- येस बँकेला नोटीस
नागपूर,
बँकेच्या ऑनलाईन व्यवहारातून लाखो रुपयांनी फसवूणक झाल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने याचिकाकर्त्याचे म्हणणे ऐकून घेत येस बँकेला नोटीस बजावत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले.
सुंदर नमकीन असे याचिकाकर्त्याचे नाव आहे. याचिकाकर्त्याच्या मते, 19 ऑगस्ट 2020 रोजी येस बँकेतील त्यांच्या खात्यातून ऑनलाईन पद्धतीने 12 लाख 75 हजार रुपये वळते करण्यात आले. त्यांनी त्वरीत याबाबत पोलिस स्टेशन व येस बँकेकडे तक्रार दाखल केली. विशेष म्हणजे, 18 ते 20 ऑगस्ट दरम्यान त्यांचे वोडाफोन कंपनीचे सिम बंद करून हा व्यवहार करण्यात आला.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे जारी केलेल्या सूचनेनुसार एखाद्या खातेदाराच्या खात्यातून त्याच्या परवानगीशिवाय रक्कम वजा झाली व त्या खातेदाराने संबंधित बँकेस तीन दिवसांच्या आत याबाबत माहिती दिली तर बँकेने संबंधित खातेदारास पूर्ण रक्कम दहा दिवसांच्या आत परत करणे बंधनकारक आहे. या नियमानुसार खातेदाराने येस बँकेशी पत्रव्यवहार केला. परंतु, बँकेने पैसे देण्यास नकार दिला. या गैरव्यवहारात बँक जबाबदार नसल्यामुळे संबंधित रक्कम परत करता येत नाही असे बँकेने सांगितले. मात्र, रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या नियमांचे उल्लंघन होत असल्याने येस बँकेला या नियमाचे पालन करण्याचे निर्देश देण्यात यावे अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
याप्रकरणी न्यायालयाने याचिकाकर्त्याचे म्हणणे ऐकून घेत वरीलप्रमाणे आदेश दिले. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. महेंद्र लिमये यांनी कामकाज पाहिले.