मी सलग पाच वर्षे मुख्यमंत्री राहिलो

फडणवीस यांचा शरद पवारांवर पलटवार

    दिनांक :13-Oct-2021
|
तभा वृत्तसेवा
मुंबई,
राज्याच्या इतिहासात 40 वर्षांनंतर पहिल्यांदा सलग 5 वर्षे मला मुख्यमंत्रिपदी राहण्याचा मान मिळाला. मी विरोधी पक्षनेता म्हणूनसुद्धा समाधानी असल्याने महाविकास आघाडी अस्वस्थ आहे, हीच माझ्या कामाला मिळालेली पावती आहे. ज्या महाराष्ट्राचे आपण नेतृत्त्व केले, त्याच महाराष्ट्रात एक हजार कोटींची दलाली उघड होते, याची चिंता शरद पवार यांनी केली पाहिजे. खरे तर दलालांचे हे जाळे उद्ध्वस्त करा, अशी मागणी त्यांनी केली पाहिजे, असेही फडणवीस म्हणाले.
 
maha _1  H x W:
 
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवरील कारवाई उच्च न्यायालयाच्या आदेशाने झाली. न्यायालयाने सीबीआय चौकशीचा आदेश दिला आहे. सीबीआयने चौकशीच करू नये, असे या सरकारने सांगितल्याने देशाचे पैसे बुडवणार्‍या बँक फसवणुकीची 80 प्रकरणे धुळखात आहेत. आता उच्च न्यायालयावरही यांचा विश्वास नाही का, असा सवाल फडणवीस यांनी आज प्रसिद्धीमाध्यमांशी केला.
 
जालियनवाला बागचा आदेश ब्रिटिशांचा
जालियनवाला बागेत गोळीबार पोलिसांनी केला असला तरीआदेश बि‘टिशांच्या गव्हर्नर जनरल यांचा होता. अगदी तसेच मावळचा गोळीबार पोलिसांनी केला तरी त्यांना आदेश तेव्हाच्या राज्यकर्त्यांचा होता. त्यामुळे मावळ गोळीबारची घटनासुद्धा जालियनवाला बागसारखीच घटना आहे, असे प्रत्त्युत्तर त्यांनी दिले.
 
 
शरद पवारांची पत्रपरिषद कशासाठी होती, हेच लक्षात आले नाही. ते अनेक विषयांवर बोलले. उत्तरप्रदेशच्या घटनेवर महाराष्ट्रात बंद केला जातो आणि तोही सर्व यंत्रणांचा वापर करीत, संपूर्ण दडपशाही करून. या बंददरम्यान पहिल्यांदा असे घडले की पोलिस संरक्षणात लोकांवर दबाव आणला गेला आणि त्यांना धमकावून बंद केला गेला. हा बंद किती शांततेत झाला, हे आता लक्षात येते, असेही ते म्हणाले.