हरयाणा हरिकेन : कपिलदेव

    दिनांक :06-Jan-2021
|
 - किशोर इंगळे
भारतीय क्रिकेट संघाचा वर्ष 1980-81 चा ऑस्ट्रेलिया दौरा. पहिली कसोटी हरल्याने 1-0 ने भारत पिछाडीवर. दुसरी अनिर्णित. त्यामुळे तिसरी मेलबोर्न कसोटी भारतासाठी ‘करो वा मरो’ या स्थितीत. ऑस्ट्रेलियाला चौथ्या डावात जिंकायला 143 धावा हव्या आणि ते चौथ्या दिवसाच्या खेळाअंती 3 बाद 18 धावसंख्येवर. पाचव्या दिवशी खेळ सुरू झाला तेव्हा भारतीय संघाचा मुख्य गोलंदाज कपिलदेव हॅमस्ट्रिंग मसल ताणली गेल्याने तंबूत होता. पण, पठ्ठ्याने परिस्थिती पाहून खेळण्याचा निर्णय घेतला.
 
 
a_1  H x W: 0 x
 
वेदनाशामक इंजेक्शन घेतले व मैदानात उतरला. तो दिवस त्या दिवशी त्याचाच होता. त्याने भन्नाट गोलंदाजी करून 28 धावांत 5 बळी घेतले. ऑस्ट्रेलिया 83 धावांत धरातीर्थी पडून पराभूत झाला आणि मालिका अनिर्णित सुटली. त्याच्या गोलंदाजीचे पृथ:करण होते, 16.4-4-28-5. हा जागतिक कसोटी सामना क्रमांक 895 आणि या गोलंदाजाचे पूर्ण नाव कपिलदेव रामलाल निखंज.
 
कपिलदेव यांचा जन्म 6 जानेवारी 1959 ला चंदिगढ येथे झाला. फाळणीपूर्वी त्यांचे वडील रावळपिंडीहून चंदिगढला स्थलांतरित झाले. कपिलदेव हे त्यांच्या वडिलांच्या सात अपत्यांपैकी सहावे. त्यांचा लाकडांचा व्यवसाय. कपिलने वयाच्या बाराव्या वर्षी देशप्रेम आझाद या प्रशिक्षकाकडे क्रिकेटचे धडे गिरविण्यास सुरुवात केली. नोव्हेंबर 75 मध्ये त्याने हरयाणासाठी पहिला सामना खेळला. पुढील वर्षी 76-77 च्या मोसमात बंगालविरुद्ध 9 षट्कांत 20 धावांत 7 बळी घेतले; तसेच इराणी चषक स्पर्धेत आठव्या क्रमांकावर येऊन 62 धावा काढल्या.
 
या सर्व कामगिरीची दखल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने घेऊन, पुढील वर्षीच्या पाकिस्तानच्या दौर्‍यासाठी निवडले आणि कपिलदेवने 141 व्या खेळाडूच्या रूपाने 16 ऑक्टोबर 1978 ला फैसलाबाद येथे भारतासाठी कसोटी पदार्पण केले. कपिलने पहिला कसोटी बळी पाकच्या सादिक मोहंमदला एका आऊटस्विंगवर बाद करून मिळवला. त्याच मालिकेतील कराचीच्या तिसर्‍या कसोटीत 33 चेंडूंत पहिले कसोटी अर्धशतक काढले; तसेच पहिला एकदिवसीय सामना त्याच दौर्‍यात 1 ऑक्टोबर 1978 ला खेळला.
 
कपिलदेव यांनी पुढील वर्षी 1979-80 ला राज्यांतर्गत सामन्यात दिल्लीविरुद्ध 193 धावा काढताना आपले पहिले प्रथमश्रेणी शतक साजरे केले. वर्ष 1979 च्या इंग्लंडविरुद्धच्या लॉर्डस् कसोटीत 48 षट्कांत 146 धावांत 5 बळी घेतले. इंग्लंडने 633 धावांचा डोंगर रचला. संपूर्ण मालिकेत कपिलने 16 बळी घेतले. तसेच पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत 278 धावा व 32 बळी घेतले. पुढे वर्ष 82-83 च्या पुन्हा पाक दौर्‍यात कपिलदेवला फारसे यश मिळाले नाही. ती मालिका पाकिस्तानचा कप्तान इम्रानखानने 40 बळी मिळवून गाजवली. कपिलदेवने आपले पहिले कसोटी शतक दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर 124 चेंडूंत 126 धावा करून काढले.
 
कपिलदेवकडे भारतीय संघाच्या कप्तानपदाची धुरा 1982-83 मध्ये सोपविण्यात आली. इथे भारताच्या क्रिकेट इतिहासात एक आनंदाचा क्षण आला. तो म्हणजे भारताने त्याच्या कप्तानीत बलाढ्य वेस्ट इंडिजला अंतिम सामन्यात 43 धावांनी हरवून प्रुडेंशियल विश्वचषकावर आपले नाव कोरले. पण, इथपर्यंत मजल मारण्यापूर्वी भारताला एका कठीण प्रसंगातून जावे लागले. साखळी सामन्यांपैकी टर्नब्रिजवेल्सच्या नवख्या झिंबाब्वेविरुद्ध भारत 5 बाद 17 अशा स्थितीत होता. ‘वर्‍हाड ...’ फेम लक्ष्मण देशपांडेंच्या भाषेत काय होईल, कसं होईल, यातून मग ‘देव दीनाघरी धावला’ आणि साकारली ती अजरामर खेळी नाबाद 175 धावांची! ज्यात होते 16 चौकार व 6 षट्कार!! त्या षट्कारांचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक षट्कार सीमारेषेपासून वीस वीस फूट बाहेर पडला होता. त्या खेळीने भारताला जिंकवून तर दिलेच, पण ती विजयी घोडदौड अंतिम विश्वचषक जिंकूनच थांबली!
 
पुढील 1987 च्या विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भारत व पाकिस्तानला संयुक्त रीत्या मिळाले. भारत उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध हरला. या स्पर्धेत कपिलदेवची खिलाडू वृत्ती एका सामन्यात दिसली. ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारताविरुद्ध 268 धावा केल्या. डाव संपल्यावर कपिलदेव पंचाला म्हणाले, ऑस्ट्रेलियाच्या प्रत्यक्षात 270 धावा झाल्यात कारण एक फटका षट्कार होता, परंतु पंचांनी तो चौकार दिला. नंतर भारताने 269 धावा काढल्याने त्यांचा एका धावेने पराभव झाला, पण सर्वांनी कपिलदेवच्या खिलाडू वृत्तीचे कौतुक केले.
 
वर्ष 1990 च्या इंग्लंड दौर्‍यातील लॉर्डस् कसोटीत कपिलने फलंदाजी करताना एडी हेमिंग्जच्या गोलंदाजीवर लागोपाठ चार चौकार मारून भारताला फॉलोऑन मिळण्यापासून वाचवले. इंग्लंडने या कसोटीत 653 धावा काढल्या, ज्यात ग्रॅहॅम गूचने 333 धावा करून लॉर्डस्वर कसोटी त्रिशतक काढणारा एकमेव फलंदाज होण्याचा मान मिळवला.
 
कपिलदेव यांची शारीरिक तंदुरुस्ती जबरदस्त होती. त्यांनी संपूर्ण कारकीर्दीत शारीरिक तंदुरुस्तीच्या कारणासाठी एकही सामना गमावला नाही. आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीत एकही नो बॉल न टाकणार्‍या पाच गोलंदाजांपैकी कपिलदेव एक आहेत. इतर चार जण डेनिस लिली (ऑस्ट्रेलिया), इयान बॉथम (इंग्लंड), इम्रानखान (पाकिस्तान) व लान्स गिब्ज (वेस्ट इंडिज) हे आहेत. 1984 मधील गुडघ्याची शस्त्रक्रिया वगळता ते कधीच संघाबाहेर नव्हते. तिरपे धावत येऊन ते अचूक टप्प्यावर गोलंदाजी करीत. विकेट मिळाल्यानंतर आजच्यासारखे उंच उडी मारून वा आसुरी आनंद मिळाल्यासारखी कृती न करता ते फक्त हात वर करून आपली प्रतिक्रिया नोंदवीत असत. ते एक नैसर्गिक फलंदाज होते आणि जोरकस हूक व ड्राईव्ह मारत. त्यांनी 1992 चा शेवटचा विश्वचषक अझरुद्दीनच्या कप्तानीत खेळला.
 
त्यांनी शेवटची कसोटी 19 ऑगस्ट 1994 ला न्यूझिलंडविरुद्ध खेळून निवृत्ती घेतली. तत्पूर्वी त्यांनी रिचर्ड हॅडलीचा 431 कसोटी बळींचा विक्रम मोडून स्वत:चा 434 बळींचा विक्रम निर्माण केला. ते कसोटी व एकदिवसीय सामन्यात अनुक्रमे 8 व 11 वेळा सामनावीर आणि 4 व 2 वेळा मालिकावीर ठरले आहेत. त्यांना 1979-80 ला अर्जुन पुरस्कार, 1982 ला पद्मश्री, 1983 ला विस्डेन क्रिकेटीयर ऑफ ईयर, 1991 ला पद्मभूषण, 2002 ला विस्डेन क्रिकेटीयर ऑफ सेंच्युरी आणि 2013 ला आयसीसी हॉल ऑफ फेमने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचे ‘बाय गॉडस् डिक्री’ हे आत्मचरित्र व ‘क्रिकेट माय स्टाईल’ ही पुस्तके अनुक्रमे 1985 व 1987 मध्ये प्रकाशित झाली आहेत.
 
क्रिकेटमधील निवृत्तीनंतर ते काही काळ भारतीय संघाचे प्रशिक्षक होते. परंतु, ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 0-3 व 0-2 अशा पराभवानंतर आणि त्यांच्याविरुद्ध झालेल्या मॅच फिक्सिंगच्या आरोपामुळे (जे नंतर निराधार सिद्ध झाले.) त्यांनी राजीनामा दिला. आरोप निराधार सिद्ध झाल्याने एकाच या जन्मी जणू, ‘फिरूनी नवा जन्मेन मी’ या सुरेख भावगीताच्या ओळीनुसार कपिलदेव यांचा एकप्रकारे पुनर्जन्मच झाला.
 
कपिलदेवने कसोटीत 131 कसोटीत 5248 धावा व 434 बळी, 64 झेल आणि एकदिवसीय सामन्यात 3783 धावा व 253 बळी व 71 झेल मिळवले. अशा या अष्टपैलू खेळाडूचा 6 जानेवारी 2021 ला 63 वा वाढदिवस. त्यानिमित्त कपिलदेव यांना, आयुष्याची शतकी खेळी पूर्ण व्हावी यासाठी लाख लाख शुभेच्छा! कपिलपाजी तुस्सी ग्रेट हो...!
-8888720868