...परंतु रोकडे काही, मूळ सामर्थ्य दाखवी

    दिनांक :10-Oct-2021
|
-प्रकाश एदलाबादकर
महाराष्ट्रातच नव्हे, तर अख्ख्या भारतवर्षात इतकेच नव्हे, तर या जगाच्या पाठीवर जिथे जिथे म्हणून हिंदू आहे, तिथे तिथे नवरात्राच्या घटांची पूजा सुरू आहे. महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वतीच्या रूपात तिचे पूजन सुरू आहे. शक्ती, श्री आणि बुद्धिदात्री मातृरूप देवी विजयादशमीपर्यंत घरोघरी मुक्कामाला असेल. विजयादशमीला आपला सर्व शास्त्रसंभार घेऊन आणि सिंहारूढ होऊन ती शिलंगणाला निघणार. आपल्या आठही भुजांमधील शस्त्रांनी दुष्टनिर्दालन करणार. कोठून निघणार ही जगदंबा दुष्टांचा विनाश करायला? आपल्या घरातून? देवळारावळातून? प्रत्यक्ष मातीच्या घटातून? नाही, ती निघणार आपल्या मनातून! तशी ती निघायला हवी. नऊही दिवस ज्या घटाची आपण पूजा करतो, तो घट म्हणजे आपले मन आहे. आपण आपल्या मनरूपी घटात तिची प्रतिष्ठापना केली आहे. नऊही दिवसांच्या आराधनेनंतर ती सशस्त्र सीमोल्लंघनाला बाहेर पडते. आपल्या मनातील ही दैत्यमर्दिनी बाहेर येऊ द्या. हे सीमोल्लंघन म्हणजे, आपल्या विचारांवर, संस्कृतीवर, राष्ट्रावर पाशवी अतिक्रमण करणार्‍या आतंकी शक्तींच्या समूळ नायनाटाचा मुहूर्त ठरू द्या.
 
 
head01-cover-story---new_
 
वर्षाकाळात कृषीची कामे उरकल्यानंतर विजयादशमीच्या दिवशी सीमोल्लंघन करून पुन्हा दिगविजयाला निघण्याची प्रथा होती. त्यासाठी वर्षाकाळात विश्राम घेत असलेल्या शस्त्रास्त्रांना पुनःश्च झळाळी चढवून, त्या शस्त्रांचे पूजन करण्याचा प्रघात होता. आता नऊ दिवस आणि नऊ रात्री महाराष्ट्राच्या घराघरांतून आईचे पूजन होत आहे. दोन वर्षांपासून आपल्या सर्वच सांस्कृतिक आणि धार्मिक व्यवहारांवर कोरोना नामक भयानक रोगाची दाट छाया होती. आजही ती छाया आहे. एक भय मनात ठेवूनच सर्व व्यवहार चालताहेत. हे रोगभय नष्ट करण्याची प्रार्थना आपण देवीला केली होती, आजही करावी लागेल. येणार्‍या सीमोल्लंघनाच्या दिवशी ही महामारी पूर्णतः नष्ट करण्याची आपण प्रतिज्ञा करू या. या संपूर्ण विश्वाचे मंगल व्हावे म्हणून केवळ तिची उपासना पुरेशी नाही; त्यासोबतच आमचे प्रयत्नही तितकेच महत्त्वाचे असतात. म्हणून तिला प्रयत्नांसह शरण गेले पाहिजे तरच त्या शक्तिदात्रीच्या...
 
सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके।
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते॥
शरणागत दीनार्त परित्राण पारायणे।
सर्वस्यार्ती हरे देवी नारायणी नमोस्तुते॥
 
या प्रार्थनेचे अर्थवाहीपण आणि तिचा वर्तमानातील संदर्भ ध्यानात येण्यास निमिषही लागणार नाही. परंतु तिच्याकडून जशा आपल्या अपेक्षा आहेत तशाच, तिच्याही आपल्याकडून अपेक्षा असणारच. ही आठ भुजांची विद्युतप्रभा देवता, आपल्या प्रत्येक हातात धारण केलेले शस्त्र उंच उभारून दसर्‍याला सीमोल्लंघनाला निघेल. आपल्या तेजाचे संपूर्ण पृथ्वीवर सिंचन करीत सीमोल्लंघनाला जाईल. तिच्या या तेजाने सर्व विश्व कांतिमान होईल. तिच्या या तेजाचा एक जरी अंश आपल्या दृष्टीत सामावला, तरच तिचे खरे स्वरूप आपल्याला दिसेल. कसे आहे तिचे आजचे रूप? ही संपूर्ण पृथ्वी तिचा रथ आहे. प्रत्यक्ष वायुदेव तिचे सारथी आहेत. सर्व वेदांमधील तेजस्वी आणि अर्थपूर्ण ऋचा तसेच परा आणि अपरा विद्या ह्या रथाच्या वाहक आहेत. शिलंगणाला जातानाचा तिचा मार्ग आकाशगंगेमधून जातो. वाटेत येणार्‍या उडु गणांचे आणि नक्षत्रांचे तिच्या रथाखाली चूर्ण होऊन त्याची धूळ आसमंतात पसरते. परंतु ती सर्वव्यापिनी विश्वरूपिणी आहे कुठे नेमकी? ती तर माझ्या मनातच आहे. असायला हवी. ती घटाघटात आहे, मनामनात आहे, देहादेहात आहे. सर्व विश्वाची ती अधिष्ठात्री आहे. आपली ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये तिनेच व्यापलेली आहेत. आपल्या देहमनातील सर्व शक्तींचा समवाय हेच तिचे खरे रूप. तिचे हे मनातील रूप आपल्या कर्मात उमटायला हवे. ते खरे सीमोल्लंघन!
 
 
आजपासून साडेतीन दशकांपूर्वी ज्या आर्ततेने आणि कळवळीने आईच्या भक्तांनी तिला ‘बया ऽऽ दार उघड’ म्हणून साद घातली होती. तीच आर्तता, तीच पीडा, तोच कळवळा मनात घेऊन आजही तिचे भक्त तिला साद घालताहेत. आज आम्हाला या विश्वात नानारूपात प्रत्ययाला येणार्‍या, त्या आदिशक्तीचे भावनिक रूप तर हवेच, परंतु त्याहीपेक्षा तिचे तेजोरूप हवे आहे. कोटी कोटी सूर्यांनी एकाच वेळी अवकाशात प्रकाशावे अशी तेजाळ आदिशक्ती प्रकटायला हवी आहे. कोट्यवधी चंद्राची चांदणवेल होऊन, या चराचर सृष्टीतील अनंत कमलपुष्पांना जीवनदान देणारी भव्य-उदात्त स्वरूपातील विराट शक्ती या नवरात्रात प्रकटेल, या आशेने डोळे व्याकुळ झाले आहेत. सूर्य आणि चंद्र या महामायेचे डोळे आहेत. पंचपंच उषःकाली हरितवसने लेवून सर्वत्र नवजीवनाचे आश्वासन देत निघणारी, माध्यान्हकाळी कर्तव्य कठोरतेची जाणीव देणारी आणि संध्यासमयी श्रांत झालेल्या जीवाला आईच्या मायेने कुशीत घेणारी, ही आदिमाया जगज्जननी विजयादशमीला खलनिर्दालनाला निघेल. उत्पत्ती, स्थिती आणि लय यांची अधिष्ठात्री असलेली ही महामाया, आपल्या पुत्रांसाठी नवजीवनाचा वर्षाव करेल. शिवशंकराच्या तांडवापेक्षाही तिचे लास्यनृत्य शिलंगणाचे मुहूर्तावर रुद्रभीषण ठरेल. अन्याय आणि जुलुमाच्या प्रतिकारभावनेने क्रुद्ध झालेल्या तिच्या पदन्यासाने सर्व भूमंडळ विजयादशमीला डळमळेल. तिचे हे रौद्रभीषण नृत्य म्हणजे, रणांगणावर पराक्रमाची शर्थ करणार्‍या योद्ध्यांचे पदन्यास ठरतील. पृथ्वीवरील जी संपत्ती, जे तेज, जे बल, जे यश असेल ते भारतभूमीच्या ठायी एकवटलेले आहे, अशी या सुवर्णभूमीची ख्याती होती. चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा संगम असणार्‍या सृजनशील वृत्ती, या मातीच्या प्रत्येक अणुरेणूत भरून राहिल्या होत्या. परंतु कालचक्र उलटे फिरले. आक्रांतांच्या विकृत अट्टाहासापायी या भूमीचा प्रत्येक रजःकण अश्रूबिंदू होतो आहे. हे अश्रू पुसण्याचा प्रारंभ ही विजयादशमी, हे सीमोल्लंघन ठरले पाहिजे, असे तिला तसे साकडे घालूया, तसे प्रयत्न करू या. समर्थ म्हणाले होते...
 
देवांची राहिली सत्त्वे। तू सत्त्व पाहसी किती?
भक्तांसी वाढवी वेगे। इच्छा पूर्ण परोपरी॥
एकचि मागणे आता। द्यावे ते मजकारणे।
तुझा तू वाढवी राजा। सीघ्र आम्हाचि देखता॥
 
देवी चण्डिकेच्या मध्यम चरिताच्या माध्यमातून एका कथेच्या रूपात शक्तीच्या प्रकटीकरणाचा खरा अर्थ कळू शकतो. आज आपल्या सभोवताली अनेक प्रकारच्या अंधाराचे साम्राज्य पसरलेले आहे. आपण अनेक कारणांनी संभ्रमावस्थेत आहोत. ही सर्व अवस्था नष्ट करायची असेल, तर त्याचा मार्ग याच मिथकात सापडेल. ‘दहशतवाद’ आणि ‘भ्रष्टाचार’ हे शुंभ-निशुंभ आमच्या मानगुटीवर कायमचे बसलेले आहेत. आमच्या जीवनाच्या सर्व अंगोपांगांवर ‘राजकारण’ (खरे म्हणजे सत्ताकारण) नावाच्या महिषासुराने आक्रमण केलेले आहे. आता तर भरीस भर कोरोनासुराने प्रचंड छळवाद मांडलेला आहे. सामान्य माणसाच्या जीवनयापनाचा मार्ग सुखद राहिलेला नाही. हा मार्गच मुळी भ्रष्टाचाराच्या अंधार्‍या गुहेतून जातो. दहशतवादाचे काटे या मार्गावर जागोजागी विखुरलेले आहेत. मार्गातील, अविचाराच्या डबक्यावर साचलेले रोगराईचे शेवाळ शिसारी आणते आहे. दैनंदिन दुःखाचे खाचखळगे तर आहेतच. परंतु सर्वात भयावह बाब म्हणजे संपूर्ण मार्ग ‘राजकारण आणि सत्ताकारण’ यांच्या चिखलाने लडबडून गेलेला आहे.
 
 
आजचा काळ संभ्रमावस्थेत असण्याचा विचित्र काळ आहे. लाचारी आणि जीहुजुरी पायी महाराष्ट्राच्या मानसन्मानाला ग्रहण लागलेले आहे. हेव्यादाव्याचे राजकारण करण्यात गुंतलेले आधुनिक अमीर-उमराव आणि नोकरशाहीतील मनसबदार अशा आपत्तीच्या काळातही राजकारणाचे डाव टाकून बसलेली आहेत. संपूर्ण समाजकारण, संस्कृतीकारण, साहित्यकारण आणि राजकारण म्हणजे सापशिडीचा खेळ झाला आहे. आपण हे केवळ बघतच बसणार काय? राजकीय स्वार्थापायी निर्माण केलेल्या या कृत्रिम सीमांचे आपण उल्लंघन केव्हा करणार? दोष तरी कुणाला देणार? जिथे मनेच मेलेली असतात तिथे काय प्राप्त होणार?
 
 
विसरून जाणे हे मृत मनाचे मोठे लक्षण असते. ‘मला काय त्याचे?’ या वृत्तीने आपण स्वतःचा अवसानघात करून घेतो. अत्यंत सहजतेने आपण सामूहिक अपमान सहन करतो, प्रसंगी विसरून जातो. मनाची शक्तीच लयाला जाते आहे की काय, अशी साधार भीती वाटते. समाजधारणेसाठी आवश्यक असलेली सज्जनशक्ती आणि सृजनशक्ती अशी स्वतःला कोंडून का घेते आहे? झडझडून बाहेर का पडत नाही? मनाचे सीमोल्लंघन का करीत नाही? आपल्या मनातील शक्तिरूप सज्जनता आणि सृजनता जागविण्याचा मुहूर्त ही विजयादशमी आहे. हे खरे सीमोल्लंघन असेल. या शक्तीचे जागरण हाच दसरा! आज असुरांच्या फौजा नवनवीन स्वरूपात निर्माण होताहेत. सामान्य माणसाचे रोजचे जगणे हीच लढाई झालेली आहे. यातून सुटका सर्वांनाच हवी आहे. परंतु सुटका करायला ‘ती’ आकाशातून येणार नाही तर आपल्याच मनातील महिषासुरमर्दिनीला बाहेर काढावे लागेल. वर मागावा लागेल. महाराष्ट्राची कुलदेवता आई तुळजाभवानी ही ‘रामवरदायिनी’ आहे. प्रत्यक्ष प्रभुरामचंद्राला तिने वर दिला आणि सहाय्य केले. आपणही रामाचे दास आहोत. समर्थांप्रमाणे आपणही तिला साकडे घालूया...
 
उदंड ऐकिले होते। रामासी वरु दिधला।
मीही दास रघुनाथाचा। मज ही वरदायिनी॥
दुष्ट संहारिले मागे। ऐसे उदंड ऐकितो।
परंतु रोकडे काही। मूळ सामर्थ्य दाखवी॥
 
महामुनी मार्कंडेयांच्या देवीमाहात्म्यातील मध्यम चरितात एक कथा आहे. जेव्हा सृष्टीत तामसी आणि अंधकाररूप महिषासुर प्रबळ झाला तेव्हा, खदिरांगासारख्या त्याच्या डोळ्यांना बघून सर्व देवदेवतांचे अवसान गळाले. भयभीत झालेले देव प्रजापतीला शरण गेले. प्रजापतीने ही सर्व वस्तुस्थिती ब्रह्मा-विष्णू-महेश या त्रिदेवांना कथन केली. या त्रिदेवांनी सर्व देवतांचे तेज एकत्रित केले. त्या एकत्रित तेजाने स्त्रीरूप धारण केले. या स्त्री रूपाचा प्रत्येक अवयव कोणकोणत्या तेजाने निर्माण झाला, याचे अत्यंत सुंदर वर्णन देवीमाहात्म्याच्या मध्यम चरितात येते.
 
यदमुच्छाम्भवं तेजस्तेनाजायत तन्मुखं।
याम्येन चाभवं केशा बाहवो विष्णुतेजसा॥
ततः समस्त देवानां तेजोराशी समुद्भवां।
तां विलोक्य मुदं प्रापुरमरा महिषार्दितः॥
 
या कथेचा अर्थ नक्की काय आहे? निदान वर्तमानाच्या संदर्भात ही कथा किती अर्थपूर्ण आहे? याचा शोध घ्यायला हवा. पुराणातील सर्वच कथा निरर्थक आणि भाकड आहेत असे समजणारी आणि त्या कथांचे विकृत अर्थ लावण्याचा छंद असलेली एक टोळी आपल्या समाजात सतत कार्यरत असते. असे स्वनामधान्य आपण बाजूला सारू. परंतु अन्य मंडळींनी या कथेचा मथितार्थ निदान विजयादशमीला तरी समजून घ्यायला हवा. त्या कथेतील सत्य शोधले पाहिजे. समस्त देवदेवतांचे सारभूत वैष्णवतेज एका स्त्रीरूपात परिवर्तित होते. कारण, आपल्या समस्त पुत्रांची चिंता केवळ मातेलाच असते. आपल्या तेजासोबतच सर्व देवदेवतांनी आपापली शस्त्रेसुद्धा तिला अर्पण केली होती. त्याच महातेजस्विनीची महिषासुरमर्दिनी झाली. असे समस्त देवदेवतांचे तेज शिलांगणाला निघत असते. कथांमध्ये उल्लेखिलेले सिद्ध, विद्याधर, ऋषिमुनी गण, साधक, देवता या व्यक्तिरूप नसून, व्यक्ती आणि समाज यांच्या ठिकाणी असलेल्या शुभ, पवित्र आणि कल्याणकारी प्रवृत्तींची प्रसादचिन्हे आहेत. या वृत्तींनीच पुराणांतरी मानवरूपे धारण केली आहेत. आजच्या घडीला समाजात आणि राष्ट्रजीवनातही प्रकर्षाने दिसणारे आणि जाणवणारे प्रमाद, आतंक, दहशत, भ्रष्टाचार, कामपिसाटपण, गुन्हेगारीवृत्ती, स्त्रीवरील अत्याचार, नृशंसता, स्वार्थ, सत्तेचा माज, इतकेच नव्हे तर आत्मदौर्बल्य ही सारी महिषासुराचीच वेगवेगळी रूपे आहेत. हाच महिषासुर आपल्या मनात वसलेल्या देवीच्या स्वरूपाशी सतत संघर्ष करीत असतो. या महिषासुराचा एकच घोष आहे. ‘रसभुंजोवयं’!! रूप, रस, गंध, स्पर्श, शब्द या सर्वांवर माझा एकट्याचा अप्रतिहत एकाधिकार आहे. ज्या ज्या क्षणांना हा महिषासुर आपले डोके वर काढतो, त्या त्या वेळेस आपल्या मनातील देवतांश असलेल्या मर्दिनीचे त्याचे बरोबर युद्ध होते. आपली मनोभूमीच रणभूमी होते. या युद्धात देवी विजयी होत नसेल, तर ती आपली मानसिक दुर्बलता आहे. ज्यांच्या मनोभूमीवर ती तेजस्विनी जिंकत असेल ते महापुरुष असतात.
 
 
सारांश काय तर विजयादशमीचा दिवस हा शस्त्रपूजनाचा आहे, शक्तिपूजनाचा आहे. त्याशिवाय महिषासुरांच्या टोळ्यांचा नाश होणार नाही. शक्तिसंपन्न आणि सामर्थ्यपूर्ण समाज आणि असे राष्ट्रच आपला दबदबा निर्माण करू शकते. विजयादशमी हा आपल्या संस्कृतीत साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. हा आहे शक्तिसाधनेचा मुहूर्त आणि या साधनेची अधिष्ठात्री देवता आहे शिलांगणाला निघालेली जगदंबा! समर्थांच्या मनःचक्षूंपुढे हीच आदिशक्ती तरळत होती. हीच शक्ती प्रतापगडावर प्रकट झाली होती. शक्तिसाधनेची ही विजिगीषा जागविण्याचा आजचा दिवस आहे. समर्थ म्हणाले होते...
 
शक्तीनें पावती सुखें। शक्ती नसतां विटंबना।
शक्तीने नेटका प्राणी। वैभवे भोगता दिसें॥
कोण पुसे अशक्ताला। रोगींसे बराडी दिसे।
कळा नाही कांती नाही। युक्ती बुद्धी दुरावली॥
सार संसार शक्तीने। शक्तीने शक्ती भोगिजे।
शक्ती तो सर्वही भोगी। शक्तीवीण दरिद्रता॥
शक्तीने मिळती राज्ये। युक्तीने यत्न होतसे।
शक्ती युक्ती जये ठाई। तेथे श्रीमंत धावती॥
 
ही शक्ती आपल्या मनात प्रतिष्ठित असलेल्या शिव तत्त्वातच आहे. तिला जागृत करायला हवे. निद्रितावस्थेत असलेल्या शक्तीचे सीमोल्लंघन घडवून तिला, दुष्ट शक्तींच्या विरोधात संघर्ष करायला उद्युक्त केले पाहिजे. आजच्या घोर अंधारातून बाहेर पडायचा हाच एक मार्ग आहे. कारण
 
त्वं पराप्रकृति: साक्षात ब्रह्मण: परमात्मनः।
त्वत्तो जातं जगत्सर्वं त्वं जगज्जननी शिवे॥
 
आजची परिस्थितीही हीच मागणी करीत आहे. अन्याय, अनाचार, अनीती या रूपातील असुर शक्तीचा समूळ नाश करायला आपल्या शिव मनातील शक्तीचे जागरण हीच काळाची गरज आहे. असे घडले तरच येणारे सीमोल्लंघन सार्थ ठरेल.
 
- 9822222115