दिल्लीतील प्रजासत्ताक दिनात यवतमाळकरांचे योगदान

    दिनांक :27-Jan-2021
|
-चित्ररथाने वेधले सर्वांचे लक्ष
यवतमाळ, 
यवतमाळात स्थायिक झालेले आणि मूळ दारव्हा तालुक्यातील नखेगावचे तरुण शिल्पकार प्रवीण पिल्लारे यांच्या कलेतून साकारलेला महाराष्ट्रातील वारकरी संतपरंपरेवर आधारित चित्ररथ यावर्षी 72 व्या प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्ली येथील राजपथावरील पथसंचलनात सहभागी झाला. वारकरी संतपरंपरेवर आधारित या चित्ररथाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

aa _1  H x W: 0
 
नागपूरच्या शुभ जाहिरात कंपनीचे प्रतिनिधी प्रवीण पिल्लारे यांच्या यवतमाळच्या स्टुडीओत अचानक धडकले. त्यांनी प्रवीणकडे कराराचा प्रस्ताव ठेवला. प्रवीणने आपले मित्र शिल्पकार शिव प्रजापतींशी सल्लामसलत करून करारावर सह्या केल्या. प्रत्यक्ष कामाला सुरुवात 6 डिसेंबर 2020 रोजी झाली आणि 8 डिसेंबरला मूर्तींचे काम अमरावती येथे पूर्ण झाले. त्यानंतर त्यातील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी प्रवीण पिल्लारेंसह पाच-सहा शिल्पकारांना मुंबई येथे जावे लागले. प्राथमिकदृष्ट्या मूर्ती मान्य झाल्यानंतर 23 डिसेंबर 2020 रोजी प्रत्यक्षात मोठ्या शिल्पकृतीला सुरुवात झाली.
एकूण 17 शिल्पांचे काम 8 जानेवारी 2021 रोजी पूर्ण झाले. या शिल्पांमध्ये ज्ञानेश्वर माउलीचे 8 फूट उंच आसनस्थ शिल्प, छत्रपती शिवराय आणि संत तुकाराम महाराजांचे 8 फूट उंचीचे शिल्प, विठ्ठलाचे कटीवर हात असलेले शिल्प, संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत नामदेव, संत शेख महंमद, संत नरहरी, संत सावता, संत दामाजीपंत, संत गोरोबा, संत एकनाथ, संत सेना, संत चोखामेळा अशी एकूण 17 शिल्पे तयार करण्यात आली.
ही सारी शिल्पे प्रवीण पिल्लारे यांच्या नेतृत्वात सहकार्‍यांच्या कठोर परिश्रमातून केवळ 15 दिवसांत तयार करण्यात आली. त्यानंतर ही शिल्पे यवतमाळातून 8 जानेवारीला दिल्लीकडे रवाना झाली. पाठोपाठ प्रवीण, शिव असे मुख्य चार-पाच शिल्पकार दिल्लीला जाऊन उर्वरित रंगकाम करून 22 जानेवारीला यवतमाळात परत आले. गतवर्षीही कर्नाटक राज्याचा रथ प्रवीण आणि शिव यांनीच तयार केला होता.
यंदाच्या महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथासाठी प्रवीण पिल्लारे व शिवप्रसाद प्रजापती यांच्यासोबतच विनय बगळेकर, भूषण हजारे, नितीन कोळेश्वर, आकाश आंबाळकर, सचिन रामटेके, शुभम मणे, अमर गडलिंग, सुधीर कुरवाडे यांच्यासह 30-35 सहकार्‍यांनी योगदान दिले.