भारताच्या लसीविरोधात चीनची मोहीम

    दिनांक :25-Jan-2021
|
- वाढत्या मागणीमुळे बिथरला ड्रॅगन
नवी दिल्ली,
भारत सरकारने कोरोनाविरोधी लस वेळेवर उपलब्ध करून दिल्याने तसेच मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू केल्याने चीनला दक्षिण आशियात दोन पावले मागे हटावे लागले. त्यामुळे बिथरलेल्या चीनने भारतीय लसीची बदनामी करण्याची मोहीम उघडली आहे. सार्क देशांमधील अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि श्रीलंका वगळता भारताने इतर सदस्य देशांना सीरम इन्स्टिट्यूट उत्पादन करीत असलेली कोव्हिशिल्ड लस भेट दिली आहे. भारत येत्या काही दिवसांत लसींच्या पाच लाख मात्रा श्रीलंकेला देणगी म्हणून देणार आहे. या व्यतिरिक्त अफगाणिस्तानला देखील लस पुरवठ्याबाबत आश्वस्त केले आहे.
 
 
vaccine_1  H x
 
लसीच्या माध्यमातून मित्र जोडण्याच्या या प्रयत्नांविरोधात चीन सरकारचे मुखपत्र ग्लोबल टाईम्सने प्रचार मोहीम सुरू केली. सीरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीनंतर भारताच्या लस उत्पादनाच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित केला आहे. सीरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीमुळे उच्च दर्जाच्या लस उत्पादनाबाबत लोकांच्या विश्वासावर परिणाम होऊ शकतो आणि भारत सरकारच्या अपेक्षेप्रमाणे लस उत्पादन झालेले नाही, असे ग्लोबल टाईम्सने अज्ञात समाजमाध्यम वापरकर्ते आणि विश्लेषकांचा हवाला देत म्हटले आहे. चीनमधील भारतीय चिनी लसीलाच प्राधान्य देत असल्याचा दावा देखील ग्लोबल टाईम्सने केला आहे.
 
 
चिनी रेस्टॉरंट्समध्ये काम करणाऱ्या भारतीय कामगारांना चिनी लसीच्या दर्जाबाबत कोणतीही शंका नाही आणि ते चिनी लसीलाच प्राधान्य देणार आहेत, असा दावा देखील ग्लोबल टाईम्सने केला आहे. सीरम इन्स्टिट्यूटने मूलभूत अभ्यास न करताच कोव्हिशिल्ड लसीचे उत्पादन सुरू केले आहे, असा रुग्णहक्क संघटना ऑल इंडिया ड्रग अ‍ॅक्शन नेटवर्कने दावा केला असून, त्याबाबतच्या वृत्ताचा हवाला ग्लोबल टाईम्सने दिला आहे.