तिसऱ्या लाटेची शक्यता कमी, पण ...

    दिनांक :10-Oct-2021
|
नागपूर, 
देशभरात कोरोनामुळे लावण्यात आलेले निर्बंध शिथील करण्यात आलेले आहेत. कोरोना परिस्थितीचा आढावा घेत एक - एक गोष्टी काळजीपूर्वक सुरू करण्यात येत आहे. लसीचे 2 डोस घेतलेल्या आणि दुसरा डोस घेतल्यानंतर 14 दिवस पूर्ण झालेल्यांना रेल्वे प्रवासाला मुभा देण्यात येत आहे. शाळांच्या ठराविक इयत्तांचे वर्ग सुरू करणे, धार्मिक स्थळे खुली करणे हे निर्णय देखील घेण्यात आले आहेत. चित्रपट-नाट्यगृहे देखील 22 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार आहेत.

third wave_1  H 
 
कोरोनाची तिसरी लाट सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात येण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. परंतु, लसीकरणाचा वाढलेला वेग आणि नागरिकांमध्ये कोरोनाशी लढा देण्यासाठी गरजेच्या असलेल्या अँटीबॉडी तयार होणं, केंद्र तसेच राज्य सरकारने घालून दिलेले निर्बंध यामुळे ही लाट अद्याप आलेली नाही. सप्‍टेंबरपासून दिवसाला 60 ते 70 लाख लोकांचे लसीकरण केले जात आहे. आतापर्यंत ज्या राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळण्याचं प्रमाण अधिक होतं तिथे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत असून रुग्णांचा आकडाही कमी होताना दिसत आहे.
 
 
परंतु, नजीकच्या भविष्यात कोरोनाची लाट न येण्यासाठी लस घेण्यासोबतच नागरिकांनी मास्कचा वापर, सामाजिक अंतर आणि सतत हात धुणे या त्रिसुत्रीचा वापर काटेकोरपणे करणे अत्यंत गरजेचे आहे, कोरोनाविरोधात लढाई जिंकण्यासाठी आरोग्य कर्मचारी आणि या लढ्यात अग्रभागी असलेल्या सर्व सरकारी यंत्रणांना सहाय्य करणेही तितकेच गरजेचे आहे.
 
- आकाश R.