सौदी अरब वसवणार आधुनिक नवीन शहर

    दिनांक :12-Jan-2021
|
- वाहने आणि रस्ते नसणार
नियोम, 
प्रचंड मोठे रस्ते, खाजगी व सार्वजनिक वाहतुकीच्या सोयी, गगनचुंबी इमारती, मॉल्स या सार्‍या गोष्टी आजच्या आधुनिक शहराचा अपरिहार्य भाग आहेत. मात्र, सौदी अरबचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान एका नव्या शहराची निर्मिती करणार असून या शहरात वाहने, रस्ते नसतील. हे नवीन शहर शून्य कार्बन उत्सर्जन शहर असणार आहे. राजपुत्र सलमान यांनी हे शहर 170 किमी क्षेत्रफळात वसवण्याचा निर्णय घेतला आहे.
 
 
saudi_1  H x W:
 
(संग्रहित छायाचित्र ) 
 
‘ब्लूमबर्ग’ने दिलेल्या वृत्तानुसार, या नव्या शहराचे नाव ‘द लायन’ असणार आहे. हे शहर सौदी अरबच्या निओम प्रकल्पाचा भाग असणार आहे. या प्रकल्पावर 500 अब्ज अमेरिकन डॉलर्स म्हणजेच जवळपास 36 लाख कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. सौदीच्या या नव्या शहरात 10 लाख नागरिकांचे वास्तव्य असेल. या शहरात आरोग्य केंद्र, शाळा व पर्यावरणपूरक सुविधा असतील. सौदी अरब सरकारने दिलेल्या माहितीनुसार, या शहरात 2030 पर्यंत तीन लाख 80 हजार रोजगारनिर्मिती करण्यात येणार आहे. या शहरात लोकांना पायी चालावे लागणार आहे. सर्व सुविधा लोकांना जवळच उपलब्ध असतील. या शहराच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी 100 ते 200 अब्ज डॉलर्सचा खर्च येणार आहे.
 
 
राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांनी सांगितले की, विकास करत असताना निसर्गाचा बळी देता कामा नये. हे नवीन शहर मानवी समाजासाठी आणि मानवतेच्या दृष्टीने क्रांती असेल. या शहरात कुठल्याही कामासाठी 20 मिनिटांपेक्षाही अधिक वेळ चालावे लागणार नाही. या शहरात अल्ट्रा हाय स्पीड ट्रान्झिट आणि स्वायत्त गतिशीलता निराकरण (ऑटोनॉमस मोबिलिटी सोल्युशन) उपलब्ध असेल. हा प्रकल्प राजपुत्र सलमान यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याचे म्हटले जाते.
 
 
सलमान यांनी 2017 मध्ये निओम प्रकल्पाची घोषणा केली होती. सौदी अरब हा सर्वात मोठा तेल निर्यातदार देश आहे. मात्र, भविष्यात होणारे बदल पाहता सौदीने अर्थव्यवस्थेत बदल करण्यास सुरुवात केली आहे. भविष्यात तेलाचे उत्पादन कमी होण्याची शक्यता असून नव्या तंत्रज्ञानामुळे तेलावरील अवलंबित्व कमी होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने सौदी अरब आपल्या अर्थव्यवस्थेची रचना करत आहे.