नेताजी अन् सुभाषवाद!

    दिनांक :24-Jan-2021
|
125 व्या जयंतिवर्षानिमित्त...
 
- डॉ. कुमार शास्त्री
नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 125 वी जयंती 23 जानेवारीला संपूर्ण भारतात ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरी झाली. जेव्हाजेव्हा सुभाषबाबूंच्या उज्ज्वल कार्यगौरवाची आठवण होते, तेेव्हा प्रत्येक देशभक्त मन कुठंतरी आतून कळवळून उठतं, जागं होतं अन् क्रांतियुद्धाचे तेजस्वी ‘सुभाष-समर पर्व’ स्वत:च्या रक्ताने लिहून काढणार्‍या, या क्रांतिवीराला शतप्रणाम करतं!
 
 
netaji_1  H x W
 
‘आपुले मरण पाहिले म्या डोळा’ या तीव्र यातनांचा जीवनानुभ अनुभवलेले हे रणझुंझार व्यक्तिमत्त्व. कधीकधी वाटतं, देशाचे स्वातंत्र्यही संन्यस्त वृत्तीने सुभाषबाबूंनी बघितले असेलच. कारण, स्वातंत्र्यश्रेय अन् सत्तास्पर्धा यातून तर ते केव्हाच बाहेर पडले होते. जीवनाचा अनासक्तयोग ते स्वातंत्र्य देवतेसाठी जगलेत. वीरश्री आणि मोक्षश्री यांच्या कुशीत सुभाषबाबू अमर झालेत. गुरुदेव रवीन्द्रनाथ टागोर सुभाषबाबूंना ‘देशनायक’ पदवी देताना एक सारगर्भ पत्र लिहितात- ‘प्रिय सुभाष, मी बंगाली कवी, आज वंगदेशाच्या वतीने तुला ‘देशनायक’ ही पदवी देऊन, तुझं स्वागत करतो. गीतेत म्हटलं आहे- देशाच्या अंतर्वेदनेतूनच देशाचा ‘नायक’ निर्माण होत असतो. जे देशाचे स्वभावसिद्ध खरेखुरे प्रतिनिधी असतात ते कधीच एकटे नसतात. ते सार्वजनिक असतात आणि संपूर्ण काळावर त्यांचा अधिकार असतो. ते वर्तमानाच्या गिरिशिखरावरून भविष्याच्या सूर्योदयाला अर्घ्यदान करतात... तू खरा राष्ट्रनेता आहे!’
 
 
गुरुदेवांच्या शब्दांप्रमाणे ते खर्‍या अर्थाने ‘नेताजी’ होते. नेपोलियनने जसे झोपलेल्या युरोपला जागवले तसे पराभूत भारतीय सेनेत ‘राष्ट्रवादाचे’ प्राण फुंकून किती प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आझाद हिंद सेना, आझाद हिंद ‘प्रतिसरकार’ उभं केलं! फ्रेंच क्रांतिकारकांनी पॅरिसचा बॅस्टिल तुरंग फोडून त्यातील राजकीय कैद्यांना जसे मोकळे केले, त्याच धर्तीवरील भारतीय पराभूत सैन्याला जर्मनी-जपानच्या ‘हिटरल-टोजो’च्या कैदेतून सोडवून पुन्हा लढण्यासाठी उभे करणे, हे अद्वितीय महान कार्य होते. आझाद हिंद सेना आगेकूच करत होती, आझाद हिंद सेनेच्या तोफांनी ‘अंदमान’ जिंकले. ‘कोहिमा’ आणि ‘इन्फाल’च्या टेकड्यांवर तिरंगा फडकत होता. हिंदवी स्वातंत्र्याचे तेजाचे, शौर्याचे ते ‘पर्व’ जग बघत होते, ‘चलो दिल्ली’चा नारा भारतीयांच्या आकांक्षांना फुलवत होता. पण, याच वेळी देशाचे तत्कालीन शीर्षस्थ नेतृत्व मात्र सुभाषबाबूंना माथेफिरू, देशद्रोही, बहकलेला पुढारी, म्हणत होते! राजकीय उपहास, अक्षम्य आत्मक्लेश अन् मरणोत्तर उपेक्षा, याशिवाय सुभाषबाबूंना काय मिळालं?
 
 
एकीकडे या देशातील शीर्षस्थ नेतृत्व सुभाषबाबूंचा उपहास करत असताना जग मात्र ‘सुभाष-हिटलर’, ‘सुभाष-टोजो’ यांच्या भेटीने स्तिमित होत होते. उगाचच नाही, स्वातंत्र्य देण्यापूर्वी ब्रिटिश पंतप्रधान अ‍ॅटलीने, इंग्लंडचे स्वतंत्र पक्षाचे नेते फ्रेनर ब्रॉकवे यांनी सुभाषबाबूंच्या समरगाथेला स्वातंत्र्याचे श्रेय दिले! इंग्लंडची घसरती अर्थव्यवस्था, उफाळलेले नाविक बंड, भारतीय सैन्यातील असंतोष लक्षात घेऊनच इंग्रजांना ‘स्वातंत्र्य’ देणे मुत्सद्यीपणाचे वाटले होते. हा सगळा इतिहास आहे.
खरंतर इंग्रज सरकारने सुभाषबाबूंना नेमके ओळखले होते. सुभाषबाबूंची त्यांना खरी भीती वाटत होती. याचे कारण सुभाषबाबूंनी उभा केलेला इंग्रजांविरुद्धचा लढा व कार्यक्रम! आणि ते ‘तत्त्वज्ञान’ होतं ‘सुभाषवाद!’
काय आहे हा ‘सुभाषवाद’, कोणतं तत्त्वज्ञान, कोणता कार्यक्रम सुभाषबाबूंचा होता? आम्हाला उदारमतवाद, साम्यवाद, समाजवाद, गांधीवाद माहीत आहे, पण ‘सुभाषवाद’ हे नाव तरी नवीन पिढी वा अभ्यासकांनी वाचलंय का? ‘सुभाष-समराचं पर्व’ समजावून घ्यायचं असेल, तर ‘सुभाषवाद’ समजून घ्यायला हवा.
तरुण भारतचे संस्थापक संपादक व साहित्यिक भाऊसाहेब माडखोलकरांनी ‘सुभाषवादा’वर सात मोठे अग्रलेख अप्रतिम लिहिलेले आहेत, ते मुळातून वाचायला हवेत.
डॉ. वि. स. जोग, प्राचार्य राम शेवाळकर, शेषराव मोरे यांनी सुभाषचंद्र जन्मशताब्दीच्या वेळी, ‘देशगौरव सुभाषचंद्र बोस’ हा कृतज्ञता-अभिवादन ग्ंरंथ म. रा. सांस्कृतिक मंडळातर्फे प्रकाशित केलाय्. त्यात ‘सुभाषवाद’ यावरील सातही अग्रलेख प्रसिद्ध केले आणि सुभाषबाबूंच्या तात्त्विक विवेचनाचा परामर्श घेतलाय्.
 
 
‘सुभाषवाद’ हे सुभाषचंद्रांच्या उर्जस्वल व्यक्तिमत्त्वाचे दर्पण आहे. सुभाषवाद स्वातंत्र्यसिद्धीचा एक अभिनव मार्ग होता. सुभाषवादाची तात्त्विक भूमिका ही, आंतरराष्ट्रीय कायदा, नैसर्गिक तत्त्व, युरोपचा दीडशे वर्षांचा इतिहास, जागतिक स्वातंत्र्ययुद्धे, लष्करी डावपेच, युद्धनीती व धोरण या मुद्यांवर आधारित आहे. इथे वादाचा एकच भाग होता की, व्यवहार्य पातळीवर ‘सुभाषवाद’ राबवता येईल काय? पण, सुभाषबाबूंनी सुभाषवादातील तात्त्विक भूमिका केवळ भाषणातून नव्हे, तर कृती व कार्यक्रमातून राबविली. आझाद हिंद सेना, आझाद हिंद सरकार, मंत्रिमंडळ व प्रतिसरकारची स्थापना, आझाद हिंद बँक, आझाद हिंद सेनेची रणनीती, ही सगळी कार्यकर्तृत्वे सुभाषवादातूनच उभी केली, याची ऐतिहासिक नोंद आहे. या कार्यकर्तृत्वाची, तिच्या यशापयशाची नोंदही इतिहासाने घेतली, हे विशेष!
 
 
संक्षेपाने, ‘सुभाषवादा’त सुभाषबाबूंची तात्त्विक भूमिका आणि उद्दिष्ट्ये स्पष्ट होतात. सुभाषबाबूंना भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे ‘आंतरराष्ट्रीयीकरण’ करायचे होते. कारण जगासमोर इंग्रजांची दडपशाही, आतंकी, अन्यायाची लक्तरे टांगायची होती. ब्रिटिश साम्राज्यशाहीविरुद्ध लढताना, आंतरराष्ट्रीय लष्करी सहकार्य घेणे, हा लष्करी डावपेच साधायचा होता. तो आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीचा एक भाग होता.
 
या सर्वांमध्ये महत्त्वाची अन् राष्ट्रीय शोकांतिका अशी होती की, आम्ही स्वातंत्र्ययुद्ध ब्रिटिश साम्राज्यशाहीविरुद्ध लढत होतो, पण आमच्याजवळ ‘स्वातंत्र्यसैन्य’च नव्हते! जागतिक महायुद्धे लढणार्‍या ब्रिटिश साम्राज्यशाहीला भारतीय स्वातंत्र्य आंदोलन चिरडून टाकणे काय कठीण होते? हे खरे वास्तव सुभाषबाबूंनी ओळखले होते. इथूनच ‘सुभाषवादा’च्या चिंतनाची सुरवात त्यांच्या मनात सुरू झाली.
 
सुभाषबाबूंचा राजकारणातील प्रवेशच धगधगता आहे. ओटेन प्रकरणात ‘खुदीराम बोस’ यांना आंतकवादी म्हणणार्‍या इंग्रज अधिकार्‍याच्या श्रीमुखात युवा सुभाषने हाणली अन् देशभक्तीचे बंगाली तरुण रक्त ‘नेतृत्व’ म्हणून समोर आले. विद्यार्थिजीवनात मेधावी सुभाषचंद्र आय.ए.एस.मध्ये चौथा क्रमांक पास करत असतानाच आंतरराष्ट्रीय घडामोडींचा, युरोपच्या इतिहासाचा, आंतरराष्ट्रीय कायद्याचा अभ्यास करताना दिसतात. रोमारोला यांनी सुभाषबाबूंनी लिहिलेला ‘इंडियन स्ट्रगल’ हा ग्रंथ संशोधनाचा विषय मानला. तिकडे देशभक्त सुभाषबाबूंना 11 वेळा तारुण्यातच तुरुंग बघावा लागला. ‘मंडाले’च्या तुरुंगात इंग्रजांनी त्यांच्यावर ‘स्लो पॉयझनिंग’चा प्रच्छन्न प्रयोग केला होता, अशी नोंद आहे. याचं कारण इग्रजांना सुभाषबाबूंच्या जाज्वल्य देशभक्तीप्रमाणेच, त्यांच्या आंतरराष्ट्रीय अभ्यासाची नि चिंतनाची दिशा कळून चुकली होती, हे लक्षात येते.
 
‘साधनानाम् अनेकता’ हा लोकमान्यांप्रमाणेच सुभाषबाबूंचाही द़ृष्टिकोन दिसून येतो. विशेष असे, 1921 मध्ये सुभाषबाबू, गांधीजींच्या असहकार आंदोलनात सामील झाले. देशबंधू चित्तरंजन दास त्यांचे राजकीय गुरू होते. 1928 पर्यंत सुभाषबाबू व पं. नेहरू हे दोन मैत्रीपूर्ण तरुण नेते, काँग्रेसच्या अधिवेशनात सरचिटणीसपदी राहिलेत. गांधींनी सुभाषबाबूंना जवळ केले होते व त्यांचे तेजतर्रार नेतृत्व ओळखले होते. सुभाषबाबूंनीच गांधीजींना प्रथम ‘राष्ट्रपिता’ संबोधित केले होते. काँगेस अधिवेशनात लाहोर, कराची, युवक काँग्रेस अधिवेशनात सुभाषबाबूंचा लोकप्रियतेचा कळसाध्याय होता. हरिपुरा काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद गांधींनीच त्यांच्याकडे सोपविले होते. पण, कलकत्ता अधिवेशनात सुभाष यांनी गांधींच्या ‘डोमिनियन स्टेट’- ‘ब्रिटिश साम्राज्यांतर्गत स्वराज्य’ याला विरोध केला. सुभाषबाबूंना देशाचे पूर्ण स्वातंत्र्य हवे होते. तसेच गांधींनी असहकार आंदोलन मागे का घेतले, तेही सुभाषबाबूंना पटले नव्हते. इथूनच गांधी-सुभाष मतभेद वाढलेत.
 
महात्मा गांधींचे सत्य, अंहिसेचे तत्त्वज्ञान हे विश्वशांतीसाठी, मानवी कल्याणासाठी योग्यच आहे. पण, युद्धपिपासू इंग्रजांसाठी महायुद्ध लढणार्‍या देशांसाठी हे तत्त्वज्ञान अव्यवहार्य ठरते, हे सुभाषबाबूंचे स्पष्ट मत होते. विशेष असे, 1921-1938 दोन दशके संपली, पण गांधींच्या सत्य, अंहिसा, सत्याग्रह या सर्वांचा परिणाम मात्र शून्य आहे, हे सुभाषबाबूंचे स्पष्ट मत झाले. दुसरे असे, त्याच वेळी दुसर्‍या महायुद्धाचे ढग जागतिक पटलावर दिसू लागले होते. इंग्रजांचे संकट समोर दिसत होते. England's difficulty is India's opportunity हे लोकमान्यांचे धोरण सुभाषबाबूंना योग्य वाटले. याच कारणांनी हरिपुरा अधिवेशनाच्या अध्यक्षीय भाषणातून सुभाषबाबूंनी ‘संपूर्ण स्वातंत्र्यासाठी दुहेरी लढा’ (राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरून) घोषितच केला. क्रांती उत्पाताशिवाय पर्याय नाही, असेही घोषित केले. या आक्रमक भूमिकेमुळे काँग्रेसच्या तरुणाईने सुभाषबाबूंचे स्वागत केले अन् हाच खरा राजकीय ‘टर्निंग पॉईंट’ भारताच्या राजकारणात ठरला. ‘गांधी-सुभाष’विरोध सुरू झाला. त्रिपुरा काँग्रेसचे वेळी पुन्हा सुभाषबाबू, पट्टाभिसीतारामैया या गांधींच्या उमेदवाराला पाडून निवडून आलेत. पण, काँग्रेस अंतर्गत विरोध अधिकच वाढतच गेला. अखेर सुभाषबाबूंना ‘फॉर्वर्ड ब्लॉक’ हा वेगळा पक्ष स्थापन करावा लागला.
 
वरील सर्व इतिहास संक्षेपाने सांगण्याचे कारण, ‘सुभाषवादा’चे तत्त्वज्ञान उभे होण्यामागे ही सगळी पार्श्वभूमी होती. राजकीय पटलावर गांधींची शांततेची, अंहिसात्मक आंदोलने अपयशी ठरत होती. यामुळे सुभाषबाबूंनी त्यांच्या मनातील ‘सुभाषवाद’ कार्यान्वित करायला सुरवात केली.
 
‘सुभाषवादा’ची भूमिकाच मुळी आंतरराष्ट्रीय कायद्याच्या नैसर्गिक तत्त्वावर आधारित होती. हा कायदा मानतो की, जगातील श्रीमंत साम्राज्यवादी राष्ट्रे इतर गरीब व दुर्बल राष्ट्रांवर अन्याय, अत्याचार करतात, त्यांचे शोषण करतात, पारतंत्र्यात घालतात. यामुळे हे गरीब दुर्बल परतंत्र देश इतर श्रीमंत राष्ट्रांची मदत घेऊन, स्वत:च्या देशाचा स्वातंत्र्यलढा लढू शकतात! इतर देशाचे लष्करी साहाय्य घेण्यात आंतरराष्ट्रीयद़ृष्ट्या काहीच गैर नाही. याच जागतिक कायदेशीर भूमिकेचा स्वीकार सुभाषबाबूंनी केला.
आता युरोपचा इतिहास काय साक्ष देतो ते बघा. जगात झालेल्या स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास सांगतो- इटलीने ऑस्ट्रियन-साम्राज्यशाही विरोधात स्वातंत्र्ययुद्धात इंग्लंड आणि फ्रांसची मदत घेतली व लोकनेता मॅझिनीने इटली दास्यमुक्त केला. आयर्लंडच्या सिनफेनच्या युद्धात डी. व्हीलेरा या नेत्याने जर्मनी व अमेरिकेची मदत घेतली आयर्लंड ब्रिटिशांपासून मुक्त झाला. पहिल्या महायुद्धात पॅडरस्की या स्वातंत्र्यवीराने इंग्लंड व अमेरिकेची मदत घेऊन पोलंडला दास्यमुक्त केले. मुसोलीनीने ‘शत्रूचा शत्रू तो मित्र’ या नात्याने हसबाण व चीनला धडा शिकविला. हा सगळा दीडशे वर्षांचा स्वातंत्र्ययुद्धांचा जागतिक इतिहास आहे. स्वत:च्या देशाला पारतंत्र्यातून मुक्त करणारे, इतर देशांचे साहाय्य घेणारे जागतिक नेते, इटलीचा मॅझिनी, आयर्लंडचा डी. व्हीलेरा, पोलंडचा पॅडरस्की, चीनचा लेनिन, स्टॅलिन, द. गॉल, फ्रान्सचा मॅक्वीझ जगाच्या द़ृष्टीने देशभक्त ठरतात, मग सुभाषबाबूंनी याच ऐतिहासिक साक्षीने जर्मनी व जपानची मदत घेणे हाही लष्करी डावपेचाचाच एक भाग ठरतो. सुभाषबाबूही मॅझिनीप्रमाणे ‘देशभक्तच’ ठरत नाहीत काय?
 
‘इंग्लंडवरील संकट हीच हिंदुस्थानची संधी’ या टिळकांच्या सूत्रवाक्याप्रमाणे, साम्राज्यशाहीविरुद्ध लढण्यासाठी सुभाषबाबूंनी जर आंतरराष्ट्रीय सहकार्य घेतले, तर त्यामागची ही तात्त्विक भूमिका तर्कशुद्ध व जागतिक मान्यतेची होती. या संदर्भात सुभाषबाबू, स्वातंत्त्यवीर सावरकरांना भेटले, डॉ. हेडगेवारांचीही भेट घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला, हे सर्वांनाच ठाऊक आहे. इथे, सुभाषबाबू केवळ तत्त्वज्ञान सांगून, भाषणे देत फिरले नाहीत, तर त्यांनी हिटलर आणि जपानचे टोजो यांची भेट घेऊन, जी आझाद हिंद सेना उभी करण्याचे महत्प्रयासाचे कार्य केले ते अपूर्व आणि अद्भुत आहे.
 
हिटलरसारख्या जागतिक योद्ध्याला सुभाषबाबू ‘बुद्धाची मूर्ती’ भेट देतात. आपल्या वक्तृत्वाची, मुत्सद्यीपणाची छाप पाडून, ते हिटलरचे मन वळवितात. भारतीय कैद्यांना आझाद हिंद सेनेत सामील करून घेतात. शस्त्र, दारूगोळा, नभोवाणी, युद्धतंत्र... सगळं वाटाघाटी करून स्वत: प्राप्त करतात, तेही देशहिताशी तडतोड न करता, विशिष्ट अटींवर सुभाषबाबू हिटलरची मदत घेण्यात सफल होतात. पुढे हिटलरच्याच सांगण्यावरून जपानला जाऊन त्यांचे पंतप्रधान टोजो यांच्याशी सुभाषबाबू वाटाघाटी करतात. जपानची मदत मिळवितात. 40 हजारांची आझाद हिंद सेना उभी करतात. विशेष असे, या आझाद हिंद सेनेचे- सॅल्यूट, कमांडर, युद्धरचना, शस्त्रास्त्रे, युद्धनीती सगळी रचना सुभाषबाबू स्वत: ठरवितात. त्यांनी आझाद हिंद सेनेत महिलांचे पथक उभे केले. कॅ. लक्ष्मी सहगल त्याचे नेतृत्व करीत होत्या, ही बाब स्पृहणीय होती. हे सर्वच एका द्रष्ट्या सेनानीची साक्ष आहे.
 
या संदर्भात सुभाषबाबूंचे कलकत्ता ते पेशावर गुप्तवेशात जाणे- ‘मोहंमद जियाउद्दीन’ असे नाव बदलून जाणे, युरोपात ‘मॅझेटा ओरलँडो’ या नावाने हिटलरची भेट घेणे, जपानमध्ये ‘मासोदा’ नावाने वावरणे... सगळेच व्यवहार नाट्यपूर्ण कादंबरीतील घटनांचे आविष्कार वाटतात, पण ते वास्तव होते.
 
आंतरराष्ट्रीय क्षितिजावर सुभाषबाबूंचा उदय होणे, 21 ऑक्टोबर 1943 ला आझाद हिंद सेनेची स्थापना होणे, 9 जुलै 1944 ला आझाद हिंद सरकारची स्थापना होणे व मंत्रिमंडळ घोषित होणे, त्याला नऊ देशांची मान्यता मिळणे, आझाद हिंद बँकेची स्थापना, भारताचा नवा ध्वज, सिंगापूरहून नभोवाणीवरून नेताजींचे देशाला व सैन्याला उद्बोेधन, ‘चलो दिल्ली’चा प्रसिद्ध नारा, हे सगळंच इतकं लोकविलक्षण नि अद्भुत होतं की, भारतीय जनता हृदयाचे कान करून नेताजींना आकाशवाणीवरून ऐकायची! आकाशवाणी आझाद हिंद सेनेच्या विजयी पर्वाच्या बातम्या देत होती अन् भारतीयांची मने स्वातंत्र्याच्या आकांक्षेने फुलून जायची.
अन् अचानक जपानच्या हिरोशिमावरील अ‍ॅटमबॉम्बच्या हल्ल्याने दुसर्‍या महायुद्धाचे सगळे चित्रच पालटले. जपान हारला, पण सुभाषबाबू हारले नव्हते. ते रशियाची मदत घेण्यासाठी सिद्ध झाले होते. कर्नल हबीब रहमान व बारा जण सोबत होते; तसेच चांदीचे शिक्के, सोने, पैसा घेऊन बॅगांसह सुभाषबाबू निघाले होते. पुढे विमान तैवानला, तपोईला बेटावर पेट्रोल घेण्यासाठी उतरले-पुन्हा उड्डाण घेताना विमानअपघातात काय नेमकं घडलं, हे इतिहासालाही कळू शकलं नाही! विमान अपघातात 18 ऑगस्ट 1945 ला सुभाषबाबू गेले. मृत झाल्याचे घोषित केले गेले. वाळिंबेंच्या प्रसिद्ध कादंबरीत वर्णन आहे. विमानातून सुभाषबाबू आगीच्या लोळांत पडले होते. आजूबाजूला चांदी, सोने- बॅगमधून पडलेले तार्‍यांप्रमाणे चमकत होते. त्यात लालबुंद माणिकाप्रमाणे सुभाषबाबूचा ‘ताराही’ चमकत होता.
 
शिवाजीराव पटवर्धन लिहितात- सूभाषबाबू गेलेत, त्या दिवशी नवजात शिशूंना जन्म देणार्‍या वीरमातांनी आपल्या अर्भकांचे नाव, केशरी टिका लावून ‘सुभाष’ ठेवले अन् नव ‘सुभाषां’चा जन्म झाला...!
सुभाषचंद्रांनी ‘सुभाषवादाचा’ स्वातंत्र्यसिद्धीचा एक अभिनव मार्ग भारतीयांना दाखविला. या सुभाषवादातून ‘स्वातंत्र्याकांक्षा’, ‘वीरवृत्ती’ अन् देशाची ‘विजिगीषा’ ज्वलंत केली. इतिहासाने सुभाषचंद्र यांच्या नेतृत्वाची ‘नेताजी’ म्हणून आणि सुभाषवादाची ‘विजिगीषा’ म्हणून जी दखल घेतली ती भावी पिढ्यांना कार्यस्फूर्ती देणारी आहे, यात शंका नाही! ही आहे ‘सुभाषवादाची गाथा!’
 
125 व्या जयंतिनिमित्ताने नेताजींना शतशत अभिवादन!!!
- 9423613710