शवदीपस्तंभ
डॉ. सुमंत दत्ता टेकाडे
शिवाजीराजांचे 50 वर्षांचे आयुष्य जनसामान्यांना स्तिमित करणारे आहे. साधारणतः तत्कालीन मानवाच्या प्रारब्धात येणारी सर्व संकटे त्यांच्याही आयुष्यात आहेत, पण त्यावर आपल्या पुरुषार्थाने त्यांनी केलेली मात ही सर्वार्थाने वेगळी आहे. सामान्य माणूस जिथे संकटांनी हवालदिल होऊन जातो, तिथे राजे प्रयत्नवादाचा पुरस्कार करताना दिसतात. जिथे आयुष्यातील लहानसहान प्रश्नांनी आपली मती गुंग होऊन जाते, तिथे राजे मात्र कमालीच्या स्थितप्रज्ञतेने प्रत्येक प्रश्नाचा विचार करताना दिसतात. प्राप्त परिस्थितीमध्ये त्याला उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतात. हे करीत असताना दिशा कायम पुढे जाण्याचीच असते (पुरंदर तह हा अपवाद). अंधारावर तासन्तास काठी मारून अंधार पळून जात नसतो, तर एक सामान्य छोटासा दिवा कितीही गडद काळोखावर मात करण्यास सक्षम असतो. समकालीन बहुतांश लोक अंधारावर काठी मारण्यात व्यस्त असताना राजांनी दीपक लावला. लहान का असेना पण संघर्षाचा, आत्मनिर्भरतेचा, लढाऊ बाण्याचा, आत्मसन्मानाचा, महिला सुरक्षेचा वन्ही राजांनी चेतविला. बघता बघता त्याचा वणवा भडकला अन् त्यासरशी आदिलशाही, कुतुबशाही, पोर्तुगीज आणि अंततोगत्वा सामर्थ्यसंपन्न मोगलांनासुद्धा मराठ्यांनी (पुढच्या काळात) गिळंकृत केले.

मराठ्यांमध्ये माना खाली घालून सुलतानांच्या तख्ताची सेवा करणारे सरदार किंवा खर्डेघाशी करणारे कारकून फक्त तयार होतात, असा पातशाहांचा समज होता. त्याला पहिल्याप्रथम तडा दिला तो राजांनी. मराठ्यांमध्ये केवळ लाचारी आणि खर्डेघाशी करणारे नाही तर समशेर उचलून स्वराज्य निर्माण करणारी व अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्याचे (स्वराज्याचे) रक्षण करणारी फोलादी मनगटेही निपजतात, हे त्यांनी दाखवून दिले. राजांच्या हयातीत मराठे- मोगल संघर्ष जवळजवळ 30 वर्षे चालला. त्यातून मराठ्यांना मोगलांच्या शक्तीचा अचूक अंदाज आला. तोपर्यंत एक महाकाय शक्ती म्हणून मोगलांचा जो फुगारा फुगविण्यात आला होता, तो मराठ्यांनी फोडला. हा फुगारा केवळ बाह्य आकाराने मोठा भासत होता, परंतु आतून तो स्वार्थ, व्यक्तिनिष्ठा, चैन, भोगवाद, बेसावधपणा, बेशिस्त अशा अवगुणांनी पार पोखरलेला होता. हे सर्व कच्चे दुवे राजांनी, राजांच्या चाणाक्ष गुप्तहेर अन् मुत्सद्यांनी अचूक हेरले. अत्यंत चलाखीने या सर्वांचा वापर करून त्यांनी मोगलांना अक्षरशः झोडपून काढले. साम्राज्य निर्माण करणे, एका विचाराने संघटना बांधणे, कार्यकर्ते उभे करणे, पैशाचे गणित बसविणे सोपे नसते. आपण एक साम्राज्य निर्माण करू शकतो व ते राखू शकतो, वाढवू शकतो हा विश्वास 300 वर्षांनंतर पुन्हा एकदा निर्माण करणारे शिवराय होत. पुढच्या काळात पेशव्यांनी उत्तरेकडे जी प्रचंड झेप घेतली आणि अवघा उत्तर हिंदुस्थान जिंकण्यासाठी अंगदासारखे भक्कम पाऊल ठेवले, त्यामागचा आत्मविश्वास राजांनी पेरलेला होता.
सुलतानांनी धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय, भौगोलिक अशा सर्वच आघाड्यांवर आक्रमण केले होते. ही इस्लामी धर्मांध आक्रमणे केवळ भारतावरच झालेली नव्हती; भारताच्या आधी अनेक सामर्थ्यसंपन्न संस्कृतींची लक्तरे त्यांच्याच वेशींवर लटकवून हे सुलतान हिंदुस्थानात आले होते. इस्लामने आक्रमण केलेले इजिप्त, ग्रीस, इराणसारखे बलाढ्य देश आज जिवंत आहेत, पण त्यांची प्राचीन संस्कृती पूर्णपणे संपलेली आहे. युनेस्कोने एक हिस्टोग्राम प्रकाशित केला होता. त्यानुसार जगात आजवर 49 संस्कृती अस्तित्वात आल्या, नांदल्या. पण परकीय आक्रमणाच्या वरवंट्याखाली त्यातील इस्त्रायल, चीन आणि हिंदुस्थान या तीन संस्कृती फक्त जगल्या. एक क्षण विचार करा, अशा धुवांधार, धर्मांध वादळाच्या तडाख्यात जी भारतीय संस्कृती सापडली होती, ती वाचली कशी? सुलतानी आक्रमणाच्या सुरुवातीच्या काळापासून अनेक निर्णायक लढाया झाल्या. कधी आपले तर कधी त्यांचे विजय झाले. हे राष्ट्र सातत्याने युद्धमान राहिले. पण सतराव्या शतकाच्या सुरुवातीची परिस्थिती सांगून जाते की संघर्ष पूर्णतः संपला होता. त्यावर अजून 100 वर्ष लोटली असती तर औरंगजेबाच्या विकृत अधर्मवेडाने कदाचित उरलासुरला पराक्रम दडपून टाकण्यात आला असता. हे जर झाले असते तर स्वातंत्र्य, स्वातंत्र्यप्रेरणा या संभवतः लोपल्या असत्या अथवा लांबल्या असत्या. यदाकदाचित स्वातंत्र्यसूर्य दिसेनासा होत आपणही इतर संस्कृतींप्रमाणे आपले अस्तित्वच गमावून बसलो असतो. यात कुठेही अतिशयोक्ती नाही.
मग तसे का झाले नाही? अशी कोणती घटना होती की, ज्यामुळे या तुफानी वार्यांची दिशा कायमची बदलली? नव्हे, थंडावली. केवळ मराठी, महाराष्ट्रीय असल्याचा अभिनिवेश म्हणून नाही तर जो काही थोडाबहुत अभ्यास करण्याची संधी मिळाली, त्यातून पुढचे वाक्य म्हणावेसे वाटते... शिवाजी महाराज होते म्हणूनच ही संस्कृती टिकून राहिली. शिवरायांचा समकालीन कविराज भूषण म्हणतो, वेद राखे विनीत पुराण परसिद्ध राख्यो, रामनाम राख्यो अति रचना सुधीर में
हिंदून की चोटी राखी रोटी राखी है सिपाहन की,
कांधे पे जनेउ राख्यो माला राखी कर में ।
मेडी राखी मुगल मरोडी राखी पातशाह,
बैरी पीसी राखे वरदान राख्यो कर में
राजन की हद राखी तेगबल शिवराय,
देव राखे देवल स्वधर्म राख्यो घर में ॥
भूषण म्हणतो, वेद, पुराण इतकेच नव्हे, तर जिभेवर रामनामाचे रक्षण शिवाजीराजांनी केले. हिंदूंची चोटी, सैनिकांची रोटी, खांद्यावर जानवे अन् हातात जपमाळेचे संरक्षण त्यांनी केले. मुगल, सुलतान व इतर पातशाह घाबरून दडून बसले. राजांनी आपल्या राज्याच्या सीमा तलवारीच्या जोरावर राखल्या. त्यांच्यामुळेच देवळात देव व घरात स्वधर्म टिकून राहिला. भूषणांची एक-एक ओळ महाराजांचे कर्तृत्व, त्यांची विशालता अन् त्यांनी केलेले अद्वितीय कार्य सांगून जाते. त्यावर आज आपल्याला बोलायला फार काही राहत नाही. कारण भूषण हे समकालीन कवी आहेत. त्या काळातील भयावह परिस्थिती व त्यावर राजांनी केलेली मात या दोहोंचे ते प्रत्यक्षदर्शी आहेत.
महाभारतामध्ये आपण पाहतो की, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, कर्ण असे सारे शहाणपण व शौर्य कौरवांच्या बाजूने उभे होते. कृष्णासारख्या लोकोत्तर व्यक्तिमत्त्वाने या सर्वांना वेळोवेळी आवाहन केले की, तुम्ही अधर्माच्या बाजूने आहात; वेळीच धर्माच्या पक्षात यावे, हे राष्ट्र राखावे. पण गंमत पहा, हे सर्व ज्ञानी-महाज्ञानी अधर्माचा पक्ष सोडू शकले नाही. सतराव्या शतकात आपण पाहतो की, पुन्हा एकदा एतद्देशीय ज्ञान व तलवार सुल्तानांसाठी (अधर्मासाठी) गाजत होते. शिवाजीराजांनी त्या काळातील लहानथोरांना राष्ट्रकार्यासाठी, धर्मकार्यासाठी आवाहन केले. कान्होजी जेधे, सोनोपंत डबीर, मोरोपंत, बाळाजी आवजी चिटणीस असे ज्ञानी व तान्हाजी, मुरारबाजी, बाजी प्रभू, येसाजी, फिरंगोजी नरसाळा असे शेकडो तिखट समशेरबहाद्दर धर्मकार्यार्थ उभे राहिले, ही सामान्य गोष्ट नव्हे. आपण चुकीच्या पक्षात आहोत, हे भीष्मादी महापंडितांना माहिती असूनसुद्धा ते धर्माच्या पक्षात येऊ शकले नाही. तिथे पूर्वाश्रमी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे सुल्तानांसाठी काम केलेली किंवा काम करू शकणारी माणसे पूर्ण समर्पण भावनेसह महाराजांनी स्वराज्य कार्यात (धर्मकार्यात) आणली, हे आश्चर्य आहे.
त्या काळात ज्ञानी पंडित व लढवय्ये यांची गणना समाजातील प्रसिद्ध, जनमान्य, आदरयुक्त लोकांत होत असे. पण, सामान्य जनतेचे तसे नव्हते. सत्ता कुणाचीही असो, ही प्रजा अत्यंत बीभत्स पद्धतीने नागवली जात असे. राजा हा विष्णूचा अवतार, पृथ्वीपती, जनतेचा प्रतिपालक ही भावनाच संपुष्टात येऊन त्याच्या अगदी विपरीत झाली होती. पातशाह (राजा) जनतेची पिळवणूक, अत्याचार, शोषण करणारा झाला होता. अशा परिस्थितीत महाराजांनी पुन्हा एकदा हिंदू संस्कृतीमध्ये उद्घोषित राजाची कर्तव्ये पुनरुज्जीवित केली. जी योजना, धोरण, नीती ठरवली त्यामागे सामान्य जनतेचे हित हा एकमेव हेतू ठेवला. अफझलखान, शायस्ता, जौहर, आग्राप्रसंगी व्यक्तिगत धोका व नुकसान सहन करून प्रजाहितदक्ष राजाचा आदर्श घालून दिला. 17व्या शतकात पुन्हा एकदा रामराज्याचा मार्ग प्रशस्त केला. रामकथा इतकी प्राचीन आहे की, अनेक (स्वयंघोषित) विद्वान बोलायला लागले होते (व आजही बरळतात) की, रामराज्य ही केवळ कविकल्पना असून व्यवहार्य नाही. महाराजांनी कलियुगात पुन्हा एकदा रामराज्य स्थापून हा विश्वास पुनर्प्रस्थापित केला की, ही संकल्पना आदर्शवादी नसून पूर्णतः व्यवहार्य आहे. शिवशाही हा शब्द रामराज्याला पर्यायवाची समजला जाऊ लागला. येणार्या शेकडो पिढ्यांना त्यांनी आत्मविश्वास दिला की, राजाने मनात आणल्यास या भारतवर्षात कोणत्याही काळात रामराज्य (शिवशाही) निर्माण होऊ शकते. अगदी स्वातंत्र्यानंतर जो जो राष्ट्रप्रमुख (राजा) प्रजेचे हित, गरिबांचे उंचावलेले जीवनमान (केवळ घोषणा नव्हे), भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, राष्ट्रीय व अंतर्गत सुरक्षा, आत्मनिर्भरता, वंचितांचे सबलीकरण, आत्मसन्मानपूर्ण- मजबूत- आक्रमक परराष्ट्र धोरण, नित्य-सिद्ध-शक्तीच्या स्वरूपात उभे सामरिक सामर्थ्य, कालानुरूप अत्याधुनिक शस्त्रभांडार, देशाच्या चित्शक्तीचे जागरण, स्वधर्म- स्वसंकृती- स्वभाषा- स्वदेशी या मार्गावर चालेल तो राम्राज्याकडेच अग्रेसर होईल, हा विश्वास उत्पन्न केला.
इतके भव्य, विराट कार्य करूनही राजे अहंकाराच्या आहारी गेले नाहीत, हे कमालीचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. एक-दोन वेळा नगरसेवक झालेला (तथाकथित) राजनेता जनहिताची आठ-दहा कामे करून एखाद्या शहंशाहच्या आविर्भावात अहंकाराने कार्यक्षेत्रात फिरताना आपणही पाहिलेला असेल. पण, जनसामान्यांचे संपूर्ण जीवन ज्याने बदलून टाकले, भूषणाने म्हटल्याप्रमाणे अवघी संस्कृती ज्याने आपल्या तलवारीच्या जोरावर टिकवून धरली, शत्रूच्या सर्वशक्तिमान फौजांचा अक्षरशः धुव्वा उडविला, तो राजा किती अहंकारी असायला हवा होता. पण राजे आश्चर्यकारकरीत्या अत्यंत संयमी व विनम्र होते. ‘कर्ता करविता राम असे’ याची पूर्ण कल्पना व विश्वास, आध्यात्मिक पिंड, जिजाऊंचे दमदार संस्कार, संतसज्जनांचा संग, उपभोगशून्य प्रवृत्ती, नि:स्पृहता असे एखाद्या राजाच्या ठिकाणी अपवादाने दिसणारे गुण शिवरायांच्या अंगी होते. त्यामुळे एखाद्या संताच्या झोळीत आपले संपूर्ण राज्य एका झटक्यात समर्पण करण्याची वृत्ती किंवा मल्लिकार्जुनाला गेलेले असताना अचानक विरक्ती येऊन आपले मस्तकच महादेवाला अर्पण करण्याची तीव्र इच्छा, अशा घटना त्यांच्या आयुष्यात दिसतात. 30-30 वर्ष आत्यंतिक कष्ट उपसून उभे केलेले स्वराज्य असे एका क्षणात सोडण्याची (सोडलेले नाही) तयारी शिवाजीराजांच्या ठायी असलेली निःसंग वृत्ती अन् नि:स्पृहता दाखवते. ‘असू आम्ही सुखाने पत्थर पायातील, मंदिर उभवीणे हेच आमुचे शील’ या गीताप्रमाणे त्यांचे आयुष्य होते.
त्या काळात मुळातच सामर्थ्यसंपन्न राजपुरुष अपवादाने जन्माला आले. त्यातील अत्यंत मोजके लोक लढायला उभे राहिले. एका हाताच्या बोटांवर मोजता येईल, इतकेच यशस्वी झाले. जे यशस्वी झाले ते जिवंत असेपर्यंतच राज्य उभे राहिले. त्यांच्या मृत्युपरांत त्यांच्या साम्राज्याची 10-20 वर्षांत वाताहत झाली. शिवाजी महाराजांनी केवळ सामर्थ्य संपादन केले असे नाही, ते लढायला उभे ठाकले. केवळ उभे झाले नाही तर विजयीही झाले. केवळ विजयी न होता त्यांनी आपल्या सहकार्यांमध्ये विजिगिषु वृत्ती ओतप्रोत भरून व्यक्तिनिष्ठा नव्हे, तर तत्त्वनिष्ठा हा संस्कार घडवला. म्हणूनच महाराजांच्या मृत्यूनंतर ‘राजा खत्म, खेल खत्म’ या बुद्धिबळातील उक्तीप्रमाणे स्वराज्य नेस्तनाबूत झाले नाही. त्याउलट स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर होऊन महाराजांच्या मृत्यूनंतर अवघ्या 60 वर्षांत चमत्कार घडला. ज्या ज्या प्रांतात मुघलांचा हिरवा झेंडा मिरविला जात होता, जवळजवळ त्या सर्व प्रांतांतून त्या झेंड्याच्या चिंधड्या उडवत आपला भगवा आसमंतामध्ये दिमाखात फडफडू लागला.
अशा पार्थपराक्रमी, लोकोत्तर, श्रीमंत योगी शिवाजी महाराजांचे चरित्र आपण अभ्यासू शकलो, हेच आपले महद्भाग्य.
(लेखक कॉर्पोरेट आणि व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षक आहेत.)
9923839490