महिलेने परसबागेत फुलविली ब्रोकोलीची शेती

    दिनांक :14-Jan-2021
|
- सेंद्रीय पद्धतीचा वापर
- लॉकडाऊनचा सदुपयोग
तभा वृत्तसेवा
चांदूर रेल्वे,
सध्या करोना विषाणूमुळे विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येत आहे. त्यातच आरोग्यदायी आहार गरजेचा असल्याचे महत्व पटल्याने इम्युनिटी वाढविणार्‍या खाद्यपदार्थ आणि आहाराचे महत्व वाढत आहे. अशावेळी एक खास उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून ब्रोकोली पिकाची शेती करणे शक्य आहे. ब्रोकोली म्हणजेच परदेशातील हिरव्या रंगाची कोबी असून सदर पीक चांदूर रेल्वे शहरात एका महिलेने घरातील परसबागेत यशस्वीरित्या घेतले आहे. लॉकडाऊनच्या काळात मोबाईलवर आलेल्या व्हीडीओवरून हे पीक घेण्याची कल्पना महिलेला आल्याचे सांगितले.
 
 
bro_1  H x W: 0
 
ब्रोकोली आणि नेहमीच्या खाण्यातील कोबी, फ्लॉवर यांचे कूळ, जाती आणि प्रजाती एकच आहेत. या भाजीचे मूळ स्थान इटली हेच आहे. परंतु चांदूर रेल्वे शहरातील गुलमोहर कॉलनीच्या बाजुला असलेल्या बालाजी नगर येथील रहिवासी पद्मा विवेक युनाते यांनी घरातील परसबागेत ऑक्टोंबर 2020 मध्ये या ब्रोकोलीची लागवड सुरू केली. याविषयी पद्मा युनाते यांनी सांगितले की, ब्रोकोलीच्या बी ची ऑनलाईन खरेदी करून लागवड केली होती. या पद्धतीत प्लास्टीक कपच्या माध्यमातून बी लावले. त्याच दिवशी एकदा पाणी दिले. कोंब येईपर्यंत पाणी दिले नाही. रोपे तयार करण्यासाठी 20 दिवसांचा कालावधी लागला. त्यानंतर रोप जमिनीत पेरले. दोन झाडांमध्ये थोडे अंतर ठेवून लागवड केली. जमिनीत पेरल्यानंतर आठवड्यातून एकदा रोपट्याला पाणी दिले. पिकाची परिपूर्ण वाढ होण्यासाठी 60 दिवस लागले. त्यानंतर मुख्य पीक ब्रोकोली 15 दिवसांनी उपलब्ध झाले. सदर झाडांना सूर्यप्रकाश जास्त पाहिजे, परंतु तापमान 25 डिग्रीच्या कमी पाहिजे. त्यामुळे हे पीक फक्त हिवाळ्यात घेऊ शकतो, अशी माहिती पद्मा युनाते यांनी दिली.
 
 
 
या झाडांची उंची 45 ते 46 सें.मी. आहे. रोप मोठे झाल्यावर एकदाच अळीसाठी निमऑईलची फवारणी केली व खतात सुध्दा केवळ शेणखताचा वापर केला. त्यामुळे परसबागेत हे पीक पूर्णपणे सेंद्रीय पद्धतीने घेतले. एकवेळा ब्रोकोली तोडल्यानंतर त्याच झाडावर तीन वेळा पुन्हा ब्रोकोली उगवते, हे विशेष. आसपास कुठेही ब्रोकोलीचे पीक घेतल्याचे दिसत नसून चांदूर रेल्वे शहरात मात्र सदर पीक यशस्वीरित्या घेण्यात आले. भारतात मुख्यत्वे करून ब्रोकोलीचा हिरवे सॅलॉड या स्वरूपात आहारात उपयोग करतात. त्याचप्रमाणे ब्रोकोलीपासून पराठा, सूप तयार केले जाते. ब्रोकोलीत पाणी, कॅलरीज, कार्बोदके, साखर, तंतूमय तसेच स्निग्ध पदार्थ, प्रथिने, जीवनसत्त्वे व विविध खनिजे असतात. ब्रोकोलीच्या गड्ड्यांत महत्त्वाची अँटी-ऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे विविध प्रकारचे कर्करोग रोखणे शक्य होते.
 
ब्रोकोली खा, आयुष्य वाढवा : पद्मा युनाते
अतिशय पौष्टिक व आयुर्वेदिक असलेल्या ब्रोकोलीविषयी जनजागृती होण्याची गरज आहे. आरोग्याच्या दृष्टीने विचार केल्यास हे पीक प्रोटीन, कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन ए व सी यांचा समावेश असलेले आहे. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. कर्करोग, मधुमेहासारखे आजार रोखून पचनक्रिया सुधारते, असे पद्मा विवेक युनाते म्हणाल्या.