रामाळा तलावात मासे मरताहेत तडफडून!

    दिनांक :27-Jan-2021
|
-इको-प्रोची प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार, आंदोलनाचा इशारा
तभा वृत्तसेवा
चंद्रपूर, 
चंद्रपुरातील एकमेव ऐतिहासिक व गोंडकालीन रामाळा तलावात एव्हाना मासे तडफडून मरत आहेत. वाढत्या प्रदुषणामुळे मासे मृत्यूमुखी पडत असल्याचा आरोप इको-प्रो संघटनेने केला असून, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारही केली आहे.
 
 
m_1  H x W: 0 x
बुधवारी सकाळी इको-प्रोचे सदस्य रामाळा तलावाच्या काठावर असताना सभोवताल पाण्यात मृत मासे तरंगताना आढळून आले. काठावरील कचर्‍यामुळे तसेच इकोर्निया वनस्पती असल्याने बरेच मृत मासे दिसले नाहीत. मात्र, अनेक मासे मृत्यमुखी पडत आहेत. बुधवारी फक्त विसर्जन स्थळावर पाहणी केल्यानंतर बरीच मासे मृत झालेली आढळून आली. कायम तलावात येणारे सांडपाणी, जे मच्छीनालाच्या माध्यमाने तलावात येत असते, त्यामुळे तलावाच्या प्रदुषणात वाढ होवून जलजीवांसाठी धोकादायक ठरत आहे. सोबतच भुजलसुध्दा दुषित होत आहे. तलावाच्या काठावर पाण्यास सुटलेल्या दुर्गंधीमुळे हवा जोरात असेल, तेव्हा परिसरात हा दुर्गध पसरत असतो, त्याचा नागरीकांना त्रास सहन करावा लागतो, अशीही तक्रार इको-प्रोने केली आहे.
गेल्या वर्षी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी तलाव खोलीकरणाबाबत बैठका घेतल्या होत्या.
 
 
त्यात इको-प्रोने तलाव संवर्धनासाठी सुचविल्याप्रमाणे, तलाव सुकवून खोलीकरण करणे, अतिक्रमण रोखण्यास सुरक्षा भिंत बांधणे, मच्छीनाला दुसरीकडे वळता करणे, नाल्यावर जलशुध्दीकरण संयत्र उभारणे, तलावात वेकोलिचे वाया जाणारे पाणी वाहिनी टाकून तलावात शुध्द पाणी आणणे यावर चर्चा झाली होती. यानुसार वेकोलिचे पाणी तलावात आणण्याचे काम वेकोलिकडून करण्यात येत आहे. खोलीकरणास सुरूवात करण्यात आली. मात्र, पावसाला सुरूवात झाल्याने प्रत्यक्ष कामाची सुरूवात होवू शकली नाही आणि त्यापूर्वी कोविडमुळेसुध्दा तलावाच्या कामाकडे लक्ष देण्यात आले नाही.
 
 
यंदासुध्दा नोव्हेंबरमध्ये जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांची भेट घेत तलावाचे महत्व, वाढते प्रदुषण, इकोर्निया वनस्पतीच्या समस्येबाबत निवेदन देत खोलीकरणाची मागणी केली होती. तलाव खोलीकरण, संवर्धनासाठी दरवर्षी बैठका होतात, मात्र निर्णय घेतेवेळेस कामासाठी पुरेसा वेळ हाती राहत नसल्याचे दिसून येते. यामुळे इको-प्रोने आपल्या मासिक बैठकीत काही दिवसापूर्वीच वेळेची गरज लक्षात घेऊन नाईलाजास्तव आंदोलनाची भुमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे.
 
 
इको-प्रो संस्था आता रामाळा तलाव प्रदुषणमुक्तीच्या मागणीकरिता आक्रमक झाली असून, तलावाच्या पात्रात इको-प्रो सदस्य उभे राहून मृत मासे हातात पकडून तसेच ‘सेव रामाळा तलाव’चे फलक हातात घेत निदर्शने केली. तसेच आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबत प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांना भ्रमणध्वनीवरून माहिती देत तक्रारसुध्दा केली आहे.
इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे यांच्या नेतृत्वात इको-प्रोचे कार्यकर्ते तलावाचे निरीक्षण करताना इको-प्रो पर्यावरण विभाग प्रमुख नितीन रामटेके, संजय सब्बनवार, अडगुरवार, हरीश मेश्राम, प्रमोद मलीक, कपील चौधरी सहभागी झाले होते.