कोव्हिशिल्डच्या आणखी साडेचार कोटी मात्रा खरेदी करणार

    दिनांक :12-Jan-2021
|
- आरोग्य मंत्रालयाची माहिती
नवी दिल्ली,
सीरम इन्स्टिट्यूटकडून कोव्हिशिल्ड लसीच्या आणखी साडेचार कोटी मात्रा खरेदी करण्याचा निर्धार केंद्र सरकारने आज मंगळवारी व्यक्त केला आहे. प्रती 210 रुपये किंमत असलेल्या या लसीच्या 1.10 कोटी मात्रा खरेदी करण्याची मागणी केंद्राने आधीच सीरमकडे नोंदवली आहे.
 
aa_1  H x W: 0
 
सरकारकडून मागणी आदेश नोंदविण्यात आल्यानंतर सीरमने या लसीची किंमत जाहीर केली होती. 200 रुपये आणि 10 रुपये जीएसटी असे मिळून एका लसीसाठी सरकारला 210 रुपये मोजावे लागणार आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या एचएलएल लाईफकेअर लिमिटेडने या लसींची मागणी नोंदवली आहे. यानुसार 1.10 कोटींच्या लसीसाठी 231 कोटींचा खर्च येणार असून, आता आणखी साडेचार कोटी मात्रा खरेदी करण्यात येणार असल्याने, त्यासाठी सरकारला 1,176 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
 
56 लाख लसींसह चार विमाने 13 शहरांमध्ये दाखल दरम्यान, जगातील सर्वांत मोठ्या लसीकरण कार्यक‘माला अवघे चार दिवस शिल्लक असल्याने, कोव्हिशिल्ड लसीच्या 56.5 लाख मात्रांसह 9 विशेष विमाने देशातील 13 शहरांकडे आज मंगळवारी रवाना झाली आणि काही वेळातच ती त्या शहरांमध्ये दाखलही झाली. ही सर्व विमाने चार एअरलाईन्सतर्फे हाताळली जात आहेत, अशी माहिती नागरी उड्डयण मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी दिली.
 
स्पाईस जेट आणि गोएअरची दोन विमाने पुण्याहून दिल्ली आणि चेन्नईकडे निघाली. त्यानंतर लगेच उर्वरित विमानेही एकापाठोपाठ रवाना झाली. दिल्ली, चेन्नई, कोलकाता, गुवाहाटी, शिलाँग, अहमदाबाद, हैदराबाद, विजयवाडा, भुवनेश्वर, पाटणा, बंगळुरू, लखनौ आणि चंदीगड या शहरांकरिता या विमानांनी उड्डाण घेतले, असे ट्विट पुरी यांनी केले.
 
तत्पूर्वी, तापमान नियंत्रित करण्याची विशेष यंत्रणा असलेल्या ट्रक्समधून लसींचा साठा 478 पेट्यांमधून विमानतळावर आणण्यात आला होता. या सर्व विमानांमध्येही शीतगृहांची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.