दोन महिन्यात अंतिम निकाल : अ‍ॅड. निकम

    दिनांक :13-Jan-2021
|
- अंकिता जळित हत्याकांडाचे तीन दिवस सलग कामकाज
तभा वृत्तसेवा
हिंगणघाट,
महाराष्ट्रात गाजलेल्या अंकिता पिसुड्डे जळितकांड प्रकरणी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एन. माजगावकर यांच्या न्यायालयीन कक्षात 3 दिवस सुरू असलेली न्यायालयीन कारवाई आज 13 रोजी सायंकाळी 4.15 वाजता संपली. यावेळी अभियोजन पक्षाच्या वतीने विशेष सरकारी अधिवक्ता उज्ज्वल निकम, हिंगणघाट येथील शासकीय अधिवक्ता प्रसाद सोइतकर तर बचावपक्षाच्या वतीने अ‍ॅड. भूपेंद्र सोने यांनी काम पाहिले.
 
a_1  H x W: 0 x
 
कालच न्यायालयाने परवानगी दिल्याने बचाव पक्षाचे वकिलाने अर्धवट रहिलेली उलटतपासणी घेतली. अंकिताची आई सोबतच घटनेनंतर हिंगणघाट येथे उपचारादरम्यान न्यायदंडाधिकारी तथा नायब तहसीलदार विजय पवार यांचीसुद्धा आज साक्ष झाली.
काल बचाव पक्षाचे वकील सोने यांनी मागणी केल्याने साक्ष नोंदणीच्यावेळी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली होती. खटल्यातील सात साक्षीदारांची आतापावेतो साक्ष नोंदविण्यात आली तसेच सरल तपासणी आणि बचाव पक्षाने उलट तपासणीसुद्धा केली. या खटल्याचे कामकाज आता पुढील 15 ते 17 फेब्रुवारी रोजी पुन्हा सलग तीन दिवस होणार असून यावेळीसुद्धा अधिवक्ता निकम हे उपस्थित राहतील.
 
आरोपी विकेश नगराळेच्या वकिलांनी मृतक अंकिताच्या आई व वडिलांची उलट तपासणी घेतली. यावेळी अंकिताची आई भावविवश झाली. अंकिताच्या आईला अस्वस्थ वाटल्यामुळे काही वेळाकरिता न्यायालयीन कामकाज स्थगित करण्यात आले होते. थोड्याच वेळात पुन्हा न्यायालयाचे परवानगीने कामकाजास सुरुवात झाली. या बहुचर्चित जळीतकांडाचा निकाल दोन महिन्यात लागू शकेल अशी महत्त्वपूर्ण माहिती निकम यांनी सांगितले.
 
बचावपक्षाचे वकील भूपेंद्र सोने यांनी मात्र न्यायालयीन प्रक्रियेत सत्यता पुढे आणण्याची जबाबदारी माझ्यावर असल्याने त्याला वेळसुद्धा लागू शकेल असे सांगितले.