आयुर्वेदानुसार आहार, विहाराचे नित्यपालन आवश्यक

    दिनांक :15-Jan-2021
|
- रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत
- वैद्य राजेश गुरू यांचे मत
नागपूर, 
स्वस्थ जीवन जगण्यासाठी आयुर्वेदातील सहा ऋतुनुसार आहार, विहाराचे नित्यनियमाचे पालन करणे आवश्यक आहे. महत्वाचे म्हणजे, या जीवनपद्धतीमुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते, असे मत गुरुकुल आयुर्वेदचे वैद्य राजेश गुरू यांनी व्यक्त केले.

g_1  H x W: 0 x 
 
 
वैद्य गुरू पूढे म्हणाले, कोरोना महामारीच्या काळात असे दिसून आले की, ज्यांची जीवनपद्धती म्हणजेच आहार, विहार आणि रोगप्रतिकारकशक्ती उत्तम आहे असे कोरोना बाधित रुग्ण लवकर बरे झाले. तर ज्यांना विविध आजार आहेत व व्यसन जडले आहे अशांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे निरोगी जीवनासाठी रोगप्रतिकारकशक्ती उत्तम ठेवणे आवश्यक आहे. या जीवनपद्धतीविषयी आयुर्वेदामध्ये आधीच सांगितले आहे. मात्र, ज्यांनी या जीवनपद्धतीचे नित्यनियमाने पालन केले त्यांना लाभ झाला. आयुर्वेदामध्ये ऋतुनुसार आहारावर भर देण्यात आला आहे. हिवाळ्यामध्ये बल दायक पदार्थ खाणे, दररोज स्नान करण्यापूर्वी अभ्यंग करणे, घरबाहेर जाताना नाकाला थोडे तुप लावणे, बाहेरून आल्यानंतर गरम पाण्याने हात-पाय धुणे आधी गोष्टी कराव्या.
 
 
लहान मुलापासून ते 80 वर्षांपर्यंतच्या वयोवृद्धापर्यंत प्रत्येकाचा आहार सारखा नसतो. त्याततही घरात, कार्यालयात सतत वातानुकुलित भागातच राहणारे, दुचाकीने, ऑटो-रिक्षाने कार्यालयात ये-जा करणारे तसेच शारीरिक श्रम करणारे कामगार या सर्वांच्या दैनदिन जीवनपद्धतीनुसार त्यांचा आहार निश्चित होता. त्यामुळे दैनदिन पद्धतीनुसार सुयोग्य आहार घेणे गरजेचे आहे. शरीर स्वस्थ तर मन स्वस्थ. यासाठी रोज सकाळी उठून योगासन, प्राणायम आणि व्यायाम केला पाहिजे. ज्यांना व्यायाम करणे शक्य नसेल अशांनी किमान सकाळी एक दोन किमी पायी चालले पाहिजे. कारण पायी चालण्याने संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. जे नागरिक स्वस्थ आहेत अशांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना तर रुग्णांनी आजारातून बरे होण्यासाठी आयुर्वेद आणि पंचकर्म उपचार पद्धतीचा स्विकार करावा असेही वैद्य राजेश गुरू म्हणाले.
 
 
अती सर्वत्र वर्जेन :-
बदलत्या काळानुरुप जीवनपद्धतीमध्ये मोठा बदल झाला आहे. आज लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वच जण अधिकतर वेळ मोबाईल घालवितात, तसेच प्रमाणापेक्षा अधिक पाणी पिणे, भूक लागली नसतानाही सतत खात राहणे या सवयी लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. या सवयीमुळे अग्नी मंद होणे, पचन बिघडणे, बहुमुत्रता सुरू होणे, रक्त अल्पता असे दुष्परिणामी होतात. त्यामुळे नागरिकांनी ‘अती सर्वत्र वर्जेन’ केले पाहिजे असा मोलाचा सल्लाही यावेळी वैद्य गुरु यांनी दिला.