जिल्ह्यातील ६८७ शाळांमध्ये पहिल्या दिवशी वाजली घंटा

    दिनांक :27-Jan-2021
|
-३०५०१ विद्यार्थ्यांची उपस्थिती
-१३ शिक्षक कोरोना बाधित
भंडारा,
तब्बल दहा महिन्याच्या अवकाशानंतर आज जिल्ह्यातील वर्ग 5 ते 7 च्या शाळांची घंटा वाजली. पहिल्या दिवशी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर कमालीची उत्सुकता जाणवत होती. दुसरीकडे कोरोना नियमाचे काटेकोर पालन व्हावे यासाठी शाळा व्यवस्थापन सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत होते. आज पहिल्या दिवशी जिल्ह्यात 30 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी हजेरी लावीत शाळेची गोडी असल्याचे दाखवून दिले.
 
s_1  H x W: 0 x
 
कोरोनामुळे मागील दहा महिन्यांपासून शैक्षणिक संस्था ठप्प पडल्या होत्या. काही महिन्यांपूर्वी माध्यमिक विभागाच्या शाळा सुरू झाल्या. मात्र प्राथमिक शाळांचा विचार झालेला नव्हता. दरम्यान आज 27 जानेवारीपासून वर्ग पाच ते आठ पर्यंतच्या सर्व शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला व त्याची अंमलबजावणी करण्यात आली. यासाठी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे असे स्पष्ट निर्देश शासनाचे आहेत. या आदेशाचे पालन करीत आज भंडारा जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या आहेत. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची संपूर्ण तपासणी करूनच विद्यार्थ्यांना आज घेतले जात असल्याचे चित्र शाळेच्या प्रवेशद्वारावर पाहायला मिळाले. विद्यार्थ्यांना नंतर रात्री जावे यासाठी सुरक्षित अंतरावर शाळेच्या पटांगणात रेखांकन करण्यात आले होते. शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे आणि बैठक व्यवस्था अपुरी आहे. अशा ठिकाणी विद्यार्थ्यांचे गट तयार करू 22 दिवसांच्या फरकाने विद्यार्थ्यांना बोलविण्याचे नियोजनही करण्यात आल्याचे दिसून आले. शाळांकडून सर्वतोपरी काळजी घेतली जात असल्याचे चित्र होते मात्र विद्यार्थ्यांकडून त्याला किती प्रतिसाद मिळतो हेही पाहणे योग्य ठरेल.
 
 
 
दरम्यान जिल्ह्यात ७०९ प्राथमिक शाळा आहेत. त्यापैकी आज ६८७ शाळांच्या घंटा वाजल्या. जिल्ह्याची एकूण प्राथमिक विद्यार्थ्यांची पटसंख्या ६९५५७ एवढी असून आज ३०५०९ विद्यार्थी शाळेत उपस्थित झाल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. एकूण २६५४ शिक्षक असून यापैकी २४९५ शिक्षकांची कोरोना चाचणी होऊन १३ शिक्षक कोरोना बाधित आढळल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. आज पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती पाहता 43 टक्के विद्यार्थ्यांनी हजेरी लावल्याचे स्पष्ट होते.