शासकीय मका खरेदी केंद्रात व्यापार्‍यांना प्राधान्य

    दिनांक :27-Jan-2021
|
-आदिवासींचा मका दोन महिन्यांपासून पडून
तभा वृत्तसेवा
धारणी, 
आधारभूत धान्य खरेदी योजनेत धारणी तालुक्यातील बैरागड, सावलीखेडा, टिटम्बा तथा चिखलदर्‍यातील गौरखेडा व चुरणी खरेदी केंद्रावर व्यापार्‍यांनीच आपला माल जास्त विकला तर आदिवासी शेतकरी 50 दिवसांपासून मका खरेदी केंद्रावर ठेवून असले तरी त्याऐवजी नव्याने व्यापार्‍यांचाच माल खरेदी केल्या जात आहे.
 
 

a_1  H x W: 0 x
धारणी जवळच्या टिटम्बा व बैरागड या दोन केंद्रांवर दोन महिन्यापासून आदिवासींचा मका पडलेला असून दोन वेळच्या जेवणासाठी शेतकर्‍यांना गावात भीक मागावी लागल्याचे वास्तव घडले आहे. कुंड गावातील शेतकर्‍यांना बैरागड गावात लोकांकडून भीक मागून पोट भरले, हे विशेष! एका माहितीप्रमाणे बैरागड येथील आदिवासी विकास महामंडळाच्या खरेदी केंद्रावर खरेदी बंद झाल्यानंतर आठ दिवसांपूर्वी धारणी येथील व्यापार्‍यांनी मका आणून ठेवलेला होता. याविषयी ग्रेडर अनिल मेश्राम यांना विचारणा केली असता त्यांनी हा माल कोणाचा आहे, हे माहित नसल्याचे सांगितले, पण परत खरेदी सुरू होताच रात्रीबेरात्री तस्करीने आलेला मका प्राधान्याने मोजण्यात आला. या उलट महिन्याभरापासून पडलेला कुंड गावातील सहा आदिवासी शेतकर्‍यांचा मका घेण्यास नकार देण्यात येत आहे.
 
 
 
 
या प्रकरणी अखेर शेतकर्‍यांनी धारणी येथील महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक तथा प्रकल्प अधिकारी यांना सविस्तर माहिती दिली. मात्र शेतकर्‍यांचे समाधान झालेले नाही, अथवा त्यांचा मकासुद्धा मोजण्यात आलेला नाही. मात्र दुसरीकडे व्यापार्‍यांनी अकराशे-बाराशे भावाने घेतलेला मका सर्रास टिटम्बा व बैरागड केंद्रावर मोजला जात आहे. या व्यवहाराला दुसर्‍या भाषेत म्हणायचे तर केंद्र शासनाच्या कृषी कायद्याचा लाभ मेळघाटात आदिवासी शेतकर्‍यांना कमी तर मोठ्या धान्य दुकानदारांना जास्त होत आहे.
 
 
 
आधारभूत धान्य खरेदी योजनेत नोंदणी करण्याचेही केंद्र संचालकाकडून पैसे मागितल्या जात असल्याचा आरोप शेतकर्‍यांनी लावलेला आहे. धारणी तालुक्यातील सर्वात जास्त दुर्गम गाव कुंड या गावाच्या बाबू काडमू येवणे, सोनू मंगल कुमरे, रज्जी छोटेलाल कोरकू, चिमन मंगल कुमरे, चन्नू मंगल तथा चुन्नी कुमरे यांचा तब्बल 150 क्विंटल मका सध्या बैरागड केंद्रावर 50 दिवसापासून पडून आहे. मात्र आदिवासींना न्याय मिळत नाही. दुसरीकडे कर्मचार्‍यांसोबत संगनमत करून धारणी येथून खरेदी केंद्रापर्यंत पोहणचारा मका त्वरित खरेदी केल्या जात आहे. यामुळे हमी भावाच्या खरेदीचा कवडीचा लाभ शेतकर्‍यांना नाही तर व्यापारी व कर्मचार्‍यांना जास्त होत असल्याचा चमत्कार मेळघाटात होत आहे. अनेक केंद्रावर तर कमकुवत किंवा अपात्र ग्रेडर ठेवण्यात आलेले असल्याने खरेदी व्यवहारात गैरप्रकारावरून शासनालाही कोट्यावधीचा फटका बसणार आहे.