चिनी इन्फ्लुएन्स ऑपरेशन्स कसे थांबवणार?

    दिनांक :10-Oct-2021
|
राष्ट्ररक्षा
- ब्रिगेडियर हेमंत महाजन
चीन गेले कित्येक वर्षे भारतामध्ये इन्फ्लुएन्स ऑपरेशन्स म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या भारतीयांना आपल्या बाजूने वळण्याचा प्रयत्न करीत आहे; ज्यामुळे भारताची धोरणे ही चीनच्या बाजूने झुकतील आणि चीनला आर्थिक, सामरिक आणि इतर अनेक फायदे होतील. मागच्या लेखामध्ये आपण कॉर्पोरेट जगतात चिनी इन्फ्लुएन्स ऑपरेशन्सचे विश्लेषण केले. या लेखामध्ये आपण चीन, भारतातील विचार मंच आणि सिव्हिल सोसायटी, विविध भारतीय विद्यापीठात काम करणारे शिक्षणतज्ज्ञ यामध्ये कशी इन्फ्लुएन्स ऑपरेशन्स करतात, याचे विश्लेषण करू.
 
 
china1_1  H x W
 
धोरणे चीनच्या बाजूने तयार करा
चीन वेगवेगळ्या क्षेत्रातील भारतीयांवर इन्फ्लुएन्स ऑपरेशन्सचा वापर करून त्यांना आपल्या बाजूने आणण्याचा प्रयत्न करतो. आपण या लेखामध्ये चीनने भारताचे विचार मंच आणि विचारवंतांच्या मनामध्ये कसा प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आहे, याचे विश्लेषण करू.
 
याशिवाय चीन भारतीय प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, असो की सोशल मीडिया त्यामधील अनेकांना आपल्या बाजूने आणून चीनविषयी भारतात चांगले वातावरण निर्माण करतो. याचा उद्देश असतो की, प्रत्येक क्षेत्रामध्ये चीनचे समर्थक तयार व्हावेत; जे चीनची भाषा बोलतील आणि त्या क्षेत्रातील धोरणे ही चीनच्या बाजूने तयार करायला मदत करतील. तंत्रज्ञान म्हणजे आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या मदतीने चीन कोणाला आपल्या बाजूने आणायचे, ते ठरवतो. जसे डाव्या विचारसरणीचे पत्रकार, तथाकथित तज्ज्ञ आणि इतर. प्रत्येक विचार मंचामध्ये काही सरकारच्या विरोधात नेहमी बोलण्याकरिता तयार असतात. त्यांना चीनच्या बाजूने वळवले जाते. प्रत्येक वेळा थीम किंवा जे तत्त्व समोर मांडले जाते ते असते की प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षेत्रांमध्ये, चीनचा मोठा विजय होत आहे आणि भारत रोजच वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये चीनच्या मागे पडत आहे. भारताला चीनचा मित्र बनण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. मित्र बनणे याचा येथे अर्थ होतो की, चीनच गुलाम बनणे, चायनीज कम्युनिस्ट पार्टीला जे हवे, त्याला होकार देणे.
 
 
चीन जसे सांगेल तसे वागावे
चीनचे इन्फ्लुएन्स ऑपरेशन्स अनेक वर्षांपासून पद्धतशीरपणे सुरू आहे आणि अनेक वर्षे हे चालूच राहील. यामध्ये भारतातल्या समाजामध्ये दुही पसरून त्यांना एकमेकांशी भांडायला तयार करणे, भारताच्या लोकशाही पद्धतीचा दुरुपयोग करणे, हे सामील असते.
 
आपण या लेखात दोन महत्त्वाच्या मुद्यांवर बोलू. काही विचार मंचांमध्ये चीनने कसा प्रवेश केला आहे? राजधानी दिल्लीमध्ये अनेक विचार मंच आहेत. चीनसारखा विचार करणार्‍या रिसर्च स्कॉलर्सना, पॉलिसी एक्सपर्टना चीनमध्ये स्कॉलरशिप देऊन पाठविले जाते. अर्थात तिथे जे संशोधन केले जाते ते चीनच्या बाजूने असते. दाखवले जाते की, भारत आणि चीनच्या लोकांमधले संबंध वाढवावे. खरा उद्देश असतो की, भारतीयांनी फक्त चीनसारखे वागावे, चीनच्या बाजूने वागावे, चीन जसे सांगेल तसे वागावे.
 
 
विचार मंचांना कोटी रुपये चीनकडून देण्यात आले
दिल्लीमधील चिनी वकिलात, अनेक विचार मंच आणि विचारवंतांच्या संपर्कामध्ये असते. काही विचारमंच दाखवतात की, ते अतिशय न्यूट्रल आहेत आणि कुठल्याही विषयावर आपले स्वतंत्र मत मांडतात. पण खरं तर ते चीनची भाषा बोलतात. अशा विचार मंचांना 2016 ते 18 वर्षामध्ये काही कोटी चिनी वकिलातीकडून देण्यात आले. यामधील काहींचा भारतीय नोकरशाहीशी घनिष्ठ संबंध आहे. चीनसारखा विचार करणारे काही नोकरशाहा सरकारला चीनला सोयीस्कर सल्ला देतात.
 
उदाहरणार्थ भारत चीनच्या वन बेल्ट वन रोड या प्रकल्पांमध्ये सामील झाला तर खूप मोठा फायदा आहे. चीनबरोबर मुक्त व्यापार करार करायला पाहिजे; ज्यामुळे भारताला फायदा होईल. खरे तर मुक्त व्यापार झाला तर भारताचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. कोरोना हा चीनमध्ये उत्पन्न झाला नाही; त्याचे काही व्हेरियंट हे भारतामध्येसुद्धा तयार होतात. चीन भारताकरिता औषधे आणि रोगराई निवारण साधने पाठवत आहे. सत्य हे आहे की, चीनने पाठविलेली सामग्री वापरण्याच्या लायकीची नव्हती. अनेक युनिव्हर्सिटीबरोबर वेगवेगळे करार केले जातात. त्यामध्ये चिनी एक्सपर्टना भारतात विद्यापीठांकडे पाठविले जाते आणि काही वेळा त्या विद्यापीठातल्या काही चिनी समर्थक प्रोफेसर चीनला बोलावले जातात. भारतामध्ये आज अनेक प्रायव्हेट इंडस्ट्रीने सुरू केलेली विद्यापीठे आहेत. त्यामधील काहींवर चीनचा प्रभाव आहे. काही विचार मंच चीनच्या बाजूने कार्यक्रम करतात.
 
 
विद्यार्थ्यांना इन्फ्लुएन्स ऑपरेशन्सचे शिकार बनवले जाते
काही विद्यार्थ्यांनासुद्धा या इन्फ्लुएन्स ऑपरेशन्सचे शिकार बनविले जाते. अनेक विद्यार्थ्यांना शिकवले जाते की, सरकारच्या विरोधात बोलणे हे एक प्रगतीचे लक्षण आहे. सरकारने काही पण केले तरी त्याला विरोध करणे, हेच आपले धोरण पाहिजे. यामुळे जशी क्रांती चीनमध्ये झाली होती तशी क्रांती इथे होऊ शकेल. अशी इन्फ्लुएन्स ऑपरेशन्स चीनने ऑस्ट्रेलिया आणि युरोपमध्ये केली आहेत. आता हे देश हळूहळू चीनबरोबर असलेले संबंध कमी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. चीनचे 2500 मिलिटरी सायंटिस्ट वेगवेगळ्या देशांमध्ये पसरलेले आहेत. ते देशाच्या युनिव्हर्सिटी confucious institutes किंवा चिनी अड्डा असे कार्यक्रम चालवतात. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, बिग डेटा या सगळ्यांचा वापर करून एक डेटा तयार केला आहे; ज्यामध्ये जे प्रोफेसर, विचारवंत, नोकरशहा आणि इतर जे चीनच्या बाजूने येऊ शकतील, त्यांची एक लिस्ट आहे आणि त्यांना नंतर चिनी प्रचाराचा बळी बनवला जातो.
 
या सगळ्यांमध्ये मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. राजीव शर्मा नावाचा एक पत्रकार पकडला गेला. तो चीनच्या बाजूने कशी कारवाई करीत होता, याची माहिती मीडियामध्ये आली आहे. दलाई लामा हा दहशतवादी मसूद अझरपेक्षासुद्धा जास्त धोकादायक आहे. भारताने जर न्युक्लियर सप्लाय ग्रुपमध्ये जायचे असेल तर चीनचे ऐकावे. भारताने कुठल्याही परिस्थितीमध्ये क्वाड संघटनेमध्ये जाऊ नये, भारताने चीनला आवडणार नाही असे कुठलेही कृत्य करू नये. आपल्या सीमावर्ती भागात रस्ते बांधणे किंवा आपले रक्षण करण्याकरिता आक्रमक 17 कोर उभी करू नये. यामुळे चीन रागवेल वगैरे.
 
गलवान लढाईनंतर प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने चिनी वकिलाचा इंटरव्ह्यू घेतला; ज्यामध्ये गलवान हे भारतामुळे झाले, असे त्यांनी सांगितले. असा इंटरव्ह्यू घेण्याची काय गरज होती? कारण स्पष्ट आहे, चीनने भारतातल्या मोठ्या न्यूज कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. बाईट डान्स या चिनी कंपनीने डेलीहंट या प्लॅटफॉर्ममध्ये 25 मिलियन डॉलर्स गुंतवणूक केली आहे. भारतीय सैन्याने डेलीहंट या न्यूज पोर्टलवर बंदी घातली आहे. चीनच्या बाजूने लिहिणारे न्यूज प्लॅटफॉर्म हिंदी, इंग्रजी, मल्याळम, मराठी, तेलगू, गुजराथी, बेंगॉली, कन्नडा, तामिळ, पंजाबी, ओडिया, उर्दू, भोजपुरी, असामीस आणि कश्मीरी भारतीय भाषांमध्ये असतात.
 
चीनला सोयीस्कर बातम्या चीनमधून पाठवल्या जातात; परंतु नाव असते भारतीय न्यूज पोर्टलचे पत्रकार जे चीनमध्ये आहेत. भारतातील काही वर्तमानपत्रे चिनी दबावाखाली येऊन भारताला जगाच्या समोर पाडण्याचा प्रयत्न करतात.
 
 
भारताने काय करावे?
भारतामधील चिनी हस्तकांचा शोध लावा आणि कायद्याच्या अंतर्गत कारवाई करा. पण असा कायदा अस्तित्वात आहे का? भारतीयांना हे समजण्याची गरज आहे की, चीन हा भारताचा नंबर एक शत्रू आहे आणि कित्येक वर्षे नंबर एक शत्रू राहणार आहे. अफाट आर्थिक ताकदीचा वापर करून चीन भारतीयांना आणि भारतीय संस्थांना भ्रष्ट करतो. म्हणून इंटर एजन्सी संस्थांकडून सर्वसमावेशक अभ्यास केला जावा, उपाययोजना सुचविल्या जाव्या आणि त्यावर ती कडक अंमलबजावणी केली जावी. चीनकडून भारतीयांना कुठल्याही क्षेत्रात मिळणार्‍या देणग्या थांबवल्या जाव्यात. सर्वात महत्त्वाचे की, भारत-चीन विरोधात इन्फ्लोज ऑपरेशन करून चीनला आक्रमक इशारा देऊ शकतो का?
 
(लेखक संरक्षणविषयक तज्ज्ञ आहेत.)
- 9096701253 
••