अमेरिकेत कोरोनाचा हाहाकार

    दिनांक :13-Jan-2021
|
- एका दिवसात 4 हजारांहून अधिक बळी
वॉशिंग्टन, 
जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेसमोर कोरोनाचे प्रचंड संकट आ वासून उभे ठाकले आहे. अमेरिकेत कोरोनाबाधितांच्या सं‘येत तर वाढ होत आहेच, पण मृतांचा आकडा देखील उच्चांक गाठत आहे. मंगळवारी एकाच दिवसात अमेरिकेत तब्बल 4 हजारांहून अधिक नागरिकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.
 
a_1  H x W: 0 x
 
अमेरिकेत कोरोना लसीकरण मोहीम सुरू असतानाही कोरोनाबाधितांची सं‘या वाढत आहे. मंगळवारी संध्याकाळपर्यंत अमेरिकेत 2 लाख 22 हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली, तर 4197 जणांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला. एकाच दिवशी सर्वाधिक मृतांची नोंद मंगळवारी करण्यात आली आहे, अशी माहिती जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने दिली आहे. याआधी 7 जानेवारी रोजी एकाच दिवशी 4194 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मागील आठवड्यात सरासरी 3200 हून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.
 
कोरोना महामारीच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी अमेरिकेत लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत 9 दशलक्ष जणांना कोरोना लसीची पहिली मात्रा देण्यात आली असून 27 दशलक्ष कोरोना लसीच्या मात्रांचे वितरण करण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
 
जगभरात कोरोनाबाधितांची सं‘या वाढत असून 9.19 कोटीहून अधिकजणांना संसर्गाची लागण झाली आहे. तर, 6 कोटी 80 लाखांहून अधिकजणांनी कोरोनावर मात केली आहे. तर, 19 लाख 68 हजार जणांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहे.