पुण्यातून 17 आदिवासींची मुक्तता

    दिनांक :27-Jan-2021
|
-नोटरी करून केले बंधक
तभा वृत्तसेवा
धारणी,
पुणे जिल्ह्यातील बाभुळगांव येथील शेतांमध्ये ऊस तोडीसाठी धारणी तालुक्यातील मोगर्दा व नांदुरी गावातील सहा जोडपे तथा 5 बालकांना एका दलालाच्या माध्यमातून दिवाळीनंतर नेण्यात आलेले हेाते. आता मोती मातेच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी या सर्वांनी धारणी परत येण्याचा मनोदय जाहीर केल्यावर महिलांना मारझोड करून बंधक करण्यात आले. अखेर स्थानिक आदिवासी इलाका संघटना तथा पदाधिकार्‍यांच्या प्रयत्नामुळे सर्वांची सुटका करून परत गावात आणण्यात आल्याने स्थलांतराचा नवीन चेहरा समोर आलेला आहे.
 
a_1  H x W: 0 x
 
मोगर्दाचे उपसरपंच गोपाल धुर्वे, परंपरा संघटनेचे मन्नालाल दारसिंबे, स्वाभिमानचे दुर्योधन जावरकर यांना मजुरांना परत आणण्यासाठी आयपीएस निकेतन कदम यांनी मदत केली. धारणी तालुक्यातील मोगर्दा तथा नांदुरी गावातील 12 जणांसोबत 5 बालके पण बाभुळगाव शेत शिवारात ऊस तोडण्यासाठी एका दलालाच्या माध्यमातून पोहचलेली होती. धारणी परत येण्याची परवानगी मालकाकडून घेण्यासाठी मजुरांनी प्रयत्न करताच त्यांना एका खोलीत कोंडून बंधक बनविण्यात आले. या प्रकराची माहिती मजुरांनी मोबाईलद्वारे गोपाल धुर्वे तथा मन्नालाल यांना दिली.
 
माहितीनुसार, विजय वाकचौरे तथा पत्नी सुषमा वाकचौरे यांनी नोटरी करुन घेतल्याने आदिवासी कायद्यासमोर हतबल झाल्याने त्यांना प्रतिरोध करण्याची हिम्मत आली नाही. 80 हजार रूपयाची दलाली या दोघांनी घेतलेली होती, अशी माहिती ब्रिजलाल कास्देकर (28, रा. नांदुरी) यांनी दिली. नोटरीत संजय आसने (55) रा. बाभुळगांव, ता. इंदापूर, जि. पुणे हे लिहून घेणार्‍याचे नाव आहे, हे विशेष.
 
मन्नालाल दारसिंबे व दुर्योधन जावरकर यांनी 1 लाख 20 हजार रुपये एकत्रित करुन पाठविले आणि खा. नवनीत राणा यांनी मेळघाटला सेवेसाठी दिलेली रुग्णवाहिका पाठवून सर्वांना सुखरुप 26 जानेवारी रोजी धारणीत आणले. प्रजासत्ताक दिनी आपल्या स्वगृही परतल्यावर आदिवासी मजुरांनी आझादीचा श्वास घेतला. परत येण्यासाठी बंधक करणार्‍या मालकास पैसे द्यावे लागले, हे विशेष. मजुरांमध्ये रामसू हिरा, मोती धांडे, शालीकराम मोरे, सोहनलाल भिलावेकर तथा शिवलाल फालतू व ब्रिजलाल कास्देकर यांचा समावेश आहे. स्थलांतराचे प्रमाण सतत वाढत असल्याने मनरेगाची कामे जास्त सुरु करण्याची गरज आहे.