प्रजासत्ताक दिन चिरायू होवो...!

    दिनांक :26-Jan-2021
|
भारताच्या ७२ व्या प्रजासत्ताक दिनावर आज काही प्रमाणात कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे या वर्षी प्रजासत्ताक दिन साजरा केला जात असला, तरी त्यात नेहमीसारखा उत्साह आणि जल्लोष नाही, तर थोडी भीती आणि दहशत आहे. ही भीती आणि दहशत कोरोनाची आहे. तसेच, पाकिस्तानने रचलेल्या कारस्थानामुळेही आहे. भारतात आतापर्यंत एक कोटीवर लोकांना कोरोनाची लागण झाली आणि दीड लाखावर लोकांना आपले प्राण गमवावे लागले. एक कोटीवर लोकांना कोरोनाची लागण आणि दीड लाख लोकांचा मृत्यू ही संख्या निश्चितच मोठी असली, तरी भारताच्या १३५ कोटी लोकसंख्येच्या तुलनेत टक्केवारीचा विचार केला तर फार नकसान झाले नाही, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब होय. पण, ज्यांच्या घरच्या सदस्यांचा मृत्यू झाला, त्यांच्याप्रती समाजाच्या संवेदना जाग्या आहेत, हे महत्त्वाचे. पाश्चात्त्य आणि विकसित देशांत कोरोनामुळे झालेली प्राणहानी भारताच्या तुलनेत कितीतरी पटीने जास्त आहे.
 
 modi_1  H x W:
 
कोरोनावर लस शोधण्यात तसेच लसीकरण अभियान सुरू करण्यातही भारताने जगाच्या तुलनेत आघाडी घेतली आहे. भारतात आतापर्यंत १५ लाख लोकांचे लसीकरण झाले. एवढेच नाही, तर भारताने आपल्या शेजारी देशांनाही ही लस उपलब्ध करून देत आपल्या ‘वसुधैव कुटुंबकम्' वृत्तीचे दर्शन जगाला घडवले आहे. ‘आम्ही जगतो, तुम्हीही जगा, जगण्याचा आहे सगळ्यांना अधिकार,' या भारतीय संस्कृतीतून आपण जगासमोर आदर्श उभा केला आहे. ही भारतीय प्रजासत्ताकाची या शतकातील सर्र्वात मोठी उपलब्धी म्हटली पाहिजे. आज संपूर्ण जग एकदुसऱ्याच्या जिवावर उठले असताना, नरसंहारासाठी अनेक मोठमोठ्या रासायनिक अस्त्रांची तसेच अण्वस्त्रांची निर्मिती केली गेली असताना, आपल्या शेजारी देशांचीही काळजी घेण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका भारताला जगातील नवीन महासत्ता बनवण्याच्या दिशेने वाटचाल करणारी तसेच येत्या काळात भारत जगाचे नेतृत्व करेल, याबाबतचा विश्वास निर्माण करणारी आहे.
 
 
 
या सर्व आश्वासक वातावरणात राजधानी दिल्लीच्या सीमांवर, कृषी कायदे रद्द करावे, या मागणीसाठी काही शेतकरी संघटनांचे सुरू असलेले धरणे आंदोलन दुधात मिठाचा खडा टाकणारे ठरत आहे. शेतकèयांचे जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने तसेच त्यांचे आर्थिक उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मोदी सरकारने ऐतिहासिक असे तीन कृषी कायदे पारित केले. हे कायदे रद्द करण्याची मागणी करणाऱ्या शेतकरी संघटना स्वत:ला शेतकऱ्यांच्या हितचिंतक आणि मोदी सरकारला शेतकऱ्यांचा शत्रू ठरवत आहेत. कलियुग म्हणतात ते हेच असावे! जो शेतकऱ्यांचा खरा हितचिंतक आहे, त्याला शत्रू ठरवून खऱ्या शत्रूला मित्र ठरवले जात आहे, हे भारतीय प्रजासत्ताकाला लागलेले ग्रहण म्हटले पाहिजे. सुदैवाची बाब म्हणजे हे ग्रहण खग्रास नाही तर खंडग्रास आहे, जे दीर्घकाळ चालणारे नाही.
 
 
 
शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे मागे घेणे म्हणजे घड्याळाचे काटे उलटे फिरवण्यासारखे आहे, जे कदापि शक्य नाही. देशातील काही टक्के शेतकरी या अपप्रचाराला बळी पडले असले, तरी या तथाकथित शेतकरी संघटना नेहमीसाठी देशातील शेतकऱ्यांची दिशाभूल करू शकणार नाहीत. एक दिवस या शेतकऱ्यांचे डोळे उघडतील आणि पंतप्रधान मोदीच आपले खरे हितचिंतक असल्याचे त्यांच्या लक्षात येईल. कृषी कायद्यांच्या नावावर शेतकऱ्यांसोबत देशातील जनतेची काही प्रमाणात दिशाभूल करण्याच्या या कारस्थानात शेतकरी संघटनांना विरोधी पक्षांची फूस आहे, यात काँग्रेस आणि डावे पक्ष आघाडीवर आहेत. शेतकऱ्यांसाठी स्वत: काही करायचे नाही, त्यांना वाऱ्यावर सोडून आत्महत्येस प्रवृत्त करायचे, ही काँग्रेसी राजवटीची आतापर्यंतची भूमिका राहिली आहे. मोदी सरकारने यात बदल केला, तर त्यांना बदल करू द्यायचा नाही, ही काँग्रेसची वृत्ती शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारी आणि देशाच्या मुळावर उठणारी आहे. पण, फार काळ काँग्रेस आणि तिच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या शेतकरी संघटना शेतकऱ्यांची दिशाभूल करू शकणार नाहीत, यात शंका नाही. भारतातला शेतकरी हा भोळासांब आहे, त्याचे ज्या वेळी डोळे उघडतील आणि तो ज्या वेळी आपला तिसरा डोळा उघडेल, त्या वेळी या नेत्यांना पळता भुई थोडी होईल! तुम्ही काही काळासाठी कुणाचीही दिशाभूल करू शकता, नेहमीसाठी नाही!
 
 
 
प्रजासत्ताकाच्या ७२ वर्षांत भारताने सर्वच क्षेत्रांत केलेली प्रगती विकसित देशांना आश्चर्यचकित करणारी आहे. भारताची अवाढव्य लोकसंख्या ही आतापर्यंत प्रगतीच्या मार्गातील सर्वात मोठी धोंड मानली जात होती. दूरदृष्टीच्या पंतप्रधान मोदी यांनी ही लोकसंख्या भारताच्या विकासाच्या मार्गातील मैलाचा दगड ठरवली! ७२ वर्षांच्या भारतीय प्रजासत्ताकाच्या काळात १२-१३ वर्षांचा अपवाद वगळता, देशात काँग्रेसचा एकछत्री अंमल होता. पण, या काळात भारतातील खेडी विकासापासून वंचित, तर शहरे अधिकाधिक बकाल झालीत. देशातील काही मोजकी महानगरे वगळता, विकासाची किरणे देशातील सहा लाख खेडेगावांपर्यंत पोहोचू शकली नाहीत. खेडेगावात वीज पोहोचली नाही, रस्ते झाले नाहीत, त्याचप्रमाणे पिण्याचे शुद्ध पाणीही जनतेला मिळाले नाही. अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांची पूर्तताही देशातील मोठ्या लोकसंख्येच्या बाबतीत कधी झाली नाही. या काळात देशातील गरीब अधिक गरीब झाला, तर श्रीमंत अधिक श्रीमंत. देशातील मोठी लोकसंख्या रात्री उपाशीपोटी झोपत होती वा अर्धपोटी राहात होती. आरोग्य आणि शिक्षणाच्या बाबतीत तर आनंदीआनंद होता.
 
 
 
नरेंद्र मोदी यांनी देशातील दीनदलित, आदिवासी, कष्टकरी, कामगार आणि महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी अनेक धोरणात्मक निर्णय घेतले. दुर्गम, आदिवासी तसेच ग्रामीण भागातील महिलांची, चुलीच्या धुरापासून सुटका करण्यासाठी त्यांना गॅसशेगड्या आणि सिलेंडर उपलब्ध करून दिले. ग्रामीण विशेषत: दुर्गम भागातील महिलांचा अर्ध्यापेक्षा जास्त वेळ, पिण्यासाठी डोक्यावरून पाणी आणण्यात जात होता. अशा लोकांच्या घरी नळाचे पाणी दिले. आर्थिक परिस्थितीमुळे जे लोक डॉक्टरकडेही जाऊ शकत नव्हते, उपचाराअभावी मरत होते, त्यांच्यासाठी आयुष्मान भारत योजना सुरू केली. शेवटी प्रजासत्ताक म्हणजे तरी काय? यापेक्षा आणखी कोणत्या ‘अच्छे दिना'ची देशवासीयांना अपेक्षा आहे?
 
 
याच काळात देशाची भौतिक प्रगतीही लक्षणीय झाली. ‘सबका साथ, सबका विकासङ्क आणि ‘सबका विश्वास' हा मोदी यांच्या कार्यपद्धतीचा मूलमंत्र आहे. सगळ्यांना सोबत घेऊन, त्यांचा विश्वास जिंकत विकासाच्या वाटेवर न्यायचे, ही मोदी सरकारची भूमिका आहे. मोदी सरकारच्या आधीही देशात अनेक सरकारे येऊन गेली. पण मोदी यांना जे जमले, ते आधीच्या काँग्रेस राजवटीतील सरकारांना जमले नाही. मोदी सरकारची सर्वात मोठी उपलब्धी म्हणजे, त्यांनी राबवलेली ‘स्वच्छ भारत' योजना आणि ‘भ्रष्टाचार निर्मूलन!' २०१४ च्या आधी, भारत कधी स्वच्छ होईल आणि देशातील भ्रष्टाचार संपेल, याची कल्पनाही कुणी करू शकत नव्हता! पण, मोदी यांनी तो चमत्कार करून दाखवला. म्हणून "मोदी है तो मुमकीन है!" असे म्हटले जाऊ लागले. कोणतीही अशक्य गोष्ट शक्य करून दाखवण्याचे मोदी यांचे कर्तृत्व अफलातून आहे. सामान्यपणे कोणत्याही दोन नेत्यांची तुलना करणे योग्य नसते. कारण प्रत्येकाला मिळालेली संधी, त्या संधीचे सोने करण्याची त्याची क्षमता आणि त्याला उपलब्ध असलेले राजकीय वातावरण वेगळे असते. त्यामुळे सगळ्यांकडून सारखीच अपेक्षा करता येत नाही. पण, देशाचे पंतप्रधान म्हणून किमान काही मुद्यांवर तरी त्यांच्याकडून किमान अपेक्षा करणे गैर नसते. देशातील प्रजासत्ताकाचा आढावा घेताना, एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या अन्त्योदयाचे स्मरण झाल्याशिवाय राहात नाही. रांगेतील शेवटच्या माणसाचे कल्याण, हेच अन्त्योदयाला अपेक्षित असलेले खरेखुरे प्रजासत्ताक आहे! त्या दिशेने भारताची नुसती वाटचालच सुरू झाली नाही, तर मोठा टप्पाही गाठला आहे...