मुंडे यांच्या विरुध्दची तक्रार दबावातूनच मागे घेतली!

    दिनांक :22-Jan-2021
|
-‘सेटींग-फिटींग’च्या राजकारणात दाबले गेले गंभीर प्रकरण
- सुधीर मुनगंटीवार यांचा आरोप
तभा वृत्तसेवा
चंद्रपूर,
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुध्द बलात्काराची गंभीर तक्रार केवळ दबावातून मागे घेतली गेली. सत्तेत असलेल्यांवर अशा प्रकारचा आरोप झाला तर त्यांचा राजीनामा एवढ्यासाठीच मागितला जातो, की ती व्यक्ती सत्तेचा गैरफायदा घेऊन फिर्यादीवर दबाव आणू नये. याप्रकरणी अखेर तेच झाले. ‘सेटींग-फिटींग’च्या राजकारणात तक्रारकर्तीला तिची तक्रार मागे घ्यावी लागली, असा आरोप राज्याचे माजी अर्थमंत्री तथा लोकलेखा समितीचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी येथे केला.
 
munna_1  H x W:
 
महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध एका महिलेने अत्याचाराचे गंभीर आरोप करीत मुंबई पोलिसात तक्रारही दाखल केली होती. विषयाचे गांभीर्य ओळखून मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यायलाच पाहिजे, अशी मागणी भाजपाच्या नेत्यांनी केली होती. त्यामागे तक्रारकर्तीवर दबाव येऊ नये, हा उद्देश होता. मात्र, राजीनाम घेतला गेेला नाही आणि झाले अखेर तेच, तक्रारकर्तीने तक्रार मागे घेतली. हे सत्तेच्या दबावानेच घडले, असा आरोप मुनगंटीवार यांनी केला.
 
ते पुढे म्हणाले, एखादी खोटी तक्रार दिली गेली, तर तक्रारकर्त्यावर गुन्हा दाखल होतो. गंभीर आरोप असल्यास त्यास अटकही होते. याप्रकरणी मात्र अटक झाली का, नाही झाली. याचाच अर्थ कुठेतरी दबावतंत्र राबवले गेले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी मुनगंटीवार यांनी यावेळी केली आहे.