वाढवा शक्ती मेंदूची;वाढेल खात्री यशाची!

    दिनांक :10-Oct-2021
|
कशासाठी? यशासाठी!
डॉ. नितीन विघ्ने
14 वर्षाच्या मुलाला माझ्याकडे आणलं तेव्हा त्याच्या आईने मला सांगितलं की, तो मध्येच विचित्र हातवारे करतोय; पण तसा नॉर्मल आहे. अभ्यास करतोय, पण लगेच काही वेळात विसरतोय. हुशार आहे, पण गुण कमी मिळतात व कमी बोलतो. पण याच्यात आणि इतर समवयस्क मुलांमध्ये फरक मात्र चटकन जाणवतोय. आता तुम्हीच सांगा आम्ही काय करू? काही चाचण्या केल्या तेव्हा त्या मुलाची समस्या लक्षात आली. त्याचे कुपोषण होत राहिल्यामुळे त्याच्या मेंदूच्या दैनंदिन गरजा पूर्ण होत नव्हत्या. यामुळे त्याचा मेंदू अपेक्षित क्षमतेने काम करू शकत नव्हता.
 
 
vighne 3_1  H x
 
योग्य उपाययोजना काळजीपूर्वक अमलात आणल्यानंतर त्याला अभ्यास कसा करावा, त्याचे प्रशिक्षण दिले. या सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने कराव्या लागल्या. साडेतीन महिन्यांनी तो इतर समवयस्क मुलांच्या स्तरावर आला आणि त्यानंतर दीड महिन्यानंतर त्याने नेत्रदीपक प्रगती केली. एक गोष्ट आपण विसरता कामा नये की, नैसर्गिक नियम सर्वांना सारखेच असतात. त्या नियमांचा जाणते-अजाणतेपणी भंग झाल्यास त्याच्या परिणामांना आपल्याला सामोरे जावेच लागते. उपाय शोधतानासुद्धा त्याच नैसर्गिक नियमांचा आधार घ्यावा लागतो. वाचकांनी कृपया मागच्या रविवारी प्रकाशित झालेल्या ‘अमर्याद शक्ती मेंदूची; तुमची आमची सर्वांची!’ या लेखाचा संदर्भ घ्यावा. मेंदूची शक्ती वाढविण्यासाठीसुद्धा आपल्याला मेंदूची अधिक माहिती करून घेणे आवश्यक आहे.
 
 
मेंदूच्या विकासाचे टप्पे
Minus Five To Plus Five : मेंदूच्या योग्य विकासासाठी बाळाच्या जन्माच्या आधीच आईचा स्वभाव, आहार, व्यायाम, झोप, ध्यान, साधना या शिवाय आणखी काही वैज्ञानिक गोष्टींकडे पालकांनी नीट लक्ष दिल्यास पूर्ण जगात सन्मान, प्रसिद्धी मिळवेल अशा जिनिअस म्हणजेच अलौकिक बुद्धिमत्ता असलेल्या अपत्याला जन्म देणे आज शक्य झाले आहे. ‘क्रियेटिंग अ जिनिअस’ या आमच्या उत्तम मेंदू विकास प्रकल्पामध्ये गरोदरपणातील पाचव्या महिन्यांपासून तर जन्मानंतर वयाच्या 18 वर्षापर्यंत एकूण 16 टप्पे आखलेले आहेत. यातच ‘मायनस फाईव्ह टु प्लस फाईव्ह’ हा आमचा विशेष उपक्रम असतो. गरोदरपणाच्या पाचव्या महिन्यांपासून तर बाळाच्या जन्मानंतर पाच वर्षेपर्यंत मेंदूच्या नैसर्गिक विकासाचा खूपच महत्त्वाचा काळ असतो. हा काळ आपल्या जीवनाची दिशा बदलवू शकतो. वयाच्या 18 वर्षांनंतर जशी आपली उंची वाढत नाही; त्याचप्रमाणे वयाच्या पाच वर्षापर्यंतच मेंदूचा स्थापत्य-विकास होतो, नंतर नाही. पण या अतिमहत्त्वाच्या काळात बाळासाठी नेमके काय व कसे करायचे याविषयी पालकांना माहिती नसल्यामुळे अपेक्षित विकास होत नाही. अनेक पालक या काळात हसतो-खेळतो आहे ना? खोकला-ताप नाही ना? खातो-पितो आहे ना? एवढेच पाहतात. आपल्या वयाच्या 18 वर्षांपर्यंत मेंदूची वाढ होत असते. सोबतच्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे वाढीचे वेगवेगळे टप्पे व प्रकार असतात. मेंदूमध्ये आपल्या प्रत्येक ज्ञानेंद्रियासाठी वेगळा विभाग असतो. शब्द (ऐकणे म्हणजे कान), स्पर्श किंवा तापमान (कातडी), रूप (दृष्टी म्हणजे डोळे), रस (चव) म्हणजे जीभ आणि गंध म्हणजे नाक या सगळ्या जाणिवा समजण्यासाठी वेगळा विभाग असतो. तसेच प्रत्येक भाषेसाठी वेगळा विभाग असतो.
 
मेंदू-विकासाचे नैसर्गिक टप्पे किंवा विकाराची लक्षणे याची पुरेशी माहिती नसल्यामुळे, मेंदू विकाराच्या केसेस आमच्याकडे शाळेतील शिक्षकांच्या तक्रारींमुळे लक्षात येतात. अनेकदा आपला मुलगा थोडा वेगळा आहे एवढा विचार करून पालक स्वस्थ असतात. काही विकारांमध्ये वयाची पाच वर्षे पूर्ण व्हायच्या आतच चिकित्सा करून सकारात्मक बदल करणे शक्य असते; नंतर नाही.
 
 
मुलांच्या वयानुसार पालकांनी काय करावे?
पालकांनी मेंदूच्या विकासाच्या टप्प्यानुसार काय काय होतं त्याची माहिती करून घ्यावी किंवा नियमितपणे तज्ज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनाप्रमाणे आवश्यक ते बदल किंवा काळजी घ्यावी. खालील बाबतीत पालकांनी सावधानता बाळगणे व सुचविल्याप्रमाणे करणे अतिआवश्यक आहे.
 
1. आधी गरोदरपणात अलौकिक बुद्धिमत्ता व मानसिकता असलेल्या बाळाचा जन्म होण्यासाठी योग्य चाचण्या करून सर्वोत्तम बालक प्रकल्पात भाग घ्यावा. पाच वर्षे वयाखालील मुलांचा मेंदू विकास नीट होतो आहे की नाही, त्याची तपासणी लवकरात लवकर करणे आवश्यक असते. तसेच मुलांच्या मेंदूचा उत्तम विकास साधण्यासाठी पालकांनी प्रशिक्षण घेणे कधीही चांगले. कारण काही समस्या असल्यास त्याचे निराकरण करणे पाच वर्ष वयाच्या आतच महत्त्वाचे ठरते. मेंदूच्या प्रत्येक विभागाचा नीट विकास होण्यासाठी पाच वर्षाखालील मुलांचेसुद्धा विशेष प्रशिक्षण असते. पण अपेक्षित परिणाम साधण्यासाठी मुलांच्या पालकांना प्रशिक्षण देणे अत्यंत आवश्यक ठरते. ऑलिम्पिक प्रतीचे खेळाडू, जागतिक स्तराचे शास्त्रज्ञ किंवा कलाकार घडविण्यासाठी हे प्रशिक्षण खूप आवश्यक असतं. आधी तपासणीनंतर प्रशिक्षण असेच याचे स्वरूप असतं. ऑलिम्पिक स्पर्धेत अनेकदा फक्त 13-14 वर्षाच्या खेळाडूंनी पदक जिंकले आहेत. कल्पना करा, तुमच्या मुलाला असे जिंकण्यासाठी प्रशिक्षणाची सुरुवात कोणत्या वयात करायला हवी? जगातील उदाहरणे पाहिल्यास ही सुरुवात वयाच्या तिसर्‍या किंवा चौथ्या वयातच करावी लागते. मग त्याप्रमाणे त्यांच्या मेंदूचा व व्यक्तिमत्त्वाचा विकाससुद्धा तपासून जागृत राहून घडवावा लागतो.
 
2. वयाची पाच वर्षे पूर्ण झाल्यावर मिडब्रेन अ‍ॅक्टिव्हेशन व अबॅकसच्या क्लासमध्ये मुलांना घालावे. दहा वर्षावरील वयाच्या मुलांना वेदिकमॅथ्सचे शिक्षण द्यावे. बालपणात मुलांचा नीट सर्वांगीण विकास व्हावा व संस्कार व्हावेत म्हणून पालकांनी प्रशिक्षण घ्यावे व संपर्कात राहावे.
 
3. शालेय वयात अभ्यास कसा करावा? उत्तम आज्ञाधारकता व छान वागणूक असावी यासाठी मुलांना प्रशिक्षण वर्गात पाठवावे. त्यासाठी मेंदूचा नीट विकास व्हावा म्हणून व मेंदू कसा वापरायचा त्याचे प्रशिक्षण घेणे खूपच उपयुक्त ठरतं. कारण आधी सांगितल्याप्रमाणे वयाच्या 18 वर्षापर्यंत मेंदूची वाढ सुरूच असते.
 
4. आठ, नऊ किंवा दहाव्या वर्गात योग्य करिअरची निवड करण्यासाठी मेंदूच्या 6-7 तास लागणार्‍या चाचण्या कराव्या लागतात. त्यापेक्षा कमी वेळ लागणार्‍या व फक्त सॉफ्टवेअर वापरून केलेल्या चाचण्या विश्वासार्ह नाहीत. अकरावी प्रवेशाच्या आधीच या चाचण्या करणे महत्त्वाचे आहे. फक्त मुलांच्या आवडीप्रमाणे करिअर निवडणे घातक आहे. कारण एक तर त्यांच्या मेंदूचा पूर्ण विकासच तोपर्यंत झालेला नसतो; शिवाय त्यांची आवड हीच मुळी परिपक्व नसते हे 99 टक्के केसेसमध्ये सिद्ध झाले आहे. एखाद्या विषयात आवड आहे, याचा अर्थ त्या विषयात करिअर करण्याइतकी त्या मुलाची क्षमता आहे, असे सिद्ध होत नाही. अनेकदा आवड ही आवड नसतेच तर स्वप्नरंजन असतं, हे आम्हाला 99 टक्के मुलांच्या बाबतीत लक्षात आलंय. मुलांचा खोटा आत्मविश्वास, भावनिक दबाव व पालकांना असलेली अपुरी माहिती यामुळे पालकांची निर्णय क्षमता कमजोर असते. 5,604 करिअरपैकी फारच कमी करिअर माहिती असतात. मर्यादित ज्ञानावर व भावनेच्या दबावात चुकीचे निर्णय घेऊन जीवनाचा जुगार खेळतात.
 
5. उत्तम व्यावसायिक क्षमता घडविण्यासाठी, त्या सोबतच वैयक्तिक, व्यावसायिक व सामाजिक या जीवनाच्या तीनही जबाबदारींचे संतुलन राखण्यासाठी तसेच रिलेशनशिप किंवा नातेसंबंध सुदृढ ठेवण्यासाठी व आनंदी जीवनासाठी, समस्या निवारणासाठी आमची किंवा तज्ज्ञांची मदत घ्यावी.
 
मेंदूच्या चांगल्या विकासाचा फॉर्म्यूला
आपले विचार आपल्या मेंदूची रचना आणि कार्य बदलू शकतात. म्हणजे काही शास्त्रीय उपायांचा वापर करून आपण आपल्या मेंदूची ताकद, आकार आणि घनता शारीरिकदृष्ट्या वाढवू शकतो.
 
1. पोषण घटक : शारीरिक विकास आणि दैनंदिन शारीरिक कार्यासाठी चार पोषण घटक महत्त्वाचे असतात. मेंदूचे वजन जरी शरीराच्या वजनाच्या 2 टक्के असले, तरी मेंदूची पोषण घटकांची भूक शरीराच्या 20 ते 30 टक्के असते.
अ. प्राणवायू : दीर्घ श्वसन व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच केलेला प्राणायाम याने मेंदूची शक्ती वाढते. चुकीच्या पद्धतीने प्राणायाम केल्यास मेंदूची कधीही भरून न येणारी हानी होऊ शकते. एवढेच नव्हे, तर जीवसुद्धा जाऊ शकतो. म्हणून तज्ज्ञ व्यक्तीच्या प्रत्यक्ष समोर बसूनच प्राणायाम शिकावा. टीव्हीवर किंवा व्हिडिओ पाहून करू नये.
ब. पाणी : मेंदू पाण्याच्या साहाय्यानेच वीज निर्मिती करून कार्य करतो. मेंदूमध्ये 90 टक्के पाणी असतं. शरीरात पाणी कमी झाल्यास विचारशक्ती नष्ट होते तसेच पाणी कमी प्यायल्यास मेंदूची निर्णय घेण्याची व शिकण्याची शक्ती कमी होते. डोके दुखी, चक्कर येणे, लवकर थकवा येणे असे त्रास होऊ शकतात.
क. आहार : ज्यापासून पोळी, भाकर किंवा भात तयार होतो ती तृणधान्ये म्हणजेच तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी हे पदार्थ आहारात कमी झाल्यास मेंदूची मन एकाग्र करण्याची शक्ती कमी होते. भोपळ्याच्या बियांतील मगज, काजू, बदाम, अक्रोड, भाज्या, फळे व इतर स्रोतातून मिळणार्‍या ओमेगा थ्री फॅटी अ‍ॅसिडस् व्हिटामिन बी, के आणि ई मुळे मेंदूची शक्ती वाढते. चायनीज, फास्ट फूड, मॅगी, चहा, कॉफी, एनर्जी व कोल्ड ड्रिंक्स, दारू तसेच नशेच्या पदार्थाचे व्यसन मेंदूच्या कार्यक्षमतेला मारक ठरते.
ड. सूर्यप्रकाश : सूर्यप्रकाशातून व्हिटामिन D तर मिळतेच; त्याशिवाय मन प्रसन्न राहते. कारण उजेडामुळे सेरोटोनिनची निर्मिती व्हायला मदत होते.
 
2. व्यायाम : शरीरालाच नव्हे, तर मेंदूला शारीरिक व्यायामाची अत्यंत आवश्यकता असते. त्यामुळे रक्ताभिसरण उत्तम होऊन मेंदू व पूर्ण शरीराचे आरोग्य व कार्यक्षमता उत्तम राहते. यू-ट्यूबवरून ब्रेन जिमचे आठ प्रकारचे व्यायाम शिकून नियमित केल्यास मेंदूचा छान विकास होतो.
 
3. सकारात्मक विचार : सकारात्मक विचारसरणीमुळे मेंदूवर कमी ताण पडतो. त्यामुळे मेंदूची कार्यक्षमता उत्तम राहते. तसेच शारीरिक आरोग्य व इतर लोकांसोबतचे संबंधसुद्धा चांगले राहतात.
 
4. झोप : नीट झोप न झाल्यास मेंदूची कार्यक्षमता व आयुष्य कमी होते. एकाग्रता, स्मरणशक्ती व ग्रहण क्षमतेवर त्याचा वाईट परिणाम होतो. मेंदूचे शरीरावरील नियंत्रण कमजोर होऊन नुकसान व अपघात संभवतात.
अधिक माहितीसाठी वर दिलेल्या नंबरवर फोन करू शकता. हे सर्व लक्षात ठेवून वाढवा शक्ती मेंदूची, तर वाढेल खात्री यशाची!
 
(लेखक सायकॉलॉजिस्ट, करीअर कौन्सेलर व सॉफ्ट स्किल्स ट्रेनर आहेत)
- 9822462968 
••