पुलवामात जैशच्या कमांडरचा खात्मा

- सुरक्षा दलाला मोठे यश

    दिनांक :13-Oct-2021
|
श्रीनगर,
जम्मू-काश्मिरातील पुलवामा जिल्ह्यात आज बुधवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने जैश-ए-मोहम्मदचा कमांडर शाम सोफीचा खात्मा केल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्राल परिसरातील तिलवानी मोहल्ला येथे दहशतवाद्यांच्या हालचाली असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने तातडीने या परिसराला वेढा घालून शोधमोहीम सुरू केली, असे पोलिस अधिकार्‍याने सांगितले. या परिसरात एक किंवा दोन दहशतवादी दडले असावेत, अशी शंका सुरक्षा दलाला होती. केंद्रीय राखीव पोलिस दल आणि काश्मीर पोलिसांचे संयुक्त पथक परिसरात शोधमोहीम राबवत असताना लपलेल्या दहशतवाद्याने अचानक सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार केला.
 
natre _1  H x W
 
दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर केलेल्या बेछूट गोळीबारानंतर ही शोधमोहीम चकमकीत बदलली. सुरक्षा दलाने दिलेल्या चोख प्रत्युत्तरात शाम सोफी ठार झाला, अशी माहिती काश्मीर रेंजचे पोलिस महानिरीक्षक विजयकुमार यांनी दिली. मागील तीन दिवसांत सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांत झडलेली ही पाचवी चकमक आहे. मागील चार चकमकींत सुरक्षा दलाने एकूण सात दहशतवाद्यांचा खात्मा केलेला आहे.