गोष्टीवेल्हाळ माणूस

    दिनांक :10-Oct-2021
|
- अनिल मेहता
ज्येष्ठ प्रकाशक
द. मा. मिरासदार अर्थात दमा म्हणजे गोष्टीवेल्हाळ माणूस. याच गोष्टीवेल्हाळपणातून त्यांच्यातला कथाकथनकार आकाराला आला. त्यांच्या कथाकथनाच्या शैलीने सार्‍या महाराष्ट्रालाच नव्हे, तर जिथे जिथे मराठी भाषा बोलली जाते, तिथे तिथे त्यांचे चाहते निर्माण झाले. एक काळ असा होता की, व्यंकटेश माडगुळकर, शंकर पाटील आणि दमा मिरासदार या त्रिकुटाने आपल्या कथाकथनाद्वारे सार्‍या महाराष्ट्राला गारूड घातलं होतं. त्यांचं कथाकथन राज्याच्या सांस्कृतिक जीवनातला एक अविभाज्य भाग बनला होता. त्यांचे कार्यक्रम सदोदित हाऊसफुल्ल चालायचे. दमांनी ग्रामीण भागातल्या विनोदी कथाकथनाद्वारे सार्‍या महाराष्ट्राचं मनोरंजन केलं. नेहमीच्या जीवनातले प्रश्न विसरायला लावून श्रोत्यांच्या चेहर्‍यांवर निखळ हास्याचे क्षण निर्माण करण्याची विलक्षण हातोटी त्यांना साधली होती. ग्रामीण भागातल्या बेरकी, इरसाल पात्रांच्या मदतीने त्यांनी एक वेगळं कथाविश्व उभारलं.
 
 
mirasdar_1  H x
 
एक अत्यंत निगर्वी, कोणत्याही प्रकारचा गर्व आणि अहंकार नसलेला माणूस म्हणजे दमा, असंही त्यांचं वर्णन करता येईल. पुण्यात असो वा कोल्हापूरला, कधीही ऑफिसला कामानिमित्त आले की त्यांच्याशी गप्पा रंगणार हे नक्की. या भेटीदरम्यान त्यांनी एखादी गोष्ट सांगितली नाही, असं कधी घडलं नाही. त्यांना गोष्टी सांगण्याचं व्यसनच लागलं होतं, असं म्हणायला हरकत नाही.
 
 
दमांच्या लोकप्रियतेचा सांगण्यासारखा एक किस्सा म्हणजे, एकदा मेडिकलचे चार-पाच विद्यार्थी आमच्या अजब पुस्तकालय या दुकानात आले. आल्या-आल्या त्यांनी दमांची पुस्तकं मागितली. कोणत्याही चौकशीशिवाय त्यांनी दमांची पुस्तकं मागितल्याचं पाहून मला थोडं आश्चर्य वाटलं. उत्सुकता चाळवल्यामुळे मी त्यांना सहज विचारलं की, आल्या आल्या तुम्ही थेट दमांचीची पुस्तकं कशी काय मागितली. त्यावर ते म्हणाले की, दमा इथे आले आहेत. नजीकच्या चपलांच्या दुकानात ते खरेदी करीत आहेत. त्यांना पाहून आम्हाला आमची राहून गेलेली त्यांच्या पुस्तकांच्या खरेदीची गोष्ट लक्षात आली. त्यामुळे आम्ही दुकानात थेट त्यांच्या पुस्तकाची मागणी केली. असा हा त्यांच्याबाबतचा आलेला एक वेगळा अनुभव. शेजारच्या दुकानातून त्यांना बोलावून आणल्यावर त्यांच्याशी गप्पांची मैफल झडली. गप्पा झाल्यावर दमांनी नेहमीप्रमाणे एक गोष्ट सांगितली आणि निरोप घेतला. साधेपणा हा त्यांच्यातला आणखी एक भावणारा गुण म्हणावा लागेल.
 
 
पंढरपूरमध्ये व्यतीत केलेल्या बालपणात ग्रामीण भागातल्या विविध स्वभावाच्या, प्रवृत्तीच्या व्यक्तींना त्यांना न्याहाळता आलं. सहवासात आलेल्या विविध व्यक्तींच्या स्वभावाचे कंगोरे त्यांनी टिपले. आपल्याला हेच निरीक्षण त्यांनी रेखाटलेल्या ग्रामीण पात्रांमध्ये आढळते. प्रत्यक्षात घडलेल्या घटनांचा आधार घेत, त्यामध्ये अनुभवाला आलेल्या पात्रांना चपखल बसवत आकाराला आलेल्या कथांनी वाचकांच्या मनाचा ठाव घेतला. घटनेशी एकरूप झालेला परिसर, वातावरणनिर्मिती, त्यातल्या व्यक्तिरेखा याच्या एकत्र परिणामातून एक वेगळं विश्व वाचकांच्या मन:पटलासमोर उभं करण्यात ते यशस्वी झालं. त्यांच्या स्वतंत्र कल्पनाशक्तीमधून आकाराला आलेल्या घटना हास्यनिर्मिती करतात. त्यांच्या लेखनाने शहरातल्या वाचकांना इरसाल, बेरकी मंडळींच्या ग्रामीण जीवनाचं दर्शन घडलं, असं म्हणावं लागेल. त्यांच्या कथासंग्रहांतल्या बहुतेक कथा ग्रामीण जीवनावर आधारलेल्या असत. ग्रामीण जीवनातलं विसंगतीचं, विक्षिप्तपणाचं आणि इरसालपणाचं दर्शन घडवून त्यातला विनोद मिरासदारांनी आपल्या कथांमधून फुलवला. त्यांच्या लेखनात अस्सल विनोदी अशी अनेक गावरान पात्रं आढळतात. त्यात नाना चेंगट, गणा मास्तर, रामा खरात, बाबू पैलवान, सुताराची चहाटळ आनशी, ज्ञानू वाघमोडे अशी एकाहून एक अस्सल इब्लीस, बेरकी, वाह्यात, टारगट आणि काहीशी भोळसट पात्रं आपल्याला भेटतात. ती श्रोत्यांना खळाळून हसायला लावतात.
 
 
दमांच्या विशिष्ट हातवारे करत केलेल्या शैलीतल्या सादरीकरणामुळे या कथा वाचकांच्या आणि श्रोत्यांच्या मनात कायमच्या कोरल्या गेल्या. मात्र, त्यांच्यातला लेखक केवळ विनोदी कथांपुरता मर्यादित राहिला नाही. ‘स्पर्श’, ‘विरंगुळा’, ‘कोणे एके काळी’ सारख्या काही गंभीर कथांमधून त्यांनी जीवनातल्या कारुण्याचं विलक्षण प्रत्ययकारी दर्शन घडवलं. अनेकदा त्यांच्या विनोदालाही कारुण्याची झालर असल्याचं आपल्याला दिसून येतं. असं असलं तरी त्यांचा मुख्य पिंड विनोदी कथाकाराचाच होता आणि त्यामुळेच त्यांना लोकप्रियताही लाभली. काही काळ पत्रकारितेत घालवल्यानंतर अध्यापन क्षेत्रात ते अखेरपर्यंत कार्यरत राहिले. शिक्षण क्षेत्रात असताना त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचंही काम केलं. मिरासदारांच्या व्यंकूची शिकवणी, माझ्या बापाची पेंड, शिवाजीचे हस्ताक्षर, भुताचा जन्म, माझी पहिली चोरी, हरवल्याचा शोध आदी कथा कमालीच्या लोकप्रिय झाल्या. गप्पागोष्टी, गुदगुल्या, मिरासदारी, गप्पांगण, ताजवा असे 24 कथासंग्रह, 18 विनोदी चित्रपटांच्या पटकथा त्यांच्या नावावर जमा आहेत. दमांच्या ‘माझ्या बापाची पेंड’ आणि ‘भुताचा जन्म’ या कथांचा विशेष उल्लेख करायला हवा. विनोदी लेखनावर चर्चा करताना या कथांचा उल्लेख करावा लागेल. मराठी साहित्यविश्वातल्या उल्लेखनीय विनोदी कथांमध्ये वरील दोन कथांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.
 
 
विनोदी लेखनाबरोबर चित्रपट पटकथालेखनाच्या क्षेत्रातही दमांनी भरीव कामगिरी केली. ‘एक डाव भुताचा’ आणि ‘ठकास महाठक’ या दोन चित्रपटांच्या संवादलेखनाबद्दल त्यांना पारितोषिकं मिळाली. त्यांच्या ‘व्यंकूची शिकवणी’ या गाजलेल्या विनोदी कथेवर ‘गुरुकृपा’ हा मराठी चित्रपट बेतला होता. त्यांची ‘भुताचा जन्म’ ही कथा बारावीच्या अभ्यासक्रमातल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात घेतली आहे. तसंच याच कथेवर बनलेली शॉर्ट फिल्म आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये गाजली. ही कलाकृती रोममध्ये झालेल्या महोत्सवामध्येही दाखवली गेली. मिरासदारांच्या खास विनोदी शैलीतल्या निवडक कथांचा अत्यंत सुरस संग्रह म्हणजे ‘मिरासदारी’.
 
 
मराठी साहित्यविश्वात ग्रामीण साहित्याच्या लोकप्रियतेचा एक काळ होता. त्याच काळात विनोदी बाज असणार्‍या ग्रामीण कथांनी वाचकांना आकर्षित केलं. एकसुरी, साचेबद्ध नसल्यानं या कथा वाचकांना खिळवून ठेवायच्या. या कथांमध्येही विविधता होती. मिरासदारांच्या कथांमधून आढळणारी एक अनोखी मिश्किलपणाची, चमत्कृतीपूर्ण वळणांची आणि गमतीदार विक्षिप्तपणाची झाक वाचकाला अतिशय भावली. महाराष्ट्रातली विविध गावं आणि तिथे राहणारी माणसं आपल्याला मिरासदारांच्या कथेतून भेटत राहतात. ‘चकाट्या’ या कथासंग्रहातही ही गावागावांतली आणि शहरात जागोजागी आढळणारी अवली स्वभाववैशिष्ट्यांची पात्रं मनात घर करून राहतात. केवळ शाब्दिक विनोदावर विसंबून राहण्याऐवजी प्रासंगिक विनोद लेखनातून वाचकांसमोर उभा करणं आणि सरळ-साध्या लिखाणातून वाचकाला गुंतवून ठेवणं हे त्यांच्या लेखनाचं यश म्हणता येईल. लेखनात चौफेर कामगिरी करणार्‍या मिरासदारांनी 1998 मध्ये परळी वैजनाथ येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं. 2015 मध्ये राज्य साहित्य संस्कृती मंडळाचा प्रतिष्ठेचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार त्यांना प्राप्त झाला. 2015 मध्ये त्यांना ‘पुलोत्सव जीवनगौरव’ पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं
 
 
मिरासदारांची बहुतेक सर्व पुस्तकं आम्ही प्रकाशित केली. हे साहित्य व्यवहार पटल्याने आमचे संबंध प्रदीर्घ काळ चांगले राहिले. दमा मुळातच साधे सरळ असल्यानं त्यांच्या बरोबरच्या संबंधात कधीही तणाव किंवा वितुष्टता आली नाही. पूर्वीच्या त्यांच्या प्रकाशकाबरोबर रॉयल्टीतून काहीतरी वाद निर्माण झाल्याचं आमच्या ऐकिवात आलं. त्यानंतर आमचा त्यांच्याशी संबंध आला. आम्ही त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्याशी आमचे संबंध एखादं मैत्र जपल्यासारखे उत्तम होते. त्यामध्ये अखेरच्या क्षणापर्यंत वाद निर्माण झाले नाहीत किंवा कटूता निर्माण झाली नाही. असा हा साधा, सरळ, निगर्वी माणूस आपल्यातून निघून गेल्याचं फार दु:ख होतं. त्यांच्या जाण्यानं साहित्यविश्वाचं, मराठी वाचकांचं एवढंच नव्हे, तर प्रकाशन व्यवसायाचंही मोठ नुकसान झालं आहे. त्यांना भावपूर्ण आदरांजली.