संत्रानगरीतील संस्थेला मिळाले ‘रक्षक'चे पेटन्ट !

- रोपट्यांना पाणीपुरवठ्यासह पूर्ण सुरक्षा

    दिनांक :11-Oct-2021
|
नागपूर,  
गेल्या काही वर्षात सणांचे औचित्य साधून, वृक्षारोपण उत्साहाने केले जाते. मात्र, त्या रोपट्याचे खरोखर वृक्षात रुपांतर होते का? हा गमतीचा विषय होतो. पण, या समस्येचे गांभीर्य ओळखून, स्थानिक रेनबो ग्रीनर्स या संस्थेने ‘रक्षक' हे सोप्या तंत्रज्ञानावर आधारीत वृक्षकुंपण अर्थात ट्रीगार्ड तयार केले. विशेष म्हणजे नागपूरकरांच्या या संशोधनावर आता पेटन्टची मोहोर देखील उमटली आहे. ‘रक्षक'चे प्रणेते गौरव टावरी यांनी डिजीटल तरुण भारतच्या प्रतिनिधीशी बोलताना रक्षकचा पेटन्टपर्यंतचा प्रवास उलगडून दाखविला.
 
 
patent _1  H x
 
 
रोपट्याच्या थेट मुळापर्यंत पाणीपुरवठा करणारे रबरी वॉल्व्हचे तंत्रज्ञान या उपकरणात वापरले आहे. रक्षकची उंची ६ ते ६.५ फूट असल्यामुळे जनावरे रोपट्याला खाऊ शकत नाहीत. पाईपसदृश या उपकरणात एकदा पाणी पूर्ण भरले की, साधारण १५ दिवसांपर्यंत रोपट्याला पुन्हा पाणी देण्याची गरज भासत नाही. विदर्भातील कडक उन्हाळ्यात पाण्याअभावी झाडे मरतात. अशा वातावरणात रक्षकचे तंत्रज्ञान फारच फायदेशीर ठरत असल्याची माहिती गौरव टावरी या युवा उद्योजकाने दिली. तारेचे किंवा विटांचे कुंपण करण्याच्या तुलनेत, रक्षक स्वस्त आणि बहुपयोगी उत्पादन असल्याचे त्यांनी नमूद केले. या उत्पादनासाठी वापरलेले साहित्य हे जैविक असून झाड मोठे होऊ लागले की, रक्षकही तुटून मातीत सहजतेने मिसळून जाते, हे विशेष !
 
 
 
 
 
रक्षक झाडाच्या बुंध्याच्याच आकाराचे असल्याने झाडांखाली कचरा टाकणे, सिमेंटीकरण यासारख्या समस्यांपासूनही त्याचा बचाव होतो. या उत्पादनाचे पेटन्ट घेण्यासाठी गेल्या वर्षभरापासून प्रयत्न सुरू होते, असे सांगून टावरी म्हणाले की, सरकारच्या वतीने पेटन्ट प्रक्रीयेचे मार्गदर्शन करणारे तज्ज्ञ उपलब्ध करून दिले जातात. पेटन्ट मिळविण्यासाठी एक निश्चित प्रक्रीया सरकारी संस्थांनी निश्चित केली आहे. त्यांचा पूर्ण अभ्यास करून आवश्यक ती कागदपत्रे दाखल केल्यास पेटन्ट मिळविण्याची प्रक्रीया तुलनेने सोपी होते, असेही ते म्हणाले. तसेच, पेटन्टच्या प्रक्रीयाशुल्कात सवलतही मिळते. या संधींचा युवा उद्योजकांनी फायदा घ्यावा आणि आपल्या उत्पादनाचे पेटन्ट नक्कीच रजिस्टर करून घ्यावे, असे आग्रही आवाहन त्यांनी केले.