एनआयएने आवळल्या चार अतिरेक्यांच्या मुसक्या

- काश्मिरात 16 ठिकाणी झाडाझडती

    दिनांक :13-Oct-2021
|
श्रीनगर,
राष्ट्रीय तपास संस्था अर्थात् एनआयएने जम्मू-काश्मिरातील 16 ठिकाणी छापेमारी करून चार अतिरेक्यांना अटक केली आहे. काश्मीरसह देशातील अन्य काही शहरांमध्ये मोठ्या घापपाताचा कट उधळून लावल्यानंतर गुन्हे दाखल करून एनआयएने काही दिवसांपासून छापेमारीचे सत्रच सुरू केले आहे.
 
natre _1  H x W
 
एनआयएने 10 ऑक्टोबर रोजी गुन्ह्यांची नोंद केली होती. या काळात काही अतिरेक्यांना अटकही करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारावर आज आणखी चौघांना अटक करण्यात आली. वासीम अहमद सोफी, तारिक अहमद दार, बिलाल अहमद उर्फ बिलाल फाफू आणि तारिक अहमद बाफंडा, अशी अटक करण्यात आलेल्या अतिरेक्यांची नावे असून, ते श्रीनगर आणि शोपियाँ जिल्ह्यातील असल्याची माहिती एनआयएच्या प्रवक्त्याने दिली.
 
 
हे चारही अतिरेकी विविध संघटनांचे आहेत. अतिरेक्यांसाठी वाहतुकीची व्यवस्था करणे, साहित्य उपलब्ध करून देण्याची जबाबदारी त्यांना देण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीतून निष्पन्न झाल्याची माहिती एनआयएने दिली. मंगळवारी झालेल्या छापेमारीदरम्यान इलेक्ट्रॉनिक उपकरणे, जिहादाबाबतचे दस्तावेज, संशयास्पद आर्थिक व्यवहारांचा रेकॉर्ड जप्त करण्यात आला, असे प्रवक्त्याने सांगितले.
 
 
जम्मू-काश्मीरसह देशातील मोठ्या शहरांत दहशतवादी आणि सायबर हल्ले घडवण्याचा कट रचण्यात आल्याच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. हा कट तोयबा, जैश, हिजबुल, अल्-बद्र, द रेझिस्टन्स फोर्स (टीआरएफ) आणि पीपल्स अगेन्स्ट फॅसिस्ट फोर्स (पीएएफएफ) या संघटनांनी रचला होता, असे एनआयएच्या प्रवक्त्याने सांगितले.