100 लाख कोटींच्या गतिशक्ती योजनेचे राष्ट्रार्पण

गुणवत्तापूर्ण पायाभूत सुविधांच्या अभावी विकास अशक्य : मोदी

    दिनांक :13-Oct-2021
|
तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मल्टिमॉडेल कनेक्टिव्हिटीच्या 100 लाख कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी अशा देशातील पहिल्याच पीएम गतिशक्ती योजनेचा शुभारंभ केला. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी वाहतुकीचा खर्च कमी करणे, मालवाहतुकीची क्षमता तसेच त्याची गती वाढवणे हा या योजनेचा उद्देश असल्याचे मोदी म्हणाले.
 
natre _1  H x W
 
सर्व संबंधित घटकांना एका व्यासपीठावर आणून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला अधिक गती तसेच शक्ती देणे, हा यामागचा उद्देश आहे. विविध मंत्रालय तसेच राज्य सरकारांच्या पायाभूत सुविधा एकाच भूमिकेतून तयार केल्या जातील, तसेच त्यांची अंमलबजावणीही केली जाईल, असे पंतप्रधान म्हणाले. आतापर्यंत विकास कामांच्या योजना अतिशय शिथिलतेने राबवल्या जात होत्या. त्यामुळे करदात्यांच्या पैशाचा योग्य प्रकारे विनियोगही होत नव्हता. प्रत्येक विभाग स्वतंत्रपणे काम करीत होता, योजनांना घेऊन त्यांच्यात कोणत्याच प्रकारचा समन्वय नव्हता, असा आरोप त्यांनी केला.
 
भारत ठरणार गुंतवणुकीसाठी स्वर्ग
गुणवत्तापूर्ण पायाभूत सुविधांअभावी विकास होऊ शकत नसल्यामुळे त्या क्षेत्राच्या समगग्र विकासाची योजना सरकारने हाती आहे. गतिशक्ती योजनेत रस्त्यांपासून रेल्वेपर्यंत आणि विमानापासून कृषी क्षेत्रापर्यंतच्या सर्व प्रकल्पांच्या समन्वित विकासासाठी सर्व संबंधित विभागांचा समन्वय साधण्यात आला आहे. मालवाहतुकीचा वाढता खर्च, ज्याचा सकल राष्ट्रीय उत्पन्नात 13 टक्के वाटा आहे, आपल्या निर्यातीला प्रभावित करतो. गतिशक्ती मास्टर प्लानचा मु‘य उद्देशच मालवाहतुकीचा खर्च करत आपली निर्यात वाढवत अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा आहे. यामुळे भारत हा गुंतवणुकीसाठीचा स्वर्ग ठरणार आहे.
 
रेल्वे, मेट्रोमार्गाचे विस्तारीकरण
2014 मध्ये पाच वर्षांत 1900 किमी लांबीच्या रेल्वेमार्गांचे दुहेरीकरण करण्यात आले. त्यातुलनेत गेल्या सात वर्षांत 9 हजार किमी रेल्वे मार्गांचे दुहेरीकरण झाले आहे. 2015 पर्यंत देशात मेट्रोचा विस्तार फक्त 250 किमी होता, आमच्या काळात वाढवून तो 700 किमीवर नेला. आणखी 1 हजार किमीच्या मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.