महिलांव्दारा निर्मीत व संचालित तेजस्वी सोलर एनर्जी;राज्यात पहिला प्रयोग

    दिनांक :20-Jan-2021
|
तभा वृत्तसेवा
वर्धा, 
सोलर पॅनल निर्मीतीचे काम देशात साधारणत: मोठ्या कंपन्यांमार्फत केले जाते. मात्र, वर्धा जिल्ह्यातील फारसे शिक्षण न झालेल्या बचत गटाच्या महिलांनी सोलर पॅनल निर्मितीसारख्या तांत्रिक कामामध्ये प्रावीण्य मिळवून उद्येगात भरारी घेतली आहे. ग्रामीण भागातील महिला बचत गटामार्फत सोलर पॅनल निर्मितीचा उद्योग उभारणे हे महाराष्ट्रातील पहिलेच आणि देशातील दुसरे उदाहरण आहे.

a _1  H x W: 0  
 
 
देवळी तालुक्यातील कवठा झोपडी गावात उमेद अभियानांतर्गत बचत गट व ग्रामसंघ तयार करण्यात आले. महिलांच्या एकत्रीकरणातूनच उद्योगाची संकल्पना पुढे आली. या गावातील तेजस्वी सोलर एनर्जी मागासवर्गीय संस्था म्हणजे स्वतः महिलांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी बनवलेली एक महिला औद्योगिक को-ऑपरेटीव्ह संस्था आहे. तेजस्वी सोलर एनर्जीची सुरुवात मार्च 2018 मध्ये झाली. तत्कालीन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या प्रयत्नातून समाजकल्याण विभागमार्फत नावीन्यपूर्ण योजनेतून ग्रामसंघासाठी 2 कोटी 62 लाखाचे भागभांडवल तेजस्वी सोलर एनर्जी मागासवर्गीय संस्थेला मंजूर करून त्यापैकी 1 कोटी 83 लाख उपलब्ध करून दिले आहे .
 
 
तेजस्वी सोलर एनर्जी मागासवर्गीय महिला औद्योगिक प्रकल्पाची नोंदणी को-आपरेटीव्ह सोसायटी अंतर्गत करण्यात आली असून त्यामध्ये 214 महिला समभागधारक आहेत. त्यापैकी 200 महिला मागासवर्गीय आहेत. प्रकल्पासाठी तांत्रिक मार्गदर्शन आय. आय. टी. मुंबईचे प्रकल्प व्यवस्थापक अमित देशमुख यांनी केले आहे. या प्रकल्पातील 12 महिलांना दुर्गा सोलर एनर्जी (डुंगरपुर राजस्थान) येथे सोलर पॅनल निर्मितीचे प्रशिक्षण दिले आहे. वर्षभर देशमुख यांनी गावात राहून महिलांना विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले. यात कंपनी चालविण्यासाठी लागणारे कौशल्य, माहिती तंत्रज्ञान, आर्थिक व्यवस्थापन, अकाऊंट, टॅली, कच्चा माल ऑनलाईन मागविणे, मार्केटिंग इत्यादी संपूर्ण प्रशिक्षण आय आय टी मुंबई यांनी दिले.
 
 
सुरूवातीला 12 महिलांनी प्रशिक्षण प्राप्त केल्यानंतर गावात आल्यावर सोलर लॅम्प बनविणे चालू केले व एक हजार लॅम्प तयार करून 2 लाखाची विक्री सुद्धा केली.कवठा (झोपडी) या गावात कंपनीच्या इमारतीचे पूर्णपणे बांधकाम झाले असून पॅनल तयार करण्याचे काम सुरू आहे. तसेच सोलर पॅनल, सोलर स्ट्रीट लाईट व सोलर होम लाईट इत्यादी बनविण्याचे कामही महिला करीत आहेत. महिलांव्दारा संचालित या कंपनीला 40 लाख रुपयांचे ग्रामीण भागात स्ट्रीट लाईटचा पुरवठा करण्याचे काम मिळाले आहे.
 
 
वर्धा जिल्हा हा नेहमीच बचतगटांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाकरिता अग्रेसर राहिलेला आहे. देवळी तालुक्यातील कवठा झोपडी, येथील तेजस्वी सोलर एनर्जी प्रकल्पामार्फत सोलर पॅनल, सोलर स्ट्रीट लाईट, सोलर होम लाईट बनविण्यात येत आहेत. महिलांना शाश्वत रोजगार मिळून देणे हा या प्रकल्पाचा उदेश आहे यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या उत्पादनात वाढ होऊन जीवनमान उंचावण्यास मदत होणार असल्याची प्रतिक्रिया मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिली.