श्रीमंतीसाठी गुंतवणुकीचा सर्वंकष विचार आवश्यक!

    दिनांक :18-Jan-2021
|
अर्थचक्र
असेट अ‍ॅलोकेशन केल्याशिवाय संपत्ती निर्माण करता येत नाही, यासंदर्भात आपण गेल्या सोमवारी माहिती घेतली. तसेच फिक्स डिपॉझिट आणि इक्विटी असे दोन प्रकार आपण पाहिले. उर्वरित प्रकारांची माहिती आज आपण घेणार आहोत. शेअर बाजाराशी संबंधित गुंतवणूक प्रकारात म्युच्युअल फंड नावाचा एक प्रकार आहे. अनेकांची धारणा अशी आहे की, म्युच्युअल फंड म्हणजे शेअर बाजारात पैसे गुंतविणे आणि त्यात प्रसंगी पैसे बुडतात. एक गोष्ट मी स्पष्ट करतो की, म्युच्युअल फंड गुंतवणूक म्हणजे फक्त शेअर बाजारात गुंतवणूक नव्हे. त्यात अनेक पर्याय आहेत. त्याची सविस्तर चर्चा आपण याच सदरात नंतर सविस्तरपणे करणार आहोतच. आज फक्त असेट अ‍ॅलोकेशन प्रकारात मोडणार्‍या डेट वर्गवारीतील काही गुंतवणूक पर्यायांचा फक्त उल्लेख मी येथे करणार आहे.
 
A_1  H x W: 0 x
 
डेट म्युच्युअल फंड
म्युच्युअल फंड प्रकारात डेट आणि इक्विटी असे दोन प्रकार आहेत. त्यातील डेट प्रकार हा मनी मार्केटशी संबंधित आहे, तर इक्विटी प्रकार शेअर्सशी संबंधित आहे. विशेष म्हणजे डेट म्युच्युअल फंड प्रकारातील कोणत्याही योजनेतील गुंतवणूक शेअर्समध्ये होत नाही. त्यामुळे ही गुंतवणूक कमी जोखमीची असते. गेल्या 10 वर्षांचा विचार केला, तर या प्रकारातील बहुतेक प्रकारांनी 9 टक्के किंवा त्यापेक्षा अधिकचा परतावा दिलेला आहे. या चार प्रकारच्या योजनांमध्ये क्रेडिट रिस्क फंड, कॉर्पोरेट बॉण्ड फंड, जी सेक फंड आणि ट्रेझरी बिल फंड यांचा समावेश होतो.
 

A_1  H x W: 0 x 
 
शेअर बाजाराच्या इक्विटी प्रकारातील गुंतवणूक प्रसंगी नकारात्मक जाऊ शकते आणि त्यात नुकसान होण्याची शक्यता आहे. मात्र, डेट प्रकारात गेल्या 10 वर्षांच्या कालावधीत एकही योजना नकारात्मक गेलेली नाही. गेल्या 10 वर्षांत कॉर्पोरेट बॉण्ड वर्गवारीत 9.32 टक्के इतके रिटर्न मिळाले आहेत; तर क्रेडिट रिस्क प्रकारातील फंडस्मध्ये सरासरी 9.40 टक्के रिटर्न गेल्या 10 वर्षांत मिळाले आहेत. याच कालावधीत सरकारी प्रतिभूतींशी संबंधित जी सेक गुंतवणूक प्रकारात 9.28 टक्के परतावा मिळाला आहे; तर ट्रेझरी बिल्स प्रकारात 4.70 टक्के परतावा मिळाला आहे. गेल्या 10 वर्षांत डेट वर्गवारीत मिळालेल्या रिटर्नची आकडेवारी प्रत्येकाला थक्क करणारी आहे. 2011 ते 2020 या 10 वर्षांच्या काळात डेट वर्गातील गुंतवणूक प्रकारांनी दिलेला सरासरी परतावा 9.35 टक्के इतका आहे. विशेष म्हणजे डेट प्रकारातील विविध पर्यायांनी दिलेला परतावा हा गेल्या 10 वर्षांतील महागाईच्या दरापेक्षा अधिक आहे. तसेच आयकर वजा केल्यानंतरही आपल्याला हा गुंतवणूक प्रकार फायदेशीर ठरतो. त्यामुळेच या वर्गवारीकडे गंभीरतेने पाहणे आवश्यक आहे.
 
इक्विटीमध्ये असणारी अनिश्चितता लक्षात घेता, डेटमध्ये काही प्रमाणात गुंतवणूक गरजेची आहे, असे गुंतवणूकशास्त्र सांगते. त्यामुळेच असेट अ‍ॅलोकेशन महत्त्वाचे मानले जाते. विविध पर्यायांचा विचार करून गुंतवणूक केली, तरच योग्य असेट अ‍ॅलोकेशन होतो आणि चांगली संपत्ती निर्माण होऊ शकते.
 
सोन्यातील गुंतवणूक
असेट अ‍ॅलोकेशन प्रकारात गुंतवणूक करताना सोन्यातील गुंतवणूक महत्त्वाची आहे. सोन्यामधील गुंतवणूक चार प्रकारांनी करता येते. त्यात गोल्ड बॉण्ड फंड, गोल्ड इटीएफ, म्युच्युअल फंडातील गोल्ड फंड या तीन प्रकारांत आपल्याला प्रत्यक्ष सोने खरेदी करण्याची गरज नाही, त्यामुळे ही गुंतवणूक सर्वाधिक सुरक्षित आहे. मात्र, आपल्या सोन्यातील गुंतवणूक दागिन्यांच्या स्वरूपात करण्याची सवय आहे. शक्यतोवर आपण सोन्याचे दागिने विकण्याचाही विचार करत नाही. मात्र, सोन्यातील गुंतवणूक एक चांगला पर्याय आहे. गेल्या 10 वर्षांत सोन्यातील गुंतवणुकीने 8.40 टक्के सरासरी परतावा दिलेला आहे. असेट अ‍ॅलोकेशनअंतर्गत सोन्यात गुंतवणूक करणे आवश्यक मानले जाते. ही गुंतवणूक आपल्याला कधीही कामी येते तसेच संतुलन साधण्यासाठी आवश्यक ठरते. सोन्याचा भाव कमी-अधिक होत असतो, त्यामुळे त्याचाही फायदा आपल्याला घेता येऊ शकतो.
 
गुंतवणूक पर्याय आणि वार्षिक रिटर्न
असेट अ‍ॅलोकेशनमध्ये जे विविध गुंतवणूक प्रकार येतात, त्या सर्वांचा एकत्रित विचार होणे आवश्यक आहे. कोणताच गुंतवणूक प्रकार नेहमीसाठी चांगले किंवा सर्वाधिक रिटर्न देऊ शकत नाही. इक्विटी प्रकारांतर्गत लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप आणि इंटरनॅशनल इक्विटी असे चार प्रकार आहेत. डेट गुंतवणूक प्रकारात कॉर्पोरट बॉण्ड, जी सेक, ट्रेजरी बिल्स आणि क्रेडिट रिक्स असे चार प्रकार आहेत. यासोबतच या ठिकाणी आपण इंटरनॅशनल इक्विटी, गोल्ड आणि रिअल इस्टेट या असेटसचा विचार केलेला आहे. गेल्या 10 वर्षांत सर्वाधिक रिटर्न कोणत्या प्रकाराने दिले तसेच सर्वात कमी रिटर्न कोणत्या प्रकाराने दिले, यावर आपण नजर टाकू या...
 
प्रत्यक्ष कृती
आपली प्रत्यक्ष गुंतवणूक कोणत्या प्रकारात आहे, त्याची एक सविस्तर यादी तयार करावी. असेट अ‍ॅलोकेशनविषयी विचार करताना वरील सर्व गोष्टींचा विचार करणे अपेक्षित आहे. असेट अ‍ॅलोकेशनच्या संदर्भात आपली रणनीती कशी असावी, याविषयी पुढील भागात आपण चर्चा करणार आहोत. हा विषय समजून घेण्यासाठी आपण तशवोपशू या यूट्युब चॅनेलवर भेट देऊ शकता. 
 
- प्रसाद हेरंब फडणवीस
9860159002
(लेखक आर्थिक विषयाचे अभ्यासक आणि सल्लाागार आहेत.)