विदर्भस्तरीय खो-खो स्पर्धा १८ पासून

    दिनांक :21-Jan-2021
|
- मुसेवाडी येथे होणार आयोजन
 
नागपूर, 
श्रीराम क्रीडा मंडळ मुसेवाडीतर्फे(रामटेक) रामटेकचे आ. अ‍ॅड. आशिष जयस्वाल यांच्या मार्गदर्शनात १८ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत राज्यस्तरीय (विदर्भस्तरीय) पुरुष व महिलांच्या खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेला नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळ नागपूरचे विशेष सहकार्य असल्याची माहिती श्रीराम क्रीडा मंडळाचे सचिव योगेश घुग्गुसकर यांनी पत्रपरिषदेत दिली.
 

khokho_1  H x W 
 
मुसेवाडी येथील मातोश्री काशिदेवी माध्यमिक विद्यालयाच्या मैदानावर सामने होणार असून यात पुरुषांचे १६ तर महिलांचे आठ संघ सहभागी होतील. स्पर्धेसाठी तीन मैदाने तयार करण्यात येत असून सामने साखळी व बाद पद्धतीने खेळविण्यात येईल. १८ तारखेला दुपारी चार वाजता स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. २१ तारखेला सकाळी उपांत्य तर सायंकाळच्या सत्रात अंतिम सामना खेळविला जाईल. त्यानंतर पुरस्कार सोहळा होईल. एकूण एक लाख रुपयांचे पुरस्कार स्पर्धेत देण्यात येणार आहे. विजेत्या व उपविजेत्या संघाला रोख पुरस्कार आणि आकर्षक करंडक देण्यात येईल. याशिवाय अनेक वैयक्तिक पुरस्कार देखील देण्यात येणार आहे.
 
 
सहभागी संघातील खेळाडू, पंच आणि पदाधिकारी यांची निवास व भोजन व्यवस्था आयोजकांतर्फे करण्यात येणार आहे. स्पर्धेला जिल्हा व विदर्भ खो-खो संघटनेची मान्यता असून २०१८ मध्ये झालेल्या स्पर्धेत पुरुषांत तुळजाई क्रीडा मंडळ खल्लार आणि महिलांत विदर्भ क्रीडा मंडळ काटोलने विजेतेपद मिळविले होते. पत्रपरिषदेला अध्यक्ष किरण घुग्गुसकर, नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळाचे सचिव प्रशांत जगताप, विदर्भ खो-खो संघटनेचे सचिव सुधीर निंबाळकर, अतुल कडू, पलाश जोशी, रोशन गायधने, पियुष भारद्वाज आदी उपस्थित होते.
कोरोना नियमांचे पालन
स्पर्धेत सहभागी होणाèया संघातील सर्व खेळाडूंना स्पर्धेच्या आठ दिवस आधी आरटी - पीसीआर चाचणी करणे अनिवार्य आहे. त्याचप्रमाणे सामने सुरू झाल्यावर मैदानावर फक्त सामने खेळणाèया संघांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. इतर संघाना निवासाच्या ठिकाणीच राहावे लागेल, असेही घुग्गुसकर यांनी सांगितले.