अमेरिकेत सशस्त्र आंदोलनाची तयारी

    दिनांक :12-Jan-2021
|
- एफबीआयचा इशारा
 
वॉशिंग्टन, 
नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या शपथविधीआधी ट्रम्प समर्थकांकडून वॉशिंग्टन डीसी तसेच इतर 50 राज्यांमध्ये सशस्त्र आंदोलन केले जाण्याची शक्यता आहे. एफबीआयने यासंबंधी इशारा दिला असल्याची माहिती आहे. अमेरिकेत बुधवारी वॉशिंग्टन डीसी येथील कॅपिटॉल इमारतीत झालेल्या हिंसाचारामुळे आधीच तणावाचे वातावरण असताना त्यात आता या नवीन माहितीची भर पडली आहे.
 
 
capitol-hill_1  
 
कॅपिटॉल इमारतीबाहेर झालेल्या हिंसाचारानंतर सतर्क असलेल्या एफबीआयने मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांकडून पुन्हा हिंसक आंदोलन होण्याची शक्यता असल्याने सुरक्षेची पूर्ण तयारी केली आहे. वॉशिंग्टनच्या सुरक्षेसाठी जवळपास 15 हजार तुकड्या तैनात केल्या जाणार आहेत. याशिवाय वॉशिंग्टन स्मारकाला भेट देण्यासाठी येणार्‍या पर्यटकांना 24 जानेवारीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.
 
 
ज्यो बायडेन यांच्या शपथविधीची ‘अमेरिका युनायटेड’ ही मुख्य संकल्पना असेल, अशी माहिती त्यांच्या चमूकडून देण्यात आली आहे. एका अधिकार्‍याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, एफबीआयने 16 जानेवारी ते 20 जानेवारी या कार्यकाळात हिंसक आंदोलनाची शक्यता व्यक्त केली असून शपथविधी झाल्यानंतर पुढील तीन दिवसांसाठीही हा इशारा कायम आहे.
 
 
नॅशनल गार्ड ब्युरोचे प्रमुख जनरल डॅनियल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘शनिवारपर्यंत वॉशिंग्टनमध्ये सुरक्षा जवानांच्या जवळपास 10 हजार तुकड्या उपस्थित असतील. सुरक्षा, वाहतूक अशा गोष्टींसाठी मदत करण्यावर त्यांचा भर असेल. जर स्थानिक प्रशासनाने मागणी केली तर ही संख्या 15 हजारांपर्यंतही जाऊ शकते.