२६ जानेवारीला जम्मू-काश्मिरात हल्ल्याचा कट

    दिनांक :20-Jan-2021
|
- अल्-बद्रच्या अतिरेक्यांना प्रशिक्षण
श्रीनगर,
प्रजासत्ताक दिनाला जम्मू-काश्मिरात मोठा अतिरेकी हल्ला घडवण्याचा कट पाकिस्तानने रचला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. हा हल्ला घडवण्यासाठी पाकिस्तानी लष्कर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात अल्-बद्र संघटनेच्या अतिरेक्यांना मागील दोन महिन्यांपासून प्रशिक्षण देत आहे. अल्-बद्रचे अतिरेकी आणि पाकिस्तानी लष्करातील अधिकाऱ्यांत दूरध्वनीवर झालेल्या संभाषणाची ध्वनिफित भारतीय गुप्तचर यंत्रणांनी मिळवली आहे, असे सूत्रांनी सांगितले. काश्मीरमध्ये मोठा घातपात घडवण्याचा कट पाकिस्तानात रचला जात असल्याचे या चर्चेतून स्पष्ट झाले आहे. अल्-बद्रच्या अतिरेक्यांव्यतिरिक्त आणखी आठ अतिरेक्यांना मागील दोन महिन्यांपासून विशेष प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
 
 
al_1  H x W: 0
 
अल्-बद्रचे अतिरेकी आयईडी हल्ल्यांसाठी कुख्यात आहेत. पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयचे कर्नल वसिम आणि कर्नल रियाझ या अतिरेकी गटाला प्रशिक्षण देत आहेत. शस्त्रांचा वापर, मोठे स्फोट घडवून आणण्यासाठी लहान ड्रोनचा वापर करण्याबाबतचे प्रशिक्षण आयएसआय अतिरेक्यांना देत आहे. पाकिस्तानी लष्कराचे वरिष्ठ अधिकारी ब्रिगेडियर काशिफ यांनी अलिकडेच छंब येथील टिल्ला परिसरात असलेल्या दहशतवादी प्रशिक्षण शिबिराला भेट दिल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेला मिळाली आहे. या शिबिरातील अतिरेक्यांनी आयईडी बनवण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. पाकिस्तान दहशतवादी हल्ल्याचा कट रचत असल्याची माहिती मिळताच, जम्मू-काश्मीरमधील पोलिस प्रशासन सतर्क झाले असून, पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.