अत्याधुनिक ‘आकाश'ची पहिली चाचणी यशस्वी

    दिनांक :25-Jan-2021
|
भुवनेश्वर,
आधुनिक पिढीतील जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या आकाश क्षेपणास्त्राची संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) ओडिशातील तटवर्ती भागात आज सोमवारी चाचणी यशस्वी चाचणी घेतली आहे. हवेतून होणारा वेगवान क्षेपणास्त्र आणि विमानहल्ल्यांचा धोका परतवण्यासाठी डीआरडीओने भारतीय वायुदलाकरिता हे आधुनिक पिढीतील क्षेपणास्त्र विकसित केले आहे.
 
 
akash_1  H x W:
 
संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी चाचणीतील सहभागी डीआरडीओचे संशोधकांचे अभिनंदन केले. डीआरडीओ, भारत डायनामिक्स लिमिटेड (बीडीएल), दारूगोळा आणि क्षेपणास्त्र उत्पादक आणि सार्वजनिक क्षेत्रातील भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे (बीईएल) प्रतिनिधी या चाचणीवेळी उपस्थित होते. चाचणीवेळी भारतीय वायुदलाचे अधिकारी देखील उपस्थित होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
 
 
 
निर्धारित निकषांप्रमाणे क्षेपणास्त्राने अचूक लक्ष्यभेद केला. चाचणीत ठेवण्यात आलेले आदेश आणि नियंत्रण यंत्रणा, क्षेपणास्त्राचे उड्डाण आणि वायुगतिकीय जुळवणीचे निकष या क्षेपणास्त्राने पूर्ण केले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. चाचणीवेळी क्षेपणास्त्रावर नजर ठेवण्यासाठी रडारसह इतर यंत्रणांचा वापर करण्यात आला. रडार यंत्रणेने क्षेपणास्त्रातील एकात्मिक यंत्रणेच्या क्षमतेची पडताळणी केली, अशी माहिती सूत्रांनी दिली.