40 हजार लसी नागपुरात पोहोचल्या

    दिनांक :13-Jan-2021
|
40 हजार लसी नागपुरात पोहोचल्या
लसीकरणासाठी मनपाची यंत्रणा सज्ज
24500 आरोग्य सेवकांना लस दिली जाणार
नागपूर, 
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विभागीय उपसंचालक कार्यालयाला 40 हजार को व्हॅक्सीन प्राप्त झालेल्या असून, महानगरपालिकेला व्हॅक्सीन घेऊन जाण्यासंदर्भात आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी सूचना केलेली नाही. शहरातील 24 हजार 50 आरोग्य सेवकांना कोरोना लस दिली जाणार असून, त्याचा शुभारंभ 16 जानेवारीला होणार आहे.
 
a_1  H x W: 0 x
यासंदर्भात बुधवारी महापौर दयाशंकर तिवारी यांनी मनपाच्या तयारीचा आढावा घेतला. मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत उपमहापौर मनीषा धावडे, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, ज्येष्ठ नगरसेवक संजय बंगाले, प्रतोद दिव्या धुरडे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन डॉ.प्रदीप दासरवार आदी उपस्थित होते.
 
याशिवाय मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी. दररोज लसीकरण संदर्भात बैठक घेऊन तयारीचा आढावा घेत आहेत. कोविड-19 ची लस मनपाच्या लसीकरण संग्रह केंद्रात महाल मध्ये ठेवण्यात येणार आहे. मनपा दवाखान्यात व लसीकरण संग्रह केंद्रामध्ये मुबलक प्रमाणात फ्रीजची व्यवस्था करण्यात आली आहे. मनपाला आरोग्य सेवकांना देण्यासाठी पहिला डोज भेटणार आहे. दुस-या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर्स जसे पोलिस, मनपा व राजस्व विभागाचे कर्मचारी असतील. तिस-या टप्प्यात 50 वर्ष पेक्षा अधीक वयाचे नागरिकांना लस देण्यात येईल. यासाठी नोंदणी शासनाचे दिशा निर्देशानुसार सुरु करण्यात येईल.
 
पहिल्या टप्प्यामध्ये मनपाकडे नोंदणी केलेल्या आरोग्य कर्मचा-यांना लस दिली जाणार आहे. यासाठी शहरामध्ये 5 लसीकरण केंद्र तयार केली आहेत. महाल रोगनिदान केंद्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय (मेडिकल), इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय (मेयो), एम्स, डागा हॉस्पिटल या 5 ठिकाणच्या कोविड लसीकरण केंद्रावर आरोग्य कर्मचा-यांना लस देण्यात येईल. प्रत्येक केंद्रावर दररोज कमाल 100 कर्मचारी याप्रमाणे सर्व कर्मचा-यांना लस दिली जाणार आहे.
 
लसीकरण केंद्रावर सुरक्षेच्या सर्व कोव्हिड प्रतिबंधक उपाययोजनांचे नियोजन करण्यात आले असून प्रत्येक केंद्रावर मनपाचे 4 आरोग्य कर्मचारी व एक पोलिस कर्मचारी तैनात राहतील. पहिल्या टप्प्यात डॉक्टर, नर्स, सफाई कामगार, रुग्णालयांचे इतर कर्मचारी, आंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर अशा एकूण 24500 आरोग्य सेवकांना लस देण्यात येणार आहे. यामध्ये मनपासह 79 शासकीय रुग्णालयांतील 12 हजार व 350 खाजगी रुग्णालयांतील 12500 आरोग्य कर्मचा-यांचा समावेश आहे. लसीकरण केंद्रामध्ये प्रतीक्षा कक्ष, लसीकरण कक्ष आणि निगरानी कक्ष तयार करण्यात आले आहेत. लस लावण्यापूर्वी कर्मचा-यांच्या नावाची तपासणी केली जाईल. त्यानंतर त्यांचे तापमान घेऊन सॅनिटाइज करुन प्रतीक्षा कक्षात त्यांच्या बसण्याची व्यवस्था केली जाईल. लसीकरण करण्यापूर्वी त्यांच्या परिचय पत्राची चाचणी केल्यानंतर पोर्टलवर त्यांच्या नावाची नोंदणी केली जाईल.
ऐछिक व नि:शुल्क लस- ‘कोव्हिन’ अ‍ॅपवर नोंदणी केलेल्या आरोग्य कर्मचा-यांना लस देण्यात येणार असली तरी ती बंधनकारक करण्यात आलेली नाही. लस ही ऐच्छिक आहे. विशेष म्हणजे लस पूर्णत: नि:शुल्क आहे. जर आरोग्य सेवकांनी लस घेण्यास नाकार दिला तर तशी नोंद अ‍ॅपवर केली जाईल. सध्या शहरात 5 केंद्रावर लसीकरण होणार असून लवकरच या केंद्रांची संख्या वाढवून 60 पर्यंत केली जाणार आहे. यामध्ये शासकीय रुग्णालय, मनपाच्या आरोग्य केंद्रांसह खाजगी रुग्णालयांचाही समावेश राहणार आहे. या सर्व केंद्रांवरही नि:शुल्क लस देण्यात येणार आहे.