पुढील आठवड्यात मॉस्कोमध्ये अफगाण मुद्यावर बैठक

- तालिबानची भारतासोबत चर्चा होण्याचे संकेत

    दिनांक :13-Oct-2021
|
मॉस्को, 
रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये अफगाणिस्तानच्या मुद्यावर येत्या 20 ऑक्टोबर रोजी बैठक होत आहे. यात तालिबानच्या प्रतिनिधींची भारतासोबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अफगाणिस्तानात सर्वसमावेशक सरकार असावे, अशी भूमिका रशियाने मांडली होती. या पृष्ठभूमीवरील चर्चेत महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा होणार आहे. रशियाकडून तालिबानला मॉस्कोमध्ये बैठकीचे आमंत्रण देण्यात आले आहे. बैठकीत तालिबानचे कोणते अधिकारी सहभागी होतील, याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही.
 
intre _1  H x W
 
अफगाणिस्तानच्या मुद्यावर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत भारताची तालिबानसोबत ही पहिलीच औपचारिक बैठक असेल. मॉस्को चर्चेनंतर अफगाण मुद्यावर चर्चा करण्यासाठी रशियाने अमेरिका, चीन आणि पाकिस्तानसोबत पुढील बैठक बोलावली आहे. रशियन परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानुसार, अफगाणिस्तानातील दहशतवादी कारवायांवर रशियन सरकारने चिंता व्यक्त केली आहे. मॉस्कोमध्ये होणार्‍या तालिबानसोबतच्या चर्चेत दहशतवादी कारवायांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, रशियाने याआधी ताजिकिस्तान आणि अफगाण सीमेवर तणाव वाढल्यास निर्णायक कारवाई करणार असल्याचा इशारा दिला होता.