे अ‍ॅप 2013 मध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आतापर्यंत जवळपास 53 दशलक्षाहून अधिक वेळा डाऊनलोड करण्यात आले आहे.
 
 
वापरकर्ते नाराज
वापरकर्त्यांना (युजर्स) जर आपले खाते कायम ठेवायचे असेल तर त्यांना नवीन धोरण स्वीकारावे लागणार लागणार आहे. यासाठी दुसरा कोणताही पर्याय वापरकर्त्यांना देण्यात आलेला नाही. सध्या या ठिकाणी ‘नॉट नाऊ’चा पर्याय दिसत आहे. जर तुम्ही नवीन पॉलिसीला काही वेळेसाठी स्वीकारले केले तर तुमचे खाते सुरू राहील. नवीन धोरणात फेसबुक आणि इंस्टाग्रामचे एकीकरण (इंटिग्रेशन) जास्त आहे. आता वापरकर्त्यांचा आधीच्या तुलनेत जास्त डेटा फेसबुककडे राहील. व्हॉट्सअ‍ॅपचा डेटा आधीच फेसबुकसोबत सामायिक केला जात होता. परंतु, फेसबुक सोबत व्हॉट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्रामचे एकीकरण जास्त राहील, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.