इंधन दरवाढीमुळे आता डिझेलवर धावणार नाही एसटी

    दिनांक :13-Oct-2021
|
मुंबई,
इंधन दरवाढीचा फटका हा सर्वांनाच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष बसला आहे. यामधून ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहीनी म्हणून ओळखली जाणारी एसटी सेवा सुटली नाही. डिझेलचे दर वाढल्यामुळे आगामी काळात एसटीच्या बस डिझेलवर न चालवता पर्यायी इंधन म्हणून सीएनजीवर चालविल्या जाणार आहेत.
 
maha _1  H x W:
 
कोरोना काळ, टाळेबंदी आणि त्यात इंधन दरवाढ यामुळे एसटी महामंडळाचे कंबरडे मोडले आहे. एसटी महामंडळाच्या एकूण खर्चापैकी डिझेलवर होणारा खर्च हा 34 टक्के होता, सध्याच्या काळात हा खर्च 38 ते 40 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. आता राज्यात सर्व काही सुरळीत सुरू झाले असले तरी, अजूनही एसटी सेवा प्रवाशांच्या प्रतिसादाअभावी पूर्वीप्रमाणे पूर्ण क्षमतेने धावत नाहीत.
 
 
थोडक्यात एसटीच्या उत्पन्न वाढीवर मोठ्या मर्यादा आहेत. त्यातच कर्मचार्‍यांबरोबर वेतन करार, सरकारकडील थकीत अनुदान या सर्वांमुळे एसटीचा तोटा हा पाच हजार कोटींच्या पुढे पोहोचला आहे. म्हणूनच एसटी महामंडळाने ताफ्यात सीएनजीवर धावणार्‍या बस दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातही नवीन बस न घेता सध्या धावत असलेल्या बसपैकी एक हजार बस या सीएनजीसाठी परावर्तित केल्या जाणार आहेत. यासाठी निविदा प्रकि‘या सुरू करण्यात आली असून एकूण 140 कोटी रुपये खर्च येणार आहे. या निर्णयामुळे येत्या काळात डिझेलवरील खर्चाची बचत होणार आहे. सीएनजी स्टेशन्स हे राज्यात सर्व ठिकाणी उपलब्ध नसल्याने मुंबई, पुणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यातच सुरुवातीच्या काळात या सीएनजी बस धावणार आहेत.