क्रीडा संकुल दत्तक घेण्यासाठी रिलायन्सला करणार विनंती

    दिनांक :13-Jan-2021
|
- क्रीडा मंत्री सुनील केदार यांचे आश्‍वासन
- आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीनुसार मुंबईत बैठक
तभा वृत्तसेवा
चंद्रपूर,
2024 मध्ये होणार्‍या ऑलम्पिक स्पर्धेसाठी प्राविण्यप्राप्त खेळाडू तयार करण्याच्यादृष्टीने तज्ज्ञांकरवी प्रशिक्षण व अन्य बाबींसाठी चंद्रपूर जिल्हयातील बल्लारपूर तालुका क्रीडा संकुल रिलायन्स फाऊंडेशनने दत्तक घ्यावे यासाठी राज्य सरकार फाऊंडेशनला विनंती करणार तसेच बल्लारपूर तालुका क्रीडा संकुलाला भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे प्रादेशिक केंद्र म्हणून मान्यता मिळावी यासाठी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री किरण रिजीजु यांनासुध्दा आपण विनंती करणार असल्याचे आश्वासन राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार यांनी दिले.
 

sankul_1  H x W 
 
मिशन शक्ती अंतर्गत बल्लारपूर येथील तालुका क्रीडा संकुल येथे 2024 च्या ऑलम्पिक स्पर्धेच्या तयारीसाठी सेंटर फॉर एक्सेलन्स सुरू करण्यासाठी रिलायन्स स्पोर्ट फाऊंडेशनसोबत करार करण्याच्या विषयासंदर्भात माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीच्या अनुषंगाने मंत्रालयात सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मुनगंटीवार म्हणाले, या क्रीडा संकुलाची देखभाल व दुरूस्ती तसेच खेळाडू प्रशिक्षणासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे तज्ज्ञ प्रशिक्षक उपलब्ध व्हावे यासाठी रिलायन्स स्पोर्ट फाऊंडेशनने दत्तक घ्यावे, अशी विनंती रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्ष निता अंबानी यांच्याकडे आपण केली आहे.
 
 
 
गेल्या 120 वर्षात ऑलम्पिक स्पर्धेत भारताला केवळ 28 पदके मिळाली असून, यात फक्त 9 सुवर्ण पदकांची नोंद आहे. अमेरिकेला 2520, चीनला 543, ग्रेट ब्रिटेनला 847, सोवियत युनियनला 1122, जर्मनीला 937, फ्रांन्सला 713 पदके प्राप्त झाली आहेत. भारताला मिळालेल्या पदकांची संख्या या तुलनेत नगण्य आहे. हे प्रमाण वाढावे व आदिवासीबहुल, नक्षलप्रभावित असलेल्या चंद्रपूर, गडचिरोली जिल्हयातील खेळाडू पदकप्राप्त ठरावे यादृष्टीने रिलायन्स स्पोर्ट फाऊंडेशनला हे स्टेडियम दत्तक देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन मुनगंटीवार यांनी केले.
 
 
 
येत्या सोमवारी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री महाराष्ट्राच्या दौर्‍यावर येत आहेत. या दौर्‍यादरम्यान बल्लारपूर तालुका क्रिडा संकुलाला भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे प्रादेशिक केंद्र म्हणून मान्यता मिळावी यासाठी आपण त्यांना विनंती करणार असल्याचे सुनील केदार यांनी यावेळी सांगितले. तसेच या तालुका क्रीडा संकुलाच्या वसतीगृहाची संरक्षक भिंत, सोलार सिस्टीम यासाठी त्वरित अंदाजपत्रक सादर करावे, आपण यासाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून देवू, असेही त्यांनी यावेळी सांगितले.