आयुर्वेदातील पंचकर्म महत्त्वपूर्ण, गुणकारी इलाज

    दिनांक :13-Jan-2021
|
-वैद्य जयंत देवपुजारी यांचे मत
- आयुर्वेदतज्ज्ञाचा सल्ला अवश्य घ्या
नागपूर, 
मानवी आजारात आयुर्वेदातील पंचकर्म हा महत्त्वपूर्ण व गुणकारी इलाज असून गुडघा प्रत्यारोपण वा कुठल्याही शल्यकर्मापूर्वी आयुर्वेदतज्ज्ञाचा (वैद्य) सल्ला अवश्य घ्यायला हवा, असे मत आयुष मंत्रालयांतर्गत भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेच्या गव्हर्निंग बोर्डाचे अध्यक्ष वैद्य जयंत देवपुजारी यांनी व्यक्त केले.
 
a_1  H x W: 0 x
 
वैद्य जयंत देवपुजारी व त्यांच्या पत्नी वैद्य अनुपमा देवपुजारी यांचे प्रतापनगरातील दुर्गा मंदिरासमोर श्रीनिधी आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालय आहे. मागील ३२ वर्षांपासून शुद्ध आयुर्वेदातूनच रुग्णोपचार करीत असल्याचे त्यांनी आवुर्जन सांगितले. नाडी परीक्षणातून पंचकर्मादी सर्व उपचार येथे उपलब्ध आहेत.
 
मानवी आजारात आयुर्वेदातील पंचकर्म हा अत्यंत महत्त्वपूर्ण, गुणकारी इलाज असल्याचे वैद्य जयंत देवपुजारी यांनी स्पष्ट केले. स्वस्थ निरोगी शरीर कायम असावे, यासाठी तसेच झालेला आजार वा रोगमुक्तीसाठी, अशा दोन उद्देशांसाठी पंचकर्म केले जाते. शरीरातील वात, पित्त व कफ या त्रिदोषांच्या असंतुलनामुळे आजार निर्माण होतो. या त्रिदोषांचे संतुलन ठेवणे गरजेचे असते. अनेकजण वर्षातून एकदा पंचकर्म करीत असतात. वर्षभरात आजारापासून दूर रहाता यावे, असा उद्देश त्यांचा असतो.
 
सांधेदुखी, अस्थमा, त्वचारोग, वातविकार, आम्लपित्त (अ‍ॅसिडिटी) आदी सर्व आजारांसाठी पंचकर्म चिकित्सा केली जाते. गुडघे प्रत्यारोपण आदी शल्यकर्म करण्यापूर्वी एकदा आयुर्वेद तज्ज्ञाचा सल्ला अवश्य घ्यावा. याचे कारण अनेक जुने आजार आयुर्वेदाने बरे होऊ शकतात.
 
पंचकर्म
पंचकर्म म्हणजे पाच प्रकारचे कर्म. वमन, विरेचन, बस्ती, नत्स्य व रक्तमोक्षण ते पंचकर्म आहेत. त्यानंतर त्यांचेही उपकर्म आहेत. वमन म्हणजे उलटी. विरेचन म्हणजे पोट साफ करणे, पित्त घालवून कोठा साफ करणे. वमनात जठर आदी वरचा अन्नमार्ग स्वच्छ होत असतो. विरेचनात आतडी वगैरे खालील अन्नमार्ग साफ होतो. कंबर वा सांधेदुखीसारख्या काही आजारांवर आधी मालिश व शेक हे उपचार सांगितले जातात.
 
आजार कुठले यावर त्यांचे बरे होणे अवलंबून असते. अतिसार काही वेळातच बरा होतो. त्वचा रोगास त्यामानाने वेळ लागू शकतो. शिरोधारा हा आणखी एक उपचाराचा प्रकार.
 
हितकारक जीवन, अहितकारक जीवन, दुःखदायक जीवन, सुखकारक जीवन म्हणजे नक्की काय, याचे सखोल विवेचन म्हणजे आयुर्वेद, असा आशयाचा एक श्लोक चरक संहितेत आहे. त्यामुळे कुठल्याही शल्यकर्मापूर्वी आयुर्वेदिक तज्ज्ञाचा (वैद्य) सल्ला अवश्य घ्यायला हवा, यावर जयंत देवपुजारी यांनी भर दिला.
 
रोगप्रतिकार शक्तीसाठी आयुर्वेद- इतर देशांत कोरोनाने प्रचंड थैमान घातले. त्यामानाने भारतात कोरोनाला फारसे हात-पाय पसरवता आला नाही. याचे कारण, भारतीयांची रोगप्रतिकार शक्ती. आयुष मंत्रालयाने काढा व त्याचे विविध पर्याय लोकांसमोर ठेवले. त्याचा अनेकांना लाभ घेतला. परिणामी रोगप्रतिकार शक्ती टिकून राहिली. हीच आयुर्वेदाची शक्ती व महती आहे. आयुष मंत्रालयाने केलेल्या एका सर्वेक्षणात सुमारे २ कोटी लोकांनी सहभाग घेतला. त्यात ७० टक्के लोकांनी आयुर्वेद उपचारामुळे बरे झाल्याचे मत व्यक्त केले असल्याचे जयंत देवपुजारी यांनी सांगितले.