‘सुपर 75’ अन् वंदेमातरम हेल्थ पोस्ट साकारणार; महापौरांची ग्वाही

    दिनांक :27-Jan-2021
|
- महापालिकेतील कर्तृत्ववानांचा सत्कार
नागपूर,
पुढील वर्षी संपूर्ण देश स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष साजरे करणार आहे. यानिमित्त नागपूर महानगरपालिकांच्या शाळांमध्ये शिकणार्‍या 75 विद्यार्थ्यांना जेईई-नीट परिक्षांसाठी प्रशिक्षण देऊन त्यांना उच्च शिक्षणाच्या प्रवेशाचा मार्ग प्रशस्त करून देण्याचा महाप्रकल्प आणि शौर्यपदक प्राप्त जवानांच्या नावे 75 ‘वंदेमातरम हेल्थ पोस्ट’ तयार करण्याचा संकल्प नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी जाहीर केला.
 
 
mayor_1  H x W:
 
प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे आयोजित ध्वजवंदन सोहळ्यातील कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती विजय झलके, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, आयुक्त राधाकृष्णन बी., अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, संजय निपाने, सतरंजीपुरा झोन सभापती अभिरुची राजगिरे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, जितेंद्र घोडेस्वार, मोहम्मद इब्राहिम उपस्थित होते.
 
 
 
महापौर तिवारी म्हणाले, शहरातील 40 वर्षांवरील 12 लाख नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण, 23 नवे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, दोन नागरी समूह आरोग्य केंद्र, 50 बेडचे आयुष्य रुग्णालयाची सुरुवात, मनपाच्या शाळांतील दहावी, बारावीच्या 1950 विद्यार्थ्यांना टॅब, नवीन शैक्षणिक सत्रापासून सहा नवीन इंग्रजी माध्यमाच्या शाळा, 63 गठई कामगारांना लीज पट्टे, दृष्टिदोष असणार्‍या युवतींवर मोफत शस्त्रक्रिया आदी प्रकल्पांची घोषणा महापौर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी केली. कोव्हिड काळात उत्कृष्ट कार्य करणार्‍या कोरोनायोद्धांसह महापालिकेच्या माध्यमातून प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावणार्‍या अधिकारी-कर्मचार्‍यांचा, आयएमए, सामाजिक संघटनांचा त्यांनी आपल्या भाषणातून गौरवोल्लेख केला. संचालन उपायुक्त महेश मोरोणे यांनी केले.
विद्यार्थी, कर्मचार्‍यांचा सत्कार
यावेळी महापौरांच्या हस्ते कर्तृत्ववानांचा सत्कार करण्यात आला. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम फाऊंडेशनतर्फे जगातील सर्वात लहान उपग्रह अंतराळात सोडण्यासाठी देशातील एक हजार विद्यार्थ्यांमधून म.न.पा.च्या सुरेंद्रगड हिंदी माध्यमिक विद्यालयाच्या दहावीच्या विद्यार्थिनी स्वाती विनोद मिश्रा, काजल रामनरेश शर्मा, विज्ञानशिक्षिका दीप्ती बिष्ट, राष्ट्रपती पदकप्राप्त अग्निशमन विभागातील निवृत्त सहायक स्थानाधिकारी धर्मराज नाकोड, अग्निशमन विभागात असतानाच जोखमीची कामगिरी चोखरीत्या बजावणारे केशव रामाजी कोठे, कोरोना काळात कुठलाही खर्च न करता प्रतिबंधित क्षेत्रात बॅरिकेटिंगचे काम करणारे गांधीबाग झोनमधील शिवनाथ शिक्कलवार, बबन चांदेकर, संजय नरांजे, मनोज दाते, बाबाराव मेश्राम, बंडू रंगारी, अज्जू मस्जिद शोला, शादाब सलीम खान यांचा महापौर दयाशंकर तिवारी, आयुक्त राधाकृष्णन बी. आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.