पीक विमा योजनेची व्याप्ती वाढली: पंतप्रधान मोदी

    दिनांक :13-Jan-2021
|
नवी दिल्ली,
पंतप्रधान पीक विमा योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली असून, रालोआ सरकारने सुरू केलेल्या या योजनेचा निसर्गाच्या अनिश्चिततेविरोधात लढणार्‍या कोट्यवधी शेतकर्‍यांना फायदा झाला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बुधवारी केले. या योजनेच्या अंमलबजावणीला आज पाच वर्षे पूर्ण झाली आहेत.
 
a_1  H x W: 0 x
 
पंतप्रधान पीक विमा योजनेमुळे शेतकर्‍यांना कशाप्रकारे मदत झाली, याची माहिती नमो अ‍ॅपवरून घ्या, असे आवाहन त्यांनी एका ट्विटच्या माध्यमातून नागरिकांना केले. कठोर परिश्रम करणार्‍या शेतकर्‍यांचा निसर्गाच्या अनिश्चिततेपासून बचाव करण्यासाठी महत्त्वपूर्ण अशा पंतप्रधान पीक विमा योजनेची सुरुवात करण्यात आली. या विमा योजनेने आज पाच वर्षे पूर्ण केली आहेत. या योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली असून, शेतकर्‍यांसमोरील धोका कमी झाला तसेच कोट्यवधी शेतकर्‍यांना या योजनेचा फायदा झाला. या योजनेतील लाभार्थ्यांचे मी अभिनंदन करतो, असे मोदी यांनी सांगितले.
 
पंतप्रधान पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकर्‍यांना कसा फायदा दिला जातो? शेतकर्‍यांच्या दाव्यांचा पारदर्शक पद्धतीने कसा निपटारा केला जातो तसेच विविध पैलूंची माहिती नमो अ‍ॅपच्या माध्यमातून घेऊ शकता, असे त्यांनी यावेळी सांगितले.