किम जोंगच्या बहिणीला पॉलिट ब्युरोमधून डच्चू

    दिनांक :12-Jan-2021
|
सेऊल, 
उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याने आपली बहीण किम यो जोंगला पॉलिट ब्युरोमधून बाहेर काढले असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. सत्तारूढ वर्कर्स पार्टीचे अधिवेशन नुकतेच पार पडले असून किम यो जोंगला पक्षाच्या पॉलिट ब्युरोमधून वगळण्यात आले आहे. मात्र, किम योला पक्षाच्या केंद्रीय समितीत स्थान दिले आहेत. पक्षात बहिणीच्या वाढत्या वर्चस्वाला शह देण्यासाठी किम जोंग यांनी हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे.
 

kim-jong-un_1   
 
उत्तर कोरियात रविवारी सत्ताधारी वर्कर्स पार्टीचे अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात पक्षातंर्गत निवडणुकही पार पडली. यामध्ये किम यो जोंगला केंद्रीय समितीत स्थान मिळाले. मात्र, पॉलिट ब्युरोपासून दूर ठेवण्यात आले. किम जोंग उन यांना पक्षाचे महासचिव म्हणून निवडण्यात आले आहे. याआधी किम यो या पक्षाच्या बैठकीत महत्त्वाच्या नेत्यांसोबत दिसल्या होत्या. पॉलिट ब्युरोत किम योला स्थान न मिळाल्याबद्दल अनेक चर्चा सुरू आहेत.
 
 
दुसर्‍या क्रमांकाची नेता
किम यो जोंगचा प्रभाव मागील काही वर्षांत वाढला होता. सुरुवातीच्या काळात किम जोंग उनच्या खाजगी सचिव म्हणून किम यो सक्रिय झाल्या होत्या. त्यानंतर त्यांना दक्षिण कोरियाच्या दौर्‍यासाठी विशेष दूत म्हणून पाठवण्यात आले. वर्ष 2017 मध्ये केंद्रीय समितीत स्थान मिळवणारी किम यो ही दुसरी महिला ठरली. किम यो जोंग ही देशातील दुसर्‍या क्रमांकावरील नेता म्हणून सक्रिय होती, असे दक्षिण कोरियाच्या गुप्तचर विभागाने म्हटले. उत्तर कोरियाच्या प्रश्नाबाबतचे तज्ज्ञ प्रा. लिम इल चुल यांनी सांगितले की, पक्षातील स्थानाबाबत किम यो जोंग यांच्याबाबत आताच ठोस निष्कर्ष काढता येणार नाही. किम यो या सध्या केंद्रीय समितीच्या सदस्य आहेत. त्यामुळे भविष्यातही त्यांना पक्षाकडून मोठी जबाबदारी मिळू शकते.