जैताई नवरात्रोत्सवात रंगले कथाकथन

    दिनांक :13-Oct-2021
|
तभा वृत्तसेवा 
वणी,  
वणी नगरीची ग्रामदेवता जैताई देवीच्या शारदीय नवरात्रात सुप्रसिद्ध कथाकथनकार आणि निवेदनकार किशोर गलांडे यांचे कथाकथन झाले. कथा या केवळ मनोरंजनाचा विषय नसून त्यातून ज्ञानरंजन आणि संस्कार व्हायला हवेत अशी भूमिका मांडून गलांडे यांनी सुरुवातीला सुप्रसिद्ध साहित्यिक व. पु. काळे यांची ‘अनामिक’ ही कथा सादर केली.
 

jaitayi _1  H x 
 
 
 
अचानक आलेल्या संकटाने भांबावलेल्या आणि खचलेल्या माणसाला अनेकदा पैशाच्या मदतीपेक्षा मानसिक धीर आवश्यक असतो. आपल्यापेक्षाही अधिक कोणीतरी दु:खी आहे हे पाहून त्याच्या दुःखाची बोच थोडी कमी होते. त्यामुळे त्यासाठी प्रयत्न करणारा अनामिक आपल्यालाही तसे संस्कार देतो. अशा प्रकारच्या बोधाने युक्त असणारी ही कथा सर्वांच्या विशेष आवडीला पात्र ठरली.
 
 
 
त्यानंतर त्यांनी रत्नाकर मतकरी यांची सस्पेंस, सुप्रिया अय्यर यांची सनान् रे बोंबल्या आणि पुन्हा व. पु. काळे यांची तूच माझी माधुरी दीक्षित या कथा सादर केल्या. सुंदर सादरीकरण, स्वच्छ, स्पष्ट शब्दोच्चार, आवश्यकतेनुसार असणारा आवाजातील चढ-उतार, मोजका संयमित अभिनय, कथेनुसार बोलीभाषेचा चपखल उपयोग या वैशिष्ट्यांंमुळे रसिकांना हे कथाकथन खूप आवडले. कार्यक‘माचे सूत्रसंचालन माधव सरपटवार व आभारप्रदर्शन डॉ. अभिजित अणे यांनी केले.