- स्वाभिमानच्या अनोख्या आंदोलनाने प्रशासनाची उडाली भंबेरी
यवतमाळ,
शहरातील दारव्हा मार्गावरील नेताजीनगर भागातील सार्वजनिक शौचालय मागील अनेक महिन्यांपासून बंद असल्याने सोमवार, 18 जानेवारी रोजी स्वाभिमान कामगार संघटनेचे अध्यक्ष नीरज वाघमारे यांनी नगर परिषद मुख्याधिकार्यांना संडासच्या सिटवर निवेदन लिहून नपची अकार्यक्षमता व हलगर्जीपणाचा निषेध केला.
नेताजीनगर हा भाग अत्यंत मागास असून येथे राहणारे सर्व रहिवासी दुर्बल असून अतिक्रमणधारक असल्याने यांच्याकडे जागेअभावी शौचालय बांधण्यात अडसर आहे. यामुळे येथील सर्व रहिवासी बहुधा नपच्याच सार्वजनिक शौचालयाचा वापर करतात. त्याकरिता नपने शासकीय गोदामाच्या बाजूच्या जागेत शौचालयाच्या मोठमोठ्या वास्तूही बांधल्या. मात्र सध्या या वास्तू अनेक समस्यांचे माहेरघर बनल्याने निरुपयोगी ठरल्या आहेत. येथील शौचालयात गेल्या कित्येक महिन्यांपासून स्वच्छतेची व्यवस्था, पाण्याचा पुरवठा, विजेची व्यवस्था, शौचालयास दारे व खिडक्या नसल्याने ही शौचालये पूर्णपणे दुरुपयोगी ठरत असल्याने बंद अवस्थेत आहे. यामुळे येथील महिलांना व रहिवाशांना शौचाकरिता उघड्यावर जावं लागत आहे.
याबाबत येथील नागरिकांनी अनेकदा नप प्रशासन व लोकप्रतिनिधीना लेखी व तोंडी तक्रारीसुद्धा केल्या. मात्र, कुठलीही कारवाई न झाल्याने अखेर स्वाभिमान कामगार संघटनेचे अध्यक्ष नीरज वाघमारे यांच्यासह त्यांच्या सहकार्यांनी यवतमाळ नप मुख्याधिकारी सुनील बल्लाळ यांना संडासच्या शिटवर निवेदन देऊन हे शौचालय तत्काळ पूर्ववत करून येथील संरक्षण भिंत उंची वाढवावी, अशी मागणी केली. या अभिनव आंदोलनाची तत्काळ दखल घेत, मुख्याधिकार्यांनी संबंधितांना सूचना दिल्या. लवकरात लवकर ही शौचालये सर्व सोयीसुविधायुक्त करून सुरू करून देण्याचे आदेश दिले.