कर्ज देण्याची बतावणी करून ठगविले

    दिनांक :27-Jan-2021
|
-मोर्शी येथील घटना
तभा वृत्तसेवा
मोर्शी, 
कर्ज देण्याची बतावणी करून 65 हजार रुपयांनी एका व्यक्तीला लुटण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नोएडा उ. प्र. येथील दोन व्यक्ती विरुद्ध मोर्शी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील तिरूपती नगर येथील उमेश बापूराव कुबडे याला उत्तर प्रदेशातील नोएडा येथून फायनान्स कंपनीच्या कर्मचार्‍यांचा 10 ऑक्टोबरला मोबाईलवर फोन आला.
 
q_1  H x W: 0 x
 
तुम्हाला कर्जाची आवश्यकता आहे काय अशी विचारणा उमेश यांना करण्यात आली. उमेश कुबडे यांनी होय म्हटल्यानंतर सदर कंपनीच्यावतीने कर्जाच्या परतफेडी संदर्भात संपूर्ण माहिती देण्यात आली. कर्ज मंजुरीचा प्रस्ताव तयार करण्यासाठी कुबडे यांना बँक पासबुकची प्रत, आधार कार्ड ,पॅन कार्ड व इतर कागदपत्राची मागणी करण्यात आली. उमेश कुबडे आणि सर्व कागदपत्रे 15 ऑक्टोबरला नीरज गुप्ता यांच्या व्हाट्सअपवर पाठविली. त्यानंतर सदर फायनान्स कंपनीकडून आपल्याला चार लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले असल्याच्या संदेश कुबडे यांच्या मोबाईलवर आला.
 
 
त्यावेळी कर्ज मंजुरीसाठी फाईल चार्जेस म्हणून 3 हजार 500 रुपये, एग्रीमेंट चार्जेस 14 हजार 500 व जीएसटी चार्ज 24 हजार 500 रुपये व इन्शुरन्सचे 20 हजार 500 रुपये असे एकूण 63 हजार रुपये भरण्यास सांगण्यात आले. उमेश कुबडे यांनी सदरची रक्कम पातुरकर कॉम्प्लेक्स येथील स्टेट बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रातून 19 ऑक्टोंबर 2020 रोजी फायनान्स कंपनीच्या खात्यात भरली. तुमची कर्जाची रक्कम या महिन्यात जमा होईल, त्या महिन्यात जमा होईल जमा होईल असे वारंवार कंपनीच्यावतीने सांगण्यात आले. अडीच महिन्याचा कालावधी लोटला असला तरी अजून पर्यंत कर्जची रक्कम न आल्याने आपली फसवणूक झाल्याचे उमेश यांच्या लक्षात आले. त्यांनी मोर्शी पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. पोलिसांनी उत्तर प्रदेशातील नोएडा येथील लोन अप्लायर नीता सिंग व लोन ऑडिटर निरज गुप्ता रा. बजाज नगर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला असून अधिक तपास मोर्शी पोलिस करीत आहे.