राज्यपाल कोश्यारी यांची सहकुटूंब ताडोबा सफारी

    दिनांक :13-Jan-2021
|
तभा वृत्तसेवा
चंद्रपूर,
महामहीम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बुधवार, 13 जानेवारी रोजी सहकुटूंब ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सफारीचा आनंद घेतला. पुढचे तीन दिवस राज्यपाल ताडोबातील एमटीडीसी रिसोर्ट येथे मुक्कामी आहेत. राज्यपाल महोदयांचे बुधवारी दुपारच्या सुमारास वरोडा विश्रामगृहावर आगमन झाले. तिथे जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी राज्यपालांचे स्वागत केले. यावेळी भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या माजी मंत्री शोभाताई फडणवीस तथा विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर दुपारी 4 वाजताच्या सुमारास राज्यपाल कोश्यारी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मोहुर्ली प्रवेशद्वारावर पोहोचले. तिथे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, ताडोबा बफरचे उपवनसंरक्षक गुरूप्रसाद यांनी त्यांचे स्वागत केले.
 
 
koshyari_1  H x
 
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या रिसोर्ट येथे पर्यटन विभागाच्या वतीनेही राज्यपालांचे स्वागत करण्यात आले. स्वागतानंतर लगेच ते कुटूंबासह ताडोबाच्या मोहर्ली प्रवेशव्दारावरून पर्यटनासाठी जंगलात रवाना झाले. त्यांनी दुपारची सफारी पूर्ण असली तरी त्यांना व्याघ्र दर्शन झाले की नाही, याची माहिती मिळू शकली नाही. कोश्यारी यांचा हा दौरा पूर्णत: खाजगी आहे. येत्या 15 जानेवारीपर्यंत ते ताडोबातच राहणार आहेत. 16 जानेवारीला ते मुंबईकडे रवाना होतील.