- केंद्रीय आरोग्य सचिवांचे स्पष्टीकरण
नवी दिल्ली,
भारतात तयार होणार्या कोरोना लसींची विक्री खुल्या बाजारात होणार नाही. सरकारने अशा विक्रीला मान्यता दिली नाही, अशी माहिती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आज शनिवारी दिली. यामुळे लसीच्या विक्रीबाबत असलेला संभ्रम आता दूर झाला आहे.
ज्या लोकांना कोरोना लसीची सर्वाधिक आवश्यकता आहे, त्यांना लसीकरणात प्राधान्य देण्याची सरकारची भूमिका आहे. सात ते आठ महिन्यांच्या कालावधीत केवळ अशाच लोकांचा लसीकरणात प्राधान्याने विचार करण्यात येणार आहे. सरकारने देशात तयार होणार्या किंवा विदेशातील कोणत्याही कोरोना लसीला खुल्या बाजारात विक्रीची परवानगी दिली नाही आणि तसा विचारही नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
देशात आणि विदेशात ज्या लसी तयार होत आहेत. त्यांच्या केवळ पहिल्या दोन चाचण्यांचेच सकारात्मक परिणाम समोर आले आहेत. तिसर्या टप्प्यातील चाचणीचे परिणाम अजूनही बाहेर आले नाही. ते सकारात्मक आल्यानंतरच कोरोना लसीला खुल्या बाजारात विक्रीची मान्यता मिळू शकेल, असे ते म्हणाले. जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन् यांनीही अशाच प्रकारचे मत व्यक्त केले आहे. कोरोना लसीच्या तिसर्या टप्प्यातील परिणाम तपासूनच, लस खुल्या बाजारात विक्री करायची की नाही, यावर निर्णय घेतला जावा, असे त्यांनी सांगितले होते.