इंडिया गेटसह 10 ठिकाणांची केली पाहणी

अटकेतील पाकिस्तानी दहशतवाद्याची कबुली

    दिनांक :13-Oct-2021
|
नवी दिल्ली, 
येथील इंडिया गेट, लाल किल्ला आणि उच्च न्यायालयासह 10 ठिकाणांची पाहणी केली होती, अशी कबुली दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने मंगळवारी अटक केलेला पाकिस्तानी दहशतवादी मोहम्मद अशरफने चौकशीदरम्यान दिली आहे.
 
natre _1  H x W
 
2011 मध्ये झालेल्या स्फोटापूर्वी त्याने दिल्ली उच्च न्यायालयाची पाहणी केली होती. दिल्ली उच्च न्यायालय स्फोट प्रकरणातील एका आरोपीचे छायाचित्र दाखवले असता, त्याने उपरोक्त माहिती दिली, असे या घडामोडींची माहिती असलेल्यांनी राष्ट्रीय तपास संस्था अर्थात् एनआयएला सांगितले. मात्र, दिल्ली उच्च न्यायालय स्फोट प्रकरणात त्याचा हात आहे अथवा नाही, हे स्पष्ट झालेले नाही. त्याच्या सहभागाची माहिती तपासातच स्पष्ट होणार आहे. एनआयए, रॉ आणि मिलिट्री इंटेलिजन्सने अशरफची सखोल चौकशी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 
 
अशरफने आयटीओ येथील जुन्या पोलिस मु‘यालयाचीदेखील पाहणी केली होती, असेही चौकशीतून समोर आले आहे. पोलिस मु‘यालयाबाहेर जास्त वेळ थांबू न दिल्याने त्याला संपूर्ण माहिती मिळाली नव्हती. आयएसबीटीची पाहणी करून त्याने याबाबतची माहिती पाकिस्तानातील सूत्रधारांना दिली होती. या व्यतिरिक्त इंडिया गेट आणि लाल किल्ल्याचीदेखील पाहणी केल्याची कबुली त्याने दिली आहे. दिल्लीतील एकूण 10 ठिकाणांची पाहणी अशरफने केल्याची माहिती सूत्रांनी दिली. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा वावर असलेल्या ठिकाणांची पाहणी केली नाही. येथे हल्ला झाल्यास फार कमी नुकसान होत असल्याने अशा जागा टाळण्यात आल्याचे त्याने चौकशीत सांगितले. या सर्व ठिकाणांची पाहणी काही वर्षांपूर्वी करण्यात आली. ज्या ठिकाणांवर दहशतवादी हल्ले घडवण्याचा कट होता, त्याची माहिती त्याने दिलेली नाही, असे सूत्रांनी सांगितले.
 
बिहारमध्ये तयार केले ओळखपत्र
अशरफने सर्वप्रथम पाकिस्तानातून बांगलादेशात घुसखोरी केली. त्यानंतर तो पश्चिम बंगालमधील कोलकात्यात आला. तो अजमेरलाही गेला होता. तिथे त्याने बिहारी लोकांसोबत भेट घेऊन त्यांच्या गावात आश्रय घेतला. बिहारमधील एका सरपंचाचा विश्वास जिंकून त्याने स्वतःचे ओळखपत्र तयार केले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.