थंडावल्या प्रचारतोफा, आता गुप्त भेटी!

    दिनांक :13-Jan-2021
|
- शुक्रवारी मतदान, 4 हजार 191 उमेदवार मैदानात
- जिल्ह्यात 604 ग्राम पंचायत निवडणुका
तभा वृत्तसेवा
चंद्रपूर,
जिल्ह्यात 604 ग्राम पंचायतीच्या निवडणुका होत असून, येत्या 15 जानेवारीला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीच्या प्रचारतोफा बुधवारी सायंकाळी 5 वाजतापासून थंडावल्या. आता गुप्त भेटींवर उमेदवार व त्यांचे समर्थक भर देणार आहेत. तब्बल 4 हजार 191 उमेदवारांचे भाग्य मतदार मशीनबंद करणार असून, 9 लाख 35 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील.
 
 
promotion_1  H
 
मुदत संपलेल्या 629 ग्राम पंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला होता. मात्र, त्यानंतर जिल्ह्यातील तब्बल 20 ग्राम पंचायतींमधील सदस्य बिनविरोध निवडून आले. तर चिमूर तालुक्यातील दोन, वरोडा, भद्रावती तालुक्यासह अन्य एका ग्राम पंचायतीसाठी अर्जच आले नाही. तर काही सदस्य अविरोध निवडल्या गेले. शिवाय घुग्घुस ग्राम पंचायतीचे नगर परिषदेत रूपांतर झाले. त्यामुळे आता 604 ग्राम पंचायतीसाठी प्रत्यक्ष मतदान घेतले जाणार असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी संपत खलाटे यांनी दिली.
 
 
 
1 हजार 933 मतदान केंद्रांवर 9 लाख 35 हजार 174 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यापूर्वीच जिल्ह्यात 887 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत आहेत. दरम्यान, बिनविरोध निवडून आलेले सदस्य आपल्याच पक्षाचे असल्याचा दावा विविध राजकीय पुढार्‍यांकडून केला जात आहे. ग्राम पंचायतींवर आपलीच सत्ता यावी, यासाठी गावपुढार्‍यांत रस्सीखेच सुरू आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातून 608 तर अनुसूचित जाती महिला राखीमधून 269 महिलांना निवडून द्यायचे आहे. अनुसूचित जमाती प्रवर्गातून 1 हजार 11, तर महिला राखीव मधून 591, नागरिकांचा मागास प्रवर्गातून पुरूष 1 हजार 246, तर महिला राखीव मधून 698, सर्वसाधारण महिला प्रवर्गातून 189 तर सर्वसाधारणमधून 698 उमेदवार मतदारांना निवडून द्यायचे आहेत.
 
11 हजार 319 अधिकारी-कर्मचारी
जिल्ह्यात 1 हजार 933 मतदान केंद्र असून, या मतदान प्रक्रियेसाठी 11 हजार 933 अधिकारी व कर्मचार्‍यांची नियुक्त करण्यात आली आहे. मतदान केंद्रावर चोख पोलिस बंदोबस्त राहणार आहे. एका मतदान केंद्रावर एक मतदान केंद्र अध्यक्ष, तीन मतदान केंद्र अधिकारी, एक चपराशी व दोन पोलिस तैनात राहणार आहेत.